पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळावा प्रारंभ आणि 75000 उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
22 OCT 2022 10:45PM by PIB Mumbai
देशाचे युवा पुत्र आणि कन्या, उपस्थित मान्यवर, महिला आणि पुरुषहो, सर्वप्रथम आपणा सर्वाना, सर्व देशवासियांना धनत्रयोदशीच्या खूप-खूप शुभेच्छा. भगवान धन्वंतरी आपणा सर्वाना आरोग्यसंपन्न ठेवो, लक्ष्मी मातेची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो, अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. माझे भाग्य हे आहे की, मी नुकतीच केदारनाथ बद्रीनाथ यात्रा करून आलो आहे, त्यामुळे मला थोडा उशीरही झाला आहे आणि त्यासाठी मी आपणा सर्वांची क्षमा मागतो.
मित्रहो,
आज भारताच्या युवा शक्तीसाठी एक महत्वाची संधी आहे. गेल्या आठ वर्षात देशात जे रोजगार आणि स्वयंरोजगार अभियान सुरु आहे त्यात आज एक आणखी दुवा जोडला जात आहे; हा दुवा आहे रोजगार मेळाव्याचा. स्वातंत्र्याची 75 वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार 75 हजार युवकांना एका कार्यक्रमाअंतर्गत नियुक्ती पत्र देत आहे. गेल्या आठ वर्षात, आधीही लाखो युवकांना नियुक्ती पत्रे दिली गेली आहेत, मात्र या वेळी आम्ही ठरवले की एकाच वेळी नियुक्ती पत्रे देण्याची परंपराही सुरू करूया. ज्यायोगे सर्व विभागदेखील ही प्रक्रिया कालबद्ध पूर्ण करण्यासाठी आणि निर्धारित उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सामुहिक मानसिकता होऊन सामुहिक प्रयत्न करतील, म्हणूनच भारत सरकारने अशा प्रकारचा रोजगार मेळावा सुरु केला आहे. येत्या महिन्यांमध्ये अशाच प्रकारे लाखो युवकांना भारत सरकारकडून वेळो-वेळी नियुक्ती पत्रे सोपवली जातील. एनडीए शासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि भाजपा सरकारेही आपल्या राज्यात अशा प्रकारे रोजगार मेळावे आयोजित करत आहेत याचा मला आनंद आहे.
जम्मू काश्मीर, दादरा नगर हवेली, दमण-दीव आणि अंदमान-निकोबार मधेही येत्या काही दिवसात हजारो युवकांना अशा कार्यक्रमात नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. आज ज्या युवा मित्रांना नियुक्ती पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचे खूप-खूप अभिनंदन !
मित्रहो,
आपण सर्व जण अशा काळात भारत सरकार समवेत जोडले जात आहात, जेव्हा देशाने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश केला आहे. विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी आपण 'आत्मनिर्भर भारत' हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. यामध्ये आपले नवोन्मेशी,आपले शेतकरी, आपले उद्योजक, सेवा आणि उत्पादनाशी संबंधित प्रत्येकाची फार मोठी भूमिका आहे. म्हणजेच सर्वांच्या प्रयत्नातूनच विकसित भारत घडणार आहे. 'सबका प्रयास' ही भावना तेव्हाच जागृत केली जाऊ शकते जेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत प्राथमिक सुविधा वेगाने पोहोचतील आणि सरकारी प्रक्रिया वेगवान आणि त्वरित असतील. काही महिन्यातच लाखोंच्या भरतीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करणे, नियुक्ती पत्रे देणे यातून गेल्या 7-8 वर्षात सरकारी पद्धतीत किती मोठा बदल घडला आहे हे प्रतीत होते. आपण 8-10 वर्षांपूर्वीची परिस्थितीही पाहिली आहे जेव्हा छोट्याशा सरकारी कामासाठीही कित्येक महिने लागत असत. सरकारी फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाईपर्यंत त्यावर धूळ बसत असे. मात्र आता देशात परिस्थिती बदलत आहे, देशाची कार्य संस्कृती बदलत आहे.
मित्रहो,
आज केंद्र सरकारच्या विभागांमध्ये इतकी तत्परता, इतकी कार्यक्षमता आली आहे तर यामागे 7-8 वर्षांची कठोर मेहनत आहे. कर्मयोग्यांचा विराट संकल्प आहे. आपल्याला आठवत असेलच पूर्वी सरकारी नोकरीसाठी कोणाला अर्ज करायचा असेल तर, तिथूनच त्रासाला सुरवात होत असे. अनेक प्रकारची प्रमाणपत्रे मागितली जात, जी प्रमाणपत्रे आहेत, त्यांना प्रमाणित करण्यासाठी आपल्याला नेत्यांच्या घराबाहेर रांग लावावी लागत असे, अधिकाऱ्यांची शिफारस घेऊन जावे लागत असे. आमच्या सरकारने, सुरवातीच्या वर्षातच या अडचणीतून युवकांना सोडवले. स्व-प्रमाणन, युवा वर्गाने आपली प्रमाणपत्रे स्वतः प्रमाणित करावी, अशी व्यवस्था केली. दुसरे मोठे पाऊल उचलले ते म्हणजे केंद्र सरकारच्या गट क आणि गट ड भरतीसाठी मुलाखती बंद केल्या. मुलाखतीची प्रक्रिया समाप्त केल्यानेही लाखो युवकांचा मोठा फायदा झाला आहे.
मित्रहो,
आज भारत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. 7- 8 वर्षाच्या काळातच आपण दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जगभरात परिस्थिती ठीक नाही, अनेक मोठमोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करत आहेत. जगातल्या अनेक देशात महागाई, बेरोजगारी, अशा अनेक समस्या टोकाला पोहोचल्या आहेत, हे सत्य आहे. 100 वर्षातल्या सर्वात मोठ्या संकटाचे दुष्परिणाम 100 दिवसात नाहीसे होतील, असा विचार आपण करत नाही, हिंदुस्तानही असा विचार करत नाही आणि जगालाही असा अनुभव आलेला नाही. इतके मोठे संकट आहे, जगभरात त्याचा प्रभाव आहे, त्याचे दुष्परिणाम होत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही भारत संपूर्ण ताकदीने नवनवे उपक्रम घेऊन थोडी जोखीम घेऊन हा प्रयत्न करत आहे की, हे जे जगभरात संकट आहे त्यापासून आपण आपल्या देशाचा बचाव कसा करू, याचा दुष्परिणाम आपल्या देशावर कमीत कमी कसा राहील; मोठा कसोटीचा काळ आहे. मात्र आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, आपणा सर्वांच्या सहयोगाने आतापर्यंत तर आपला बचाव झाला आहे. हे यामुळे शक्य झाले, कारण गेल्या आठ वर्षात आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या अशा त्रुटी दूर केल्या आहेत ज्या अडथळा निर्माण करत होत्या.
मित्रहो,
देशात असे वातावरण निर्माण करत आहोत, ज्यामध्ये कृषी, खाजगी उद्योग, छोटे आणि लघु उद्योग यांची ताकद वाढेल. देशात रोजगार देणारी ही सर्वात मोठी क्षेत्रे आहेत. युवकांच्या कौशल्याचा विकास यावर आज आमचा सर्वात जास्त भर आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत देशातल्या उद्योगांच्या गरजांनुसार युवकांना प्रशिक्षण देण्याचे मोठे अभियान सुरु आहे. या अंतर्गत आतापर्यंत सव्वा कोटीपेक्षा अधिक युवकांना स्कील इंडिया अभियानाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी देशभरात कौशल्य विकास केंद्रे उघडण्यात आली आहेत. या आठ वर्षात केंद्र सरकारने उच्च शिक्षणाच्या शेकडो नव्या संस्था उभारल्या आहेत. युवकांसाठी आम्ही अंतराळ क्षेत्र खुले केले आहे, ड्रोन धोरण सुलभ केले आहे, ज्यायोगे देशभरात युवकांसाठी जास्तीत जास्त संधी निर्माण व्हाव्यात.
मित्रांनो,
देशात मोठ्या संख्येने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या निर्माणात सर्वात मोठा अडथळा हा, बँकिंग व्यवस्थेपर्यंत खूपच मर्यादित प्रमाणात लोकांचे पोहोचणे, हा देखील होता. आम्ही हा अडथळा दूर केला आहे. मुद्रा योजनेने देशातील गावे आणि छोट्या शहरांमध्ये उद्यमशीलतेचा विस्तार केला आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. देशात स्वयंरोजगाराशी संबंधित इतका मोठा कार्यक्रम याआधी कधीच राबवण्यात आला नाही. यातही कर्ज मिळालेल्या सहकाऱ्यांपैकी सात कोटींहून अधिक लोक असे आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच आपला व्यवसाय सुरू केला आहे, आपला काही कामधंदा सुरू केला आहे. आणि यातही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी, सुमारे 70 टक्के लाभार्थी आपल्या मुली आहेत, माता भगिनी आहेत. याशिवाय आणखी एक आकडेवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षात स्वयंसहाय्यता समूहाबरोबर आठ कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यांना केंद्र सरकार आर्थिक मदत देत आहे. या कोट्यवधी महिला आता आपल्या उत्पादनांची देशभरात विक्री करत आहेत. आपले उत्पन्न वाढवत आहेत. बद्रीनाथ इथे मी कालच, तिथे भेटलेल्या स्वयंसहाय्यता समूहासंबंधीत महिलांना विचारत होतो, त्यांनी सांगितले की यंदा बद्रीनाथ यात्रेसाठी अनेक लोक आले होते, त्यामुळे आमच्या एकेका बचत गटाची कमाई अडीच लाख रुपये झाली.
मित्रांनो,
गावखेड्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्माणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे आपला खादी आणि ग्रामोद्योग आहे. देशात पहिल्यांदाच खादी आणि ग्राम उद्योग एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा झाला आहे. या वर्षांमध्ये खादी आणि ग्रामोद्योगामुळे एक कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. यातही मोठ्या संख्येने आपल्या बहिणींचा सहभाग आहे.
मित्रांनो,
स्टार्ट अप इंडिया अभियानाने तर देशातील तरुणांचे सामर्थ्य संपूर्ण जगात प्रस्थापित केले आहे. 2014 पर्यंत जिथे देशात, काही शेकडाच स्टार्टअप होते, आज ही संख्या 80 हजारापेक्षा अधिक झाली आहे. आपल्या तरुणांनी या दरम्यान हजारो कोटी रुपयांच्या अनेक कंपन्या उभ्या केल्या आहेत. देशात आज या हजारो स्टार्टअप्स मध्ये लाखो तरुण काम करत आहेत. देशातील एमएसएमईमध्ये, छोट्या उद्योगातही आज कोट्यवधी लोक काम करत आहेत. गेल्या काही वर्षातच यात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. केंद्र सरकारने कोरोना संकटकाळात एमएसएमईसाठी तीन लाख कोटी रुपयांची अधिकची मदत केली होती, यामुळे अडचणीत आलेले सुमारे दीड कोटींहून अधिक रोजगार वाचले. भारत सरकार, मनरेगाच्या माध्यमातूनही देशभरात सात कोटी लोकांना रोजगार देत आहे. आणि आता त्यात आम्ही संपत्ती निर्माण आणि संपत्ती उभारण्यावर जोर देत आहोत. डिजिटल इंडिया अभियानाने देखील संपूर्ण देशात लाखो 'डिजिटल उद्योजक' निर्माण केले आहेत. देशात पाच लाखांपेक्षा अधिक सेवा केंद्रांमध्येच लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. 5Gच्या विस्तारामुळे डिजिटल क्षेत्रात रोजगाराच्या संधी आणखी वाढणार आहेत.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकात देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी अभियान आहे, 'मेक इन इंडिया', 'आत्मनिर्भर भारत'. देश आज अनेक क्षेत्रात एका मोठ्या आयातदाराच्या भूमिकेतून एका मोठ्या निर्यातदाराच्या भूमिकेत येत आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत, ज्यात भारत आज 'ग्लोबल हब' होण्याच्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. भारतातून दर महिन्याला एक अब्ज मोबाईल फोन संपूर्ण जगात निर्यात होत आहेत, अशी बातमी येते तेव्हा हे आपल्या नवसामर्थ्याचेच निदर्शक असते. भारत, निर्यातीचे आपले सारे जुने विक्रम मोडत आहे. याचा पुरावा म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. आज गाड्यांपासून ते मेट्रोचे डबे, ट्रेनचे डबे आणि संरक्षण साहित्यापर्यंत अनेक क्षेत्रात निर्यात वेगानेे वाढत आहे. भारतात कारखाने वाढत आहेत, त्यात काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळेच हे शक्य होऊ शकले.
मित्रांनो,
उत्पादन आणि पर्यटन ही अशी दोन क्षेत्र आहेत, ज्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. यासाठी केंद्र सरकारही खूपच व्यापक काम करत आहे. जगभरातील कंपन्यांनी भारतात यावे, भारतात आपले कारखाने उभारावेत आणि जगाची मागणी पूर्ण करावी, यासाठीच्या प्रक्रिया देखील सुलभ केल्या जात आहेत. सरकारने, उत्पादनाच्या आधारावर प्रोत्साहन देण्यासाठी, पीएलआय योजना देखील राबवली आहे. जितके जास्त उत्पादन तितके अधिक प्रोत्साहन हे भारताचे धोरण आहे. याचे उत्तम परिणाम आज अनेक क्षेत्रात दिसणे सुरू देखील झाले आहे. गेल्या काही वर्षात 'ईपीएफओ'ची जी आकडेवारी येत आहे, ती देखील हेच सांगत आहे की, रोजगाराबाबत सरकारच्या धोरणांमुळे किती लाभ झाला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुमारे 17 लाख लोक 'इपीएफओ'शी जोडले गेले आहेत. म्हणजे हे लोक देशाच्या मुख्य प्रवाहातील अर्थव्यवस्थेचा भाग बनले आहेत. यातही सुमारे आठ लाख असे आहेत, जे 18 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.
मित्रांनो,
पायाभूत सुविधांच्या निर्माणामुळे रोजगार निर्माणाची देखील एक खूप मोठी संधी असते, एक खूप मोठी बाजू असते आणि जगभरातील लोकांची मान्यता आहे की, होय, हे असे क्षेत्र आहे जे रोजगार वाढवते. गेल्या आठ वर्षात देशभरात हजारो किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण झाले आहे. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम झाले आहे. रेल्वेच्या गेज परिवर्तनाचे काम झाले आहे. रेल्वेत विद्युतीकरणावर देशभरात काम केले जात आहे. देशात नवीन विमानतळ बनत आहेत. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. नवीन जलमार्ग बनत आहेत. संपूर्ण देशभरात ऑप्टिकल फायबर जाळ्यांचे मोठे अभियान राबवले जात आहे. लाखो आरोग्य केंद्र उभारले जात आहेत, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन कोटींपेक्षा अधिक घरे देखील तयार केली आहेत. आज संध्याकाळी धनत्रयोदशीच्या दिवशी मी जेव्हा मध्य प्रदेशातील साडेचार लाख बंधूभगिनींना आपल्या हक्काच्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करेन तेव्हा, मी यावर विस्ताराने बोलणार आहे. मी तुम्हालाही आग्रह करीन की, आज संध्याकाळचे माझे भाषण देखील पहावे.
मित्रांनो,
भारत सरकार, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपयांहून अधिकचे लक्ष ठेवून वाटचाल करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे स्थानिक पातळीवर तरुणांकरिता रोजगाराच्या लाखो संधी निर्माण करत आहेत. आधुनिक पायाभूत सुविधांकरता होत असलेली ही सगळी कामे, पर्यटन क्षेत्राला देखील नवीन ऊर्जा देत आहेत. श्रद्धास्थाने, अध्यात्मस्थळे आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थानांना देखील देशभरात विकसित केले जात आहे. हे सगळे प्रयत्न रोजगार निर्माण करत आहेत. दुर्गम भागात देखील तरुणांना संधी उपलब्ध करत आहेत. एकूणच देशात अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याकरिता केंद्र सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे.
मित्रांनो,
देशातील तरुण वर्गाला आम्ही आपली सगळ्यात मोठी शक्ती मानतो. स्वातंत्र्याच्या अमृतकालात विकसित भारताच्या निर्माणाचे सारथी आपले तरुण आहेत, आपण सर्व आहात. ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळाले आहे, त्यांना मी खास करून सांगेन की, आपण जेव्हा कार्यालयात याल, तेव्हा आपल्या कर्तव्यपथाचे नेहमी स्मरण ठेवा. तुम्हाला जनतेच्या सेवेकरीता नियुक्त केले जात आहे. एकविसाव्या शतकातील भारतात सरकारी सेवा सुविधांचेे नाही, तर वेळेच्या आत काम करत, देशातील कोट्यवधी लोकांच्या सेवेची ही वचनबद्धता आहे, एक सुवर्णसंधी आहे. स्थिती, परिस्थिती कितीही कठीण असो, सेवाभाव आणि वेळेच्या मर्यादेला आपण सर्व मिळून कोणत्याही स्थितीत कायम राखण्याचा प्रयत्न करु. मला विश्वास आहे की आपण हा मोठा संकल्प लक्षात ठेवून सेवाभावाला सर्वोच्च प्राधान्य द्याल. लक्षात ठेवा, तुमचे स्वप्न आजपासून सुरू झाले आहे, ते विकसित भारतासोबतच पूर्ण होईल. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नियुक्ती पत्र जीवनाच्या एका नव्या प्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास आहे की आपण माझे दृढ सहकारी बनून, आपण सर्व मिळून, देशाच्या सर्वसामान्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही. धनत्रयोदशीचा पवित्र सण आहे. आपल्या इथे याचे अत्यंत महत्त्व देखील आहे. दिवाळी देखील येत आहे. म्हणजे हा एक सणाचा क्षण आहे. त्यावेळी आपल्या हाती हे पत्र असणे, आपल्या सणांना अधिक उमेद आणि उत्साहाने भारून टाकणारे आहे. सोबतच एका संकल्पाला देखील जोडणारे आहे. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी संकल्पाचे आहे. अमृत काळातील 25 वर्ष, तुमच्या जीवनातील देखील 25 वर्ष, महत्वपूर्ण 25 वर्ष. या! मिळून देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊया. माझ्या खूप- खूप शुभेच्छा खूप- खूप धन्यवाद.
***
S.Pophale/N.Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870432)
Visitor Counter : 301
Read this release in:
Kannada
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam