पंतप्रधान कार्यालय
गुजरातच्या बनासकांठा मधील थारड इथे, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी
“मोरबी इथे झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण देशाच्या संवेदना त्यांच्यासोबत”
“आज विकासाच्या इतिहासात बनासकांठा आपला वेगळा अध्याय लिहीत आहे.”
“भारत आणि गुजरातची प्रतिष्ठा वाढवणारे प्रत्येक काम, दुहेरी इंजिन सरकारची कटिबद्धता व्यक्त करणारे आहे.”
Posted On:
31 OCT 2022 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्या बनासकांठा इथल्या थारड मध्ये 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी झाली.
यावेळी बोलतांना सर्वप्रथम पंतप्रधानांनी गुजरातच्या मोरबी इथे काल झालेल्या दुर्घटनेबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. या अपघातात आपल्या जवळच्या लोकांना गमावलेल्या नागरिकांच्या दु:खामुळे संपूर्ण देश शोकमग्न झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पीडितांना मदत करण्यासाठी, मुख्यमंत्री आणि त्यांचे पथक अहोरात्र काम करत आहे, असं त्यांनी सांगितलं. “काल रात्री भूपेंद्रभाई केवडिया इथून थेट मोरबीला पोहोचले आणि बचाव कार्याची धुरा सांभाळली. मी सातत्याने त्यांच्या आणि बचाव कार्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि लष्करी अधिकाऱ्यांचा चमू घटनास्थळी पोहोचले आहेत. मी अंबाजीच्या भूमीवरून गुजरातच्या लोकांना वचन देतो, की बचाव कार्यात काहीही कसूर ठेवली जाणार नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हा कार्यक्रम रद्द करावा की नाही, या द्विधा मनःस्थितीत होतो, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र पाणीपुरवठा प्रकल्प बनासकांठासाठी किती महत्वाचे आहेत आणि इथल्या लोकांचे प्रेम बघता, त्यांनी भावनांना आवर घातला आणि 8000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांमुळे गुजरातच्या बनासकांठा, पाटण आणि मेहसाणा सह एकूण सहा जिल्ह्यांत सिंचनाची सोय उपलब्ध होईल हे त्यांनी अधोरेखित केले. भूतकाळात राज्याने बघितलेली कठीण परिस्थिती आठवून पंतप्रधान म्हणाले, की गुजरातच्या लोकांच्या चिरंतन ऊर्जेमुळेच उपलब्ध संसाधनांच्या बळावर ते कुठल्याही विपरीत परिस्थितीवर मात करू शकतात. “बनासकांठा याचे जिवंत उदाहरण आहे,” असे म्हणून मोदींनी, विकासामुळे या जिल्ह्याचे रूप पालटून गेल्याचे अधोरेखित केले.
उत्तर गुजरातच्या अनेक जिल्ह्यांत पाणी फ्लोराईडने दुषित झाले होते याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली आणि यामुळे या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की परिस्थिती अशी होती, की जर कुणाला जमीन विकायची झाली तर घेणारा मिळत नव्हता. “जेव्हा पासून मी या भूमीचा ‘सेवक’ झालो, तेव्हापासून या क्षेत्राच्या समस्या आमच्या सरकारने ओळखल्या आणि त्या सोडविण्यासाठी समर्पितपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले.” “आम्ही जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित केले, बंधारे आणि तलाव बांधले,” असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी सुजलाम सुफलाम योजना, वास्मो योजना आणि पाणी समित्यांचे उदाहरण दिले. या सर्वात महिलांची महत्वाची भूमिका आणि त्यामुळे कच्छ सहित संपूर्ण उत्तर गुजरात, ठिबक सिंचन आणि ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ मॉडेलमुळे समृद्ध झाला , आणि कृषी, बागायत आणि पर्यटनाला चालना मिळाली हे त्यांनी अधोरेखित केले. “एकीकडे आपल्याकडे बनास डेयरी आहे तर दुसरीकडे 100 मेगावॉट सौर उर्जा प्रकल्प, या क्षेत्रातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे लक्ष्य आपण गाठले आहे,” असे मोदी म्हणाले. ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचत तंत्रज्ञानाने सगळ्या देशाचे लक्ष बनासकांठाकडे वेधले आणि जगभरात ओळख मिळाली. “आज बनासकांठा इतिहासात विकासाचा स्वतःचा अध्याय लिहित आहे,” असे मोदी म्हणाले. बनासकांठामध्ये 4 लाख हेक्टर जमीन ठिबक आणि सूक्ष्म सिंचनासाठी समर्पित आहे, ज्यामुळे भूजल पातळी आणखी खाली जाणे थांबले आहे. “याचा फायदा तुम्हालाच होत नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य देखील सुरक्षित करत आहे,” असे ते म्हणाले. सुजलाम सुफलाम योजना अधोरेखित करताना पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांची प्रशंसा केली, ज्यांनी आपल्या प्रयत्न आणि समर्पण या जोरावर सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आणि सुजलाम सुफलाम योजनेला भव्य यश मिळवून दिले.
गेल्या 19-20 वर्षात केलेले काम अधोरेखित करून पंतप्रधान मोदी म्हणाले की सुजलाम सुफलाम योजनेत शेकडो किलोमीटर लांबीचे पुनर्भरण कालवे बांधण्यात आले. ते असेही म्हणाले की पाईपलाईन टाकल्यामुळे गावतलावांना देखील महत्व आले, ज्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली. पंतप्रधान म्हणाले की दोन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे, ज्याचा फायदा जवळपास 1 हजार गावतळ्यांना होईल.
या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, या योजनेमध्ये मुक्तेश्वर धरण आणि कर्मावत तलावापर्यंत जलवाहिनीचा विस्तार केला जाणार आहे. उंचावर असलेल्या ठिकाणांसाठी इलेक्ट्रिक पंपांच्या मदतीने पाणी उचलले जात आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, नर्मदेच्या मुख्य कालव्यातून एक वितरण कालवा बांधला जात आहे ज्याचा फायदा थरड, वाव आणि सुईगाव तालुक्यातील डझनभर गावांना होईल. पाटण आणि बनासकांठामधील सहा तालुक्यांतील अनेक गावांनाही कासरा-दंतीवाडा जलवाहिनीचा फायदा होणार आहे. आगामी काळात नर्मदा नदीचे पाणी मुक्तेश्वर धरण आणि कर्मावत तलावात येणार आहे. त्याचा लाभ बनासकांठामधील वडगाम, पाटणमधील सिद्धपूर आणि मेहसाणामधील खेरालू तालुक्याला होईल” असे पंतप्रधानांनी नमूद केले.
“एखाद्याला पाणी देण्याचे काम करणे, म्हणजे पवित्र कार्य मानले जाते”, असे सांगून पंतप्रधान म्हणाले , “ज्याला पाणी मिळते तो ‘अमृत वाहक’ मानला जातो. आणि ते अमृत देणाराही अजेय- अजिंक्य बनतो. कारण लोक पाणी देणा-या व्यक्तीला आपले आशीर्वादही देतात. हेच आपल्या जीवनामध्ये पाण्याचे महत्त्व आहे.'' या भागात झालेल्या कामांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी कृषी आणि पशुसंवर्धनातील नवीन शक्यतांची उदाहरणे दिली. पिकांच्या वाढत्या उत्पादनामुळे अन्न-प्रक्रिया उद्योगाची भरभराट होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी बटाटा प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी केल्याचीही पंतप्रधान मोदी यांनी आठवण सांगितली. “केंद्र सरकारकडून अन्न प्रक्रिया उद्योगाची व्याप्ती किती प्रचंड आहे, याची माहिती विशद केली जात आहे. शेतकरी उत्पादक संघटना आणि सखी मंडळांना या क्षेत्राशी जोडत आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. शीतगृह बांधणे असो किंवा अन्न प्रक्रिया प्रकल्प असो, सरकार या संस्थांना कोट्यवधी रुपयांची मदत करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, शेतकरी केवळ डाळिंबाच्या झाडाचा मालक नसून त्यापासून तयार करण्यात येणा-या रस निर्मिती प्रकल्पामध्येही त्या शेतकरी बांधवाचा वाटा आहे, या दृष्टीने विचार करून आम्ही पुढे जात आहोत. आज फळे आणि भाज्यांपासून ते लोणची, मुरांबे आणि चटण्यांपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या सखी मंडळांच्या कामाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला . उद्योगाचा अधिक विकास करण्यासाठी सरकारने सखी मंडळांना उपलब्ध असलेल्या बँक कर्जाच्या मर्यादेत दुप्पट वाढ केल्याचेही त्यांनी नमूद केले. "आदिवासी भागात वन धन केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आदिवासी महिलांच्या सखी मंडळांना वनौपजमधून उत्तम उत्पादने बनवता येतील", असेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, पीएम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण भारतामध्ये ‘भारत’ एकाच ब्रँड नावाने खते मिळू शकणार आहेत, असे त्यांनी सांगितले. यामुळे खतांविषयी शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. सध्या यूरिया खताची आंतरराष्ट्रीय किमती 2000 रुपयांपेक्षा जास्त असतानाही सरकार आपल्या शेतकऱ्यांना 260 रुपयांना युरियाची पिशवी उपलब्ध करून देत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे बनास दुग्धव्यवसायाची पावले आता उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि झारखंडपर्यंत विस्तारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गोवर्धन, जैवइंधन यांसारख्या योजना पशुधनाची उपयुक्तता वाढवत आहेत. “सरकार दुग्धव्यवसायाला बळकट करण्यासाठी निरंतर काम करत आहे”, असेही ते म्हणाले.
देशाच्या सुरक्षेत बनासकांठासारख्या प्रदेशाच्या वाढत्या भूमिकेचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. डीसा येथील हवाईदलाचे विमानतळ आणि नडाबेटमधील ‘सीमा-दर्शन’ या भागातील जीवनमान सुधारत आहेत. सीमावर्ती जिल्ह्यात एनसीसीचा विस्तार आणि ‘व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज’ कार्यक्रमांतर्गत सीमावर्ती गावांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे, याविषयीही त्यांनी माहिती दिली.
कच्छ भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ स्मृती वनाची माहिती देताना पंतप्रधानांनी लोकांना आणि बनास दुग्धशाळेच्या व्यवस्थापनाला लोकांना स्मारकाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याची विनंती केली. “देशाचा अभिमान वाढवणारे, गुजरातचा अभिमान वाढवणारे प्रत्येक काम हे दुहेरी इंजिन सरकारची वचनबद्धता आहे. आमची ताकद सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासांमध्ये आहे”, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी खासदार प्रभातभाई पटेल, भरतसिंह धाबी आणि दिनेशभाई अणावैद्य, गुजरात राज्य सरकारमधील मंत्री, ऋषिकेश पटेल, जितूभाई चौधरी, किरीटसिंह वाघेला आणि गजेंद्रसिंह परमार आदी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनासकांठा येथील थरडला भेट दिली आणि 8000 कोटीपेक्षाही अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. पाणीपुरवठ्याशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी यावेळी करण्यात आली. यामध्ये मुख्य नर्मदा कालव्यापासून कासरा ते दांतीवाडा जलवाहिनीचा समावेश आहे. या कालव्यासाठी 1560 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी फायदेशीर ठरेल. कालव्यांचे जाळे तयार झाल्यामुळे हा भाग सुजलाम - सुफलाम होईल. मोढेरा-मोती दाउू जलवाहिनीचा मुक्तेश्वर धरण-कर्मावत तलावापर्यंत विस्तार आणि सांतलपूर तालुक्यातील 11 गावांसाठी उपसा सिंचन योजनेसह अनेक प्रकल्पांची घोषणा पंतप्रधानांनी केली.
* * *
S.Kane/Radhika/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1872436)
Visitor Counter : 196
Read this release in:
Bengali
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam