पंतप्रधान कार्यालय

वडोदरा इथे विमान निर्मिती कारखान्याच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 30 OCT 2022 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2022


गुजरातचे  राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे  लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, ज्योतिरादित्य सिंदीया जी, टाटा सन्सचे अध्यक्ष,एअरबस इंटरनॅशनलचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी, संरक्षण आणि हवाई वाहतूक क्षेत्र उद्योगाशी संबंधित सर्व मित्रगण, स्त्री-पुरुषहो,

नमस्कार !

आपल्याकडे गुजरातमध्ये तर दिवाळी  देवदिवाळी पर्यंत चालते.दिवाळीच्या या काळात वडोदरा, गुजरातला, देशाला एक बहुमोल भेट मिळाली आहे. गुजरातचे तर नव वर्ष आहे, नव्या वर्षात मी ही प्रथमच गुजरातला आलो आहे. आपणा सर्वाना नव वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा.

भारत जगातले मोठे उत्पादन केंद्र व्हावा या दिशेने आज आम्ही मोठे  पाऊल उचलत आहोत.भारत आज आपल्या लढाऊ विमानांची निर्मिती करत आहे, भारत आज आपल्या रणगाड्यांची निर्मिती करत आहे,आपल्या पाणबुड्यांची निर्मिती करत आहे.इतकेच नव्हे तर भारतात उत्पादित औषधे आणि लसी आज जगातल्या लाखो लोकांना जीवनदान देत आहेत. भारतात उत्पादित इलेक्ट्रॉनिक उपकरणे,भारतात निर्मिती करण्यात आलेले मोबाईल फोन, भारतात उत्पादित गाड्या आज अनेक देशात लोकप्रिय  आहेत. मेक इन इंडिया, मेक फॉर द ग्लोब हा मंत्र घेऊन आगेकूच करणारा भारत आपले सामर्थ्य वृद्धींगत करत आहे. आता भारत वाहतुकीच्या विमानांचाही मोठा निर्माता बनेल.आज भारतात याची सुरवात झाली आहे. मला तो दिवस दिसतो आहे जेव्हा,जगातली मोठी प्रवासी विमानेही भारतात तयार होतील आणि त्यावर लिहिले असेल-  मेक इन इंडिया

मित्रहो,  

आज वडोदरा इथे ज्या सुविधेचे भूमिपूजन झाले आहे त्यामध्ये देशाच्या संरक्षण आणि हवाई-अंतराळ  क्षेत्रात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य आहे. भारतात प्रथमच संरक्षण एअरोस्पेस क्षेत्रात इतकी प्रचंड गुंतवणूक होत आहे.इथे निर्मिती होणारी मालवाहू विमाने आपल्या सैन्यदलाला  अधिक बळ तर देतीलच त्याबरोबरच विमान निर्मितीसाठी एका नव्या  व्यवस्थेचाही विकास होईल. शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले आमचे वडोदरा आता हवाई क्षेत्रातले केंद्र ही नवी ओळख घेऊन जगभरात आपली मान उंचावेल. खरे तर भारत आधीपासूनच अनेक देशांना विमानाचे लहान-मोठे भाग निर्यात करत आला आहे मात्र आता देशात प्रथमच लष्करी वाहतूक विमान तयार होणार आहे. यासाठी टाटा समूह आणि एअरबस डिफेन्स कंपनीला मी खूप –खूप शुभेच्छा देतो. या प्रकल्पाशी 100 पेक्षा जास्त सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगही जोडले जाणार आहेत अशी माहिती मला देण्यात आली आहे. भविष्यात जगातल्या इतर देशांसाठीही निर्यातीच्या ऑर्डर इथे घेता येऊ शकतील. म्हणजेच मेक इन इंडिया,मेक फॉर ग्लोब हा संकल्पही या भूमीवरून अधिक दृढ होणार आहे.

मित्रहो,

आज भारतात वेगाने विकसित होणारे  हवाई वाहतूक क्षेत्र आहे.  हवाई वाहतुकीत आपण जगातल्या सर्वोच्च तीन देशामध्ये पोहोचणार आहोत. येत्या 4- 5 वर्षात कोट्यवधी नवे प्रवासी हवाई प्रवासी होणार आहेत. उडान योजनेचाही यासाठी मोठा हातभार लागत आहे.येत्या 10-15 वर्षात भारताला सुमारे 2000 पेक्षा जास्त प्रवासी आणि मालवाहू विमानांची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे. एकट्या भारताला  2000 विमानांची आवश्यकता यावरूनच विकास किती वेगाने होणार आहे हे दिसून येते. ही मोठी मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने भारत आतापासूनच तयारी करत आहे.आजचा हा कार्यक्रम म्हणजे या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

मित्रहो,

आजच्या या आयोजनात जगासाठीही एक संदेश आहे. आज भारत जगासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे. जागतिक पातळीवर कोरोना आणि युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती असूनही, पुरवठा साखळीत अडथळे आलेले असूनही भारतात उत्पादन क्षेत्राची विकासाची  गती  राखली गेली आहे. हे असेच घडले नाही. आज भारतात कार्यान्वयन पद्धतीत सातत्याने सुधारणा होत आहे.आज भारतात मूल्य पातळीवर स्पर्धात्मकतेवर, गुणवत्तेवर  भर देण्यात येत आहे. आज भारत कमी किमतीत उत्पादन आणि जास्त उत्पादनाची संधी देत आहे. आज भारताकडे कुशल मनुष्य बळाचे मोठे भांडार आहे.गेल्या आठ वर्षात आमच्या सरकारने ज्या सुधारणा केल्या त्यामुळे भारतात  उत्पादनासाठी एक अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसाय सुलभतेवर भारताचा सध्या असलेला भर याआधी कधी नव्हता. कंपनी कर संरचना सुलभ करणे असो, ही  रचना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करणे असो, अनेक  क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचे मार्ग  मोकळे करणे असो, संरक्षण,खाण, अंतराळ यासाखी क्षेत्रे खाजगी कंपन्यांसाठी खुली करणे असो, कामगार  सुधारणा करणे असो, 29 केंद्रीय कामगार कायद्यांचे केवळ चार संहितामध्ये परिवर्तन असो, 33 हजार पेक्षा जास्त अनुपालन हटवणे असो,डझनावारी करांचे जाळे नष्ट करत एक वस्तू आणि सेवा कर करणे असो, भारतात आज आर्थिक सुधारणांची नवी गाथा लिहिली जात आहे. या सुधारणांचा मोठा फायदा आपल्या उत्पादन क्षेत्राला होत आहे इतर क्षेत्रेही याचा लाभ घेत आहेत.

मित्रहो,

या यशाच्या मागे एक आणखी मोठे कारण आहे, मी तर म्हणतो सर्वात मोठे कारण आहे ते आणि ते आहे मानसिकतेत झालेला बदल. आपल्या इथे दीर्घ काळ सरकारची हीच मानसिकता राहिली होती की सारे काही सरकारच जाणते,सरकारनेच सर्व करायला हवे. या मानसिकतेने देशातली प्रतिभा दबली गेली आणि भारताच्या खाजगी क्षेत्राचे सामर्थ्य वाढू शकले नाही. सबका प्रयास हा मंत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या देशाने आता सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना सारखेच  महत्व द्यायला सुरवात केली आहे.     

मित्रांनो,

आधीच्या सरकारांमध्ये समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची, काहीतरी अनुदान देऊन उत्पादन क्षेत्र जिवंत ठेवण्याची  मानसिकता होती. या विचारसरणीमुळे भारतातील उत्पादन क्षेत्राचे बरेच नुकसान झाले. त्यामुळे याआधी कोणतेही ठोस धोरण बनवले गेले नाही आणि लॉजिस्टिक्स, वीजपुरवठा-पाणीपुरवठा यासारख्या गरजांकडे दुर्लक्ष केले गेले. याचा परिणाम काय झाला, हे माझ्या देशातील तरुण पिढी चांगलेच समजू शकते. आता आजचा भारत नव्या मानसिकतेसह, नव्या कार्यसंस्कृतीसह काम करत आहे. आम्ही कामचलाऊ  निर्णय घेण्याची पद्धत सोडून दिली आहे आणि विकासासाठी , गुंतवणूकदारांना  विविध प्रोत्साहने देत आहोत. आम्ही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरु केली, ज्यामुळे बदल दिसून आला. आज आमचे धोरण स्थिर आहे , अंदाज वर्तवण्याजोगे आणि भविष्यवादी आहे. आम्ही पीएम गति शक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणांद्वारे देशाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेत सुधारणा करत आहोत.

मित्रांनो,

याआधी अशीही मानसिकता होती की भारत उत्पादन क्षेत्रात उत्तम कामगिरी  करू शकत नाही, त्यामुळे केवळ सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज आपण सेवा क्षेत्र समर्थपणे हाताळत आहोत आणि उत्पादन क्षेत्रालाही समृद्ध करत आहोत. आपल्याला माहित आहे की आज जगातील कोणताही देश केवळ सेवा क्षेत्र किंवा उत्पादन क्षेत्र विकसित करून प्रगती करू शकत नाही. आपल्याला विकासाचा सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. आणि आजचा नवा भारत त्याच मार्गावर आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत आहे. आधीच्या विचारात आणखी एक त्रुटी होती. आपल्याकडे कुशल मनुष्यबळाचा तुटवडा असणे, देशाच्या कौशल्यावर विश्वास नसणे, देशाच्या प्रतिभेवर विश्वास नसणे, या  मानसिकतेमुळे उत्पादन क्षेत्राबाबत एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली आणि  याकडे कमी लक्ष दिले गेले. पण आज भारत उत्पादनातही आघाडीवर राहण्याच्या तयारीत आहे. सेमी-कंडक्टरपासून विमान निर्मितीपर्यंत  प्रत्येक विभागात आघाडीवर राहण्याच्या उद्देशाने आपण वाटचाल करत आहोत. हे शक्य झाले कारण गेल्या 8 वर्षांत आपण  कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी पूरक वातावरण तयार केले. या सर्व बदलांना आत्मसात करून आज भारताचा उत्पादन क्षेत्रातील विकासाचा प्रवास या टप्प्यावर पोहोचला आहे.

मित्रांनो,

गुंतवणूक-स्नेही धोरणांची फळे एफडीआयमध्येही दिसून येतात. गेल्या आठ वर्षांत 160 हून अधिक परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. आणि ही परकीय गुंतवणूक काही उद्योगांमध्येच आली आहे असे नाही. अर्थव्यवस्थेच्या 60 पेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये याचा विस्तार झाला आहे आणि ही गुंतवणूक देशातील 31 राज्यांमध्ये झाली आहे. केवळ एरोस्पेस क्षेत्रात 3 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक केली गेली आहे. वर्ष  2000 ते 2014 या कालावधीतील 14 वर्षांच्या तुलनेत, गेल्या 8 वर्षांत या क्षेत्रातील गुंतवणूक पाच पटीने अधिक झाली आहे. येत्या काही वर्षात संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्र हे आत्मनिर्भर भारत मोहिमेचे मोठे आधारस्तंभ असणार आहेत. 2025 सालापर्यंत आपली संरक्षण उत्पादनातील उलाढाल   25 अब्ज डॉलर्सच्या  पुढे नेण्याचे आमचे ध्येय आहे. आपली संरक्षण उत्पादनांची निर्यातदेखील 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असेल. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या संरक्षण कॉरिडॉरमुळे या क्षेत्राची वाढ होण्यास मदत होईल. तसेच, आज मी देशाच्या संरक्षण मंत्रालयाची आणि गुजरात सरकारची स्तुती करतो, प्रशंसा करतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी गांधीनगरमध्ये अतिशय नेत्रदीपक संरक्षण प्रदर्शन  आयोजित केल्याचे तुम्ही पाहिले असेल. संरक्षणाशी संबंधित सर्व उपकरणांच्या प्रदर्शनाचा एक मोठा कार्यक्रम होता असे सांगताना मला अतीव आनंद होत आहे आणि मी राजनाथजींचे अभिनंदन करतो, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिफ -एक्स्पो होता. आणि याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आलेली सर्व उपकरणे आणि तंत्रज्ञान हे सर्व भारतात विकसित केले होते. म्हणजेच प्रोजेक्ट C-295 चे प्रतिबिंब येत्या काही वर्षांच्या संरक्षण संबंधी प्रदर्शनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. यासाठी मी टाटा समूह आणि एअरबसला शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आजच्या, या ऐतिहासिक प्रसंगी, मी उद्योगक्षेत्राशी संबंधित माझ्या सहकाऱ्यांना पुन्हा विनंती करू इच्छितो. आणि मला आनंद आहे की या महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील सर्व वरिष्ठ उद्योगांतील मान्यवर आज येथे उपस्थित आहेत. विद्यमान काळात देशात जो अभूतपूर्व गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे, त्याचा अधिकाधिक फायदा घ्या, शक्य तितक्या आक्रमकपणे विकसित होण्याची ही संधी गमावू नका. देशातील स्टार्ट-अप्स, उद्योगात प्रस्थापित झालेल्या उद्योग समूहांना मी विनंती करेन की, देशातील स्टार्ट अप्सना पुढे जाण्यासाठी आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, माझी इच्छा आहे , आपल्याकडच्या सर्व मोठ्या उद्योगांमध्ये एक एक  स्टार्ट-अप सेल उभारायचे आहे, आणि देशभरातील स्टार्ट अप्समध्ये कार्यरत असणाऱ्या आपल्या तरुणांच्या वाटचालीचा अभ्यास करा आणि त्यांचे संशोधन आणि त्यांच्या कार्याचा कसा मेळ साधला जाऊ शकतो याबाबत त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला दिसेल की तुमची खूप वेगाने प्रगती होईल आणि आज जे तरुण  स्टार्ट-अप्सच्या जगात भारताकडून कौतुकास्पद कामगिरी करत आहेत, त्यांची ताकदही अनेक पटींनी वाढेल. संशोधनात खाजगी क्षेत्राचा सहभाग अजूनही मर्यादित आहे. जर आपण हे एकत्रितपणे वाढवले, तर आपण नवोन्मेषाची , उत्पादनाची अधिक मजबूत परिसंस्था  विकसित करू शकू. सबका प्रयास हा मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडेल, आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि आपण सर्व याच दिशेने मार्गक्रमण करू. या आधुनिक विमान निर्मिती सुविधेसाठी मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. देशातील तरुणांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. खास करून देशातील तरुण पिढीलाही मी  शुभेच्छा देतो.

खूप-खूप धन्यवाद !

 

* * *

S.Kane/Nilima/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872492) Visitor Counter : 175