पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील अडालज येथे मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
19 OCT 2022 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
नमस्कार,
तुम्ही सगळे कसे आहात? हो, आता कोठे चैतन्य निर्माण झाले आहे.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारचे मंत्री, शिक्षण जगतातील सर्व दिग्गज, गुजरातचे हुशार विद्यार्थी मित्र, इतर सर्व मान्यवर, भगिनीं आणि सज्जनहो!
आज गुजरात अमृतकाळाच्या अमृत पिढीच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत आहे. विकसित भारतासाठी विकसित गुजरात बनवण्याच्या दिशेने हा मैलाचा दगड ठरणार आहे. मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू झाल्याबद्दल, मी गुजरातमधील सर्व लोकांचे, सर्व शिक्षकांचे, सर्व तरुण सहकाऱ्यांचे, इतकेच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांचेही अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
अलिकडेच देशाने मोबाईल आणि इंटरनेटच्या 5व्या पिढीत म्हणजेच 5G च्या युगात प्रवेश केला आहे. आपण 1G ते 4G पर्यंत इंटरनेट सेवा वापरल्या आहेत. आता 5G तंत्रज्ञान देशात मोठा बदल घडवून आणणार आहे. प्रत्येक पिढीबरोबर केवळ वेग वाढला नाही, तर प्रत्येक पिढीने जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.
मित्रांनो,
याचप्रमाणे आपण देशामधील शाळांमध्ये विविध पिढ्यांमध्ये झालेली स्थित्यंतरे पाहिली आहेत. आज 5G, स्मार्ट सुविधा, स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट अध्यापन याच्या पलीकडे जाऊन आपली शिक्षण प्रणाली नव्या स्तरावर नेईल. आता व्हर्च्युअल रिअॅलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, त्याची ताकद आपली लहान लहान बालके, आपले विद्यार्थीही त्यांच्या शाळांमध्ये अगदी सहज अनुभवू शकतील. मला आनंद आहे की यासाठी गुजरातने देशभरातील मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्सच्या रूपात खूप मोठे आणि महत्त्वाचे आणि पहिले पाऊल टाकले आहे. मी भूपेंद्र भाई, त्यांचे सरकार, त्यांच्या संपूर्ण टीमचेही अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांत शिक्षण क्षेत्रात जो बदल झाला आहे, तो अभूतपूर्व आहे. 20 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की गुजरातमध्ये 100 पैकी 20 मुले शाळेत जात नव्हती. म्हणजेच एक पंचमांश मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. आणि शाळेत जाणाऱ्या बऱ्याच मुलांपैकी खूप सारी मुले आठवी पर्यंत पोहोचेपर्यंत शाळा सोडत असत. आणि मुलींची अवस्था याहीपेक्षा बिकट होती हेही दुर्दैव. अशी अनेक गावे होती जिथे मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. मोजकीच अभ्यासाची केंद्रे असलेल्या आदिवासी भागात विज्ञान शिकविण्याची सोय नव्हती. आणि मला सांगायला आनंद होत आहे, मी विशेषतः जितू भाई आणि त्यांच्या टीमच्या कल्पकतेचे अभिनंदन करतो. कदाचित जिथून तुम्ही पाहत असाल, तिथून व्यासपीठावर काय चालले आहे, ते समजले नसते. पण ते तुम्हाला सांगावे असे मला वाटते.
आत्ता मला भेटलेल्या मुलांनी 2003 या वर्षी प्रथमच शाळेत प्रवेश केला होता आणि मी त्याच सुमारास एका आदिवासी गावात गेलो होतो. 40-45 अंश इतके तापमान होते. 13, 14 आणि 15 जून हे ते दिवस होते आणि ज्या गावात मुलांचे आणि मुलींचे शिक्षण सर्वात कमी होते , त्या गावात मी गेलो होतो. आणि मी गावात भिक्षा मागायला आलोय असं सांगितलं. आणि तुम्ही मला भिक्षा देऊन वचन द्या कि मला माझ्या मुलींना शिकवायचे आहे आणि तुम्ही तुमच्या मुलींना शिकवाल. आणि या आधीच्या कार्यक्रमात ज्या लहानग्यांच्या बोटांना धरून मी तेव्हा शाळेत घेऊन गेलो होतो, त्यांना भेटण्याची मला संधी मिळाली. या निमित्ताने सर्वप्रथम मी त्यांच्या पालकांना वंदन करतो, कारण त्यांनी माझे म्हणणे ऐकले. मी त्यांना शाळेत नेले, पण त्याचे महत्व समजून त्यांनी मुलांना जमेल तसे शिकवले आणि आज ती मुले स्वत:च्या पायावर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुलांना भेटल्यानंतर मला त्यांच्या पालकांचे विशेष आभार मानावेसे वाटतात. आणि गुजरात सरकारचे, जितूभाईंचे अभिनंदन, की आज या मुलांना भेटण्याची संधी मला मिळाली, ज्यांचे बोट धरून मला शिकवण्याचे सौभाग्य मिळाले होते.
मित्रांनो,
या दोन दशकांत गुजरातच्या जनतेने आपल्या राज्यातील शिक्षण पद्धतीचा कायापालट करून दाखवला आहे. या दोन दशकात गुजरातमध्ये 1.25 लाखांहून अधिक नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या, 2 लाखांहून अधिक शिक्षकांची भरती करण्यात आली. शाळा प्रवेशोत्सव आणि कन्या केलवणी महोत्सव सुरू झाला तो दिवस मला अजूनही आठवतो. मुला-मुलींच्या शालेय प्रवेशाचा तो पहिला दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा व्हावा, असा प्रयत्न होता. कुटुंबात,परिसरात ,गावागावात एखाद्या सणाप्रमाणे उत्साह असावा , कारण आपण देशाच्या नव्या पिढीला साक्षर आणि संस्कारीत करण्याची सुरुवात करत आहोत. मुख्यमंत्रीपदी असताना मी स्वतः गावोगावी जाऊन सर्व लोकांना आपल्या मुलींना शाळेत पाठवण्याची विनंती केली आणि त्याचाच हा परिणाम आहे की आज गुजरातमधील जवळपास प्रत्येक मुलगा-मुलगी शाळेत जाऊ लागली आहेत, शालेय शिक्षणानंतर आता महाविदयालयात जात आहेत.
मित्रांनो,
यासोबतच आम्ही शिक्षणाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त भर दिला आहे, निकालावर भर दिला आहे. म्हणूनच आम्ही प्रवेशोत्सवासोबतच गुणोत्सवाची सुरूवात केली होती. दर्जेदार शिक्षण, मला चांगले आठवते की गुणोत्सवात प्रत्येक विद्यार्थ्याचे, त्याच्या क्षमतेचे, त्याची आवड, त्याची नावड या गोष्टींचे तपशीलवार मूल्यमापन करण्यात आले.
मी गुजरातच्या सर्व अधिकाऱ्यांचे, गुजरात सरकारचे, गुजरातच्या क्रीडा जगतातील सर्व लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
दशकभरापूर्वी गुजरातमध्ये 15,000 शाळांमध्ये टीव्ही पोहोचला होता.20 हजारांहून अधिक शाळांमध्ये संगणक आधारित अध्ययन प्रयोगशाळा, अशा अनेक व्यवस्था अनेक वर्षांपूर्वीच गुजरातच्या शाळांचा अविभाज्य भाग बनल्या होत्या.आज गुजरातमध्ये 1 कोटीहून अधिक विद्यार्थी आणि 4 लाखांहून अधिक शिक्षकांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यात आली आहे. नवनवीन प्रयोगांची ही मालिका सुरू ठेवत आज गुजरातमधील 20 हजार शाळा शिक्षणाच्या 5जी युगात प्रवेश करणार आहेत.मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स अंतर्गत 50 हजार नवीन वर्गखोल्या, एक लाखांहून अधिक स्मार्ट वर्गखोल्या या शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत.या शाळांमध्ये आधुनिक डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधा तर असतीलच, पण मुलांच्या जीवनात आणि त्यांच्या शिक्षणात मोठा बदल घडवून आणण्याची ही मोहीम आहे. इथे मुलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक बाजूने , प्रत्येक पैलूवर काम केले जाईल. म्हणजेच विद्यार्थ्याची ताकद काय आहे, सुधारणेला वाव काय आहे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
मित्रांनो,
5जी तंत्रज्ञानामुळे या व्यवस्थेचा फायदा अगदी सहज होणार आहे.आणि सोप्या शब्दात कोणालाही समजावून सांगायचे असेल तर, सामान्य माणसाला वाटते की पूर्वी 2जी होते , 4जी होते, 5जी झाले. असे नाही, जर मी 4जी ला सायकल म्हणतो, जर मी सायकल म्हटले तर 5जी हे विमान आहे, हा फरक आहे. खेड्यापाड्यातील भाषेत तंत्रज्ञान समजावून सांगायचे असेल तर मी म्हणेन. 4जी म्हणजे सायकल, 5जी म्हणजे तुमच्याकडे विमान आहे, त्यात हेच सामर्थ्य आहे.
आता गुजरातचे अभिनंदन यासाठी करायचे आहे की, या 5जी चे सामर्थ्य लक्षात घेऊन, गुजरातने याचा उपयोग आधुनिक शिक्षणासाठीच्या उत्कृष्टता अभियानासाठी केला आहे. ही गुजरातचे भाग्य बदलणारी ही गोष्ट आहे.आणि यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार शिकण्याची संधी मिळेल.विशेषत: दुर्गम गावातील शाळांमधील शिक्षणासाठी याची मोठी मदत होईल.दूरवर जिथे उत्तम शिक्षकांची खूप गरज आहे तिथे ते सहज उपलब्ध होतील. सर्वोत्तम वर्ग घेणारी व्यक्ती हजारो किलोमीटर दूर असली तरी असे वाटेल की, माझ्यासमोर बसून मला ती शिकवत आहे. प्रत्येक विषयातील सर्वोत्कृष्ट शिक्षण सामग्री प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेल. विविध कौशल्ये शिकवणारे उत्तम शिक्षक आता एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या गावात आणि शहरात बसलेल्या मुलांना एकाच वेळी आभासी माध्यमातून प्रत्यक्ष वेळी शिकवू शकतील आणि अभ्यास घेऊ शकतील. यामुळे सध्या विविध शाळांमध्ये जी दरी दिसून येत आहे, ती दरीसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल.
अंगणवाडी आणि बालवाडीपासून ते करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीपर्यंत, या अत्याधुनिक शाळा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतील.कला, हस्तकला, व्यवसायापासून ते कोडींग आणि रोबोटिक्सपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण लहानपणापासून येथे उपलब्ध असेल. म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रत्येक पैलू इथे प्रत्यक्षात आणला जाईल.
बंधु आणि भगिनींनो,
आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे केंद्र सरकार संपूर्ण देशात अशाच प्रकारच्या बदलांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही देशभरात साडे 14 हजारांहून अधिक पीएम श्री शाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.हा एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आहे, भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात हा प्रकल्प सुरू केला जाईल, त्याचे निरीक्षण केले जाईल आणि आणि वर्षभरात त्यात काही उणिवा असतील तसेच त्यात काही भर घालायची असल्यास , बदलत्या तंत्रज्ञानाची त्याच्याशी जोडायची गरज भासल्यास, त्यात बदल करून परिपूर्ण मॉडेल तयार करून ते देशातील जास्तीत जास्त शाळांपर्यंत नेण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाईल. या शाळा देशभरातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी आदर्श शाळा असतील.
केंद्र सरकार या योजनेवर 27 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या प्रकारे महत्वाचा विचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, मुलांना त्यांच्या भाषेत चांगले शिक्षण देण्याचा दृष्टिकोन असेल , या शाळा तो प्रत्यक्षात आणतील. . एक प्रकारे या शाळा उर्वरित शाळांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील.
मित्रांनो.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीचा संकल्प केला आहे. देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढून प्रतिभा आणि नवोन्मेषला प्रोत्साहित करण्याचा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रयत्न आहे. आता बघा देशात काय परिस्थिती होती.इंग्रजी भाषेचे ज्ञान हे बुद्धिमत्तेचे मोजमाप म्हणून मानले जायचे तर भाषा हे केवळ संवादाचे माध्यम राहिले. पण इतकी दशके भाषेचा असा अडसर निर्माण झाला होता, की देशातील खेड्यापाड्यातील आणि गरीब कुटुंबातील प्रतिभा संपन्नतेचा लाभ देशाला मिळू शकला नाही. न जाणो किती हुशार मुले , देशवासीय डॉक्टर, अभियंते होऊ शकले नाहीत कारण त्यांना समजत असलेल्या भाषेत शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही.आता ही परिस्थिती बदलली जात आहे. आता भारतीय भाषांमध्येही विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळू लागला आहे.
गरीब आई आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत शिकवू शकत नसली तरीही ती मुला-मुलींना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहू शकते.आणि मूल त्याच्या मातृभाषेतही डॉक्टर होऊ शकते.त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. जेणेकरून गरिबांच्या घरातही डॉक्टर तयार व्हावेत. गुजरातीसह अनेक भारतीय भाषांमध्ये अभ्यासक्रम तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विकसित भारतासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. देशात असा कोणीही नसावा की जो कोणत्याही कारणाने वंचित राहील. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामागची हीच भावना आहे आणि हीच भावना पुढे नेली पाहिजे.
मित्रांनो,
प्राचीन काळापासून शिक्षण हा भारताच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. आपण स्वभावाने ज्ञानाचे समर्थक आहोत.आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ज्ञान-विज्ञानात ठसा उमटवला, शेकडो वर्षांपूर्वी, जगातील सर्वोत्तम विद्यापीठे बांधली गेली, भव्य ग्रंथालये स्थापन झाली. तथापि, पुन्हा एक काळ असा आला जेव्हा आक्रमणकर्त्यांनी भारताची ही संपत्ती नष्ट करण्याची मोहीम सुरू केली.पण भारताने शिक्षणाबाबतचे आपले भक्कम इरादे सोडले नाहीत.तीव्र इच्छाशक्ती कधीही सोडली नाही . अत्याचार सहन केले, पण शिक्षणाचा मार्ग सोडला नाही.
हेच कारण आहे की आजही ज्ञान-विज्ञानाच्या जगतात, नवोन्मेषाच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख आहे.स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपली प्राचीन प्रतिष्ठा परत आणण्याची संधी आहे.भारतामध्ये जगातील सर्वोत्तम ज्ञान अर्थव्यवस्था बनण्याची अफाट क्षमता आहे, संधीही वाट पाहत आहेत.एकविसाव्या शतकात विज्ञानाशी निगडीत, तंत्रज्ञानाशी निगडीत सर्वात जास्त नवनवीन शोध भारतात असतील,आणि जेव्हा मी म्हणतो, त्याचे कारण माझ्या देशातील तरुणांवर, माझ्या देशातील तरुणांच्या प्रतिभेवर असलेला विश्वास आहे, म्हणूनच मी हे सांगण्याचे धाडस करत आहे.आणि जेव्हा हे मी म्हणतो, त्याचे कारण माझ्या देशातील तरुणांवर, माझ्या देशातील तरुणांच्या प्रतिभेवर असलेला माझा विश्वास आहे, म्हणूनच मी हे सांगण्याचे धाडस करत आहे.
त्यातही गुजरातला मोठी संधी आहे.गुजरातची आजवर काय ओळख होती, आम्ही व्यापारी. व्यावसायिक . एका ठिकाणाहून माल घ्यायचा दुसऱ्या ठिकाणी विकायचा आणि मधल्या काळात दलालीतून जे काही मिळायचे त्यातून आपली उपजीविका चालवायची. त्यातून बाहेर पडून गुजरातने हळूहळू उत्पादन क्षेत्रात नाव कमावण्यास सुरुवात केली आहे. आणि आता 21व्या शतकात, गुजरात देशाचे ज्ञानाचे केंद्र , नवोन्मेषाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. मला विश्वास आहे की गुजरात सरकारचे मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स ही भावना आणखी वाढवेल.
मित्रांनो,
मला आज या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. अवघ्या तासाभरापूर्वी मी देशाच्या संरक्षण सामर्थ्याशी निगडीत कार्यक्रमात होतो ,तासाभरानंतर मला देशाच्या, गुजरातच्या ज्ञान सामार्थ्याच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.आणि आता मी इथून जुनागड, मग राजकोटला जाणार आहे.तेथे मला समृद्धीच्या क्षेत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मिळेल.
मित्रांनो,
आजच्या या महत्त्वाच्या प्रसंगी मी पुन्हा एकदा गुजरातच्या विद्या जगताला , गुजरातच्या भावी पिढीला, त्यांच्या पालकांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, ही एक महत्त्वाची संधी आहे, यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. भूपेंद्र भाई आणि त्यांच्या टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
धन्यवाद !
* * *
G.Chippalkatti/S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869586)
Visitor Counter : 202
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam