युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज दिल्लीतील चांदणी चौकातून ‘स्वच्छ भारत 2022’ अंतर्गत संपूर्ण भारतभर महा स्वच्छता मोहिमेचा केला प्रारंभ
स्वच्छ भारत 2022 अंतर्गत अवघ्या 18 दिवसांत देशभरातील सर्व जिल्ह्यांतून 84 लाख किलो प्लॅस्टिक कचरा गोळा केला : अनुराग सिंह ठाकूर
स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय नवभारताचे, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही : अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
19 OCT 2022 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह यांनी आज दिल्लीतील चांदणी चौकातून ‘स्वच्छ भारत 2022’ अंतर्गत संपूर्ण भारतभर ‘मेगा क्लिनलीनेस ड्राईव्ह’चा म्हणजेच महा स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. यावेळी उपस्थितांना स्वच्छता प्रतिज्ञाही देण्यात आली. युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे सचिव संजय कुमार आणि मंत्रालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. अशाच प्रकारे स्वच्छता मोहीम देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये आज, 19 ऑक्टोबर 2022 रोजी राबविण्यात येत आहे.
याप्रसंगी बोलताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, स्वच्छ भारत हा केवळ एक कार्यक्रम नसून तो सामान्य माणसाच्या दृष्टीने खर्या प्रश्नांचे प्रतिबिंब आहे आणि या समस्येचे निराकरण करण्याचा हा संकल्प आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच 'जन भागीदारी से जन आंदोलन' चा पुनरुच्चार केला आहे आणि कोणतीही मोहीम तरुणांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे. ते पुढे म्हणाले की, स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय नवभारताचे, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही.
केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, एक कोटी किलो कचरा संकलन करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात झाली. आम्ही 18 दिवसांत 84 लाख किलो प्लॅस्टिक कचरा गोळा केला आहे. एकूणच कचऱ्याचे प्रचंड प्रमाण पाहिले आणि एका महिन्याच्या कालावधीचा विचार केला तर आम्ही निश्चित केलेले उद्दिष्ट नक्कीच ओलांडणार आहोत, हे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, समाज केंद्रे, शाळा, गावे आणि इतर ठिकाणी हे काम करण्यात आले. लोक विशेषत: तरुण, कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेले असतील तरी ते स्वतः कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच इतरांना स्वेच्छेने कार्यक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना ठाकूर म्हणाले की, स्वच्छतेशिवाय आपण लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करू शकत नाही. आपल्याला ‘स्वच्छ भारत’चे दूत व्हायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी जनजागृती करून लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आगामी दिवाळी सण लक्षात घेऊन तरूणांनी दोन दिवस आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी समर्पित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
अनुराग सिंह ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून महिनाभर चालणा-या देशव्यापी ‘स्वच्छ भारत 2022 कार्यक्रमाला प्रारंभ केला होता. नेहरू युवा केंद्र संगठन (एनवायकेएस) आणि संलग्न यूथ क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेशी संबंधित संस्थांच्या माध्यमाद्वारे देशभरातील 744 जिल्ह्यांतील 6 लाख गावांमध्ये स्वच्छ भारत 2022 कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
युवा व्यवहार विभागामार्फत स्वच्छ भारत 2022 च्या मोहिमेतून युवा संघटनांना एकत्रित करणे हाही यामागचा उद्देश आहे. एनवायकेएस आणि एनएसएस या युवांच्या संस्था असून देशभरातील सर्व गावांमध्ये कार्यक्रम आयोजित करून मोहिमेत मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपक्रम अधिक जोमाने राबविण्यात येत आहे.
अगदी लहान प्रमाणावर प्रारंभ करण्यात आलेल्या प्रयत्नांमधूनही खूप प्रचंड, मोठे परिवर्तन होऊ शकते. विभागातर्फे सुरू झालेल्या स्वच्छ भारत कार्यक्रमातून होत असलेले मोठे कार्य दिसून येत आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवकांकडून ही मोहीम राबविली जात आहे.
हा स्वच्छता कार्यक्रम व्याप्ती आणि पोहोच या दोन्ही दृष्टीने वैशिष्ठ्यपूर्ण आहे. तसेच युवावर्गाची भागिदारी ते लोक आंदोलन असे स्वरूप त्याला आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि युवकांनी केलेले काम टिकाऊ स्वरूपाचे ठरावे, यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे आहे.
या उपक्रमाचे मुख्य प्रेरक घटक, सर्व भागधारक समन्वय साधून आणि एकत्रितपणे काम करीत आहेत. यामध्ये विविध विभाग/संस्था, सीबीओ आणि नागरी संस्था संघटना असून त्या एकल वापराच्या प्लॅस्टिकचे उच्चाटन आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याचे समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येत आहेत.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869280)
Visitor Counter : 234