राष्ट्रपती कार्यालय

गुजरात विद्यापीठाच्या महिला उद्योजकांसाठीच्या ‘हर-स्टार्ट’ या स्टार्ट-अप मंचाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन


गुजरात सरकारच्या शिक्षण आणि आदिवासी विकासाबाबतच्या विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन/पायाभरणी

Posted On: 04 OCT 2022 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 4 ऑक्टोबर 2022 रोजी अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या ‘हर-स्टार्ट’ या स्टार्ट-अप मंचाचे उद्घाटन केले. गुजरात सरकारच्या शिक्षण आणि आदिवासी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन/पायाभरणी देखील त्यांनी गुजरात विद्यापीठामधून दूरदृष्य-प्रणालीच्या माध्यमातून केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह सुद्धा या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत, ही गुजरात विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.  

डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारखे माजी विद्यार्थी असलेली ही संस्था विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात अग्रेसर असणे स्वाभाविक आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. गुजरात विद्यापीठाच्या परिसरात 450 पेक्षा जास्त स्टार्ट-अप कार्यरत असल्याचे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील 125 पेक्षा जास्त स्टार्ट-अप्सना विद्यापीठाचे सक्रीय सहाय्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याशिवाय, सुमारे 15,000 महिला उद्योजक ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. अशा स्टार्ट-अप साठी अनुकूल विद्यापीठात महिला उद्योजकांसाठी समर्पित स्टार्ट-अप मंचाचे उद्घाटन करताना आपल्याला आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. हे व्यासपीठ केवळ नवोन्मेष आणि महिला उद्योजकांच्या स्टार्ट-अपच्या प्रयत्नांना चालना देणार नाही, तर महिला उद्योजकांना विविध सरकारी आणि खासगी उद्योगांशी जोडण्याचा प्रभावी मंच म्हणून काम करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनच विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष, या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याचा पाया रचला जाईल, त्यामुळे गुजरातमधील शिक्षणाशी संबंधित, विशेषत: मुली आणि आदिवासींच्या शिक्षणाशी संबंधित सैनिक शाळा, मुलींच्या साक्षरतेसाठीच्या निवासी शाळा आणि एकलव्य आदर्श निवासी शाळा अशा प्रकल्पांचे उद्घाटन करताना देखील आपल्याला आनंद वाटतो आहे, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.    

गुजरात राज्याने इतर क्षेत्रांबरोबर शिक्षण क्षेत्रात देखील उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या दोन दशकांमध्ये राज्यातील शाळांमधले विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 22 टक्क्यांवरून 1.37 टक्क्यांवर आले आहे. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर देखील 40 वरून 26 इतके सुधारले आहे. आजघडीला 'विद्या परीक्षण केंद्रा'च्या माध्यमातून सुमारे 55,000 शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले जाते आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान ग्रहणामध्ये प्रगती होत आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘उत्कृष्टता शाळा अभियाना’ अंतर्गत पुढच्या पाच वर्षांत राज्यातल्या सुमारे 20,000 शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.  

गुजरातने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देखील लक्षणीय प्रगती केली आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. 2001-02 सालात राज्यात 775 महाविद्यालये होती.  यात वाढ होऊन 2020-21 मध्ये राज्यातील महाविद्यालयांची संख्या 3,100 पेक्षा जास्त झाली आहे. उच्च शिक्षणाच्या मूल्यमापनासाठी या राज्यात, भारतातील पहिला शैक्षणिक गुणवत्ता आणि देखरेख कक्ष 'गरिमा सेल' स्थापन करण्यात आला आहे. ‘वन बंधू-कल्याण योजनेच्या’ प्रभावी अंमलबजावणीमुळे आदिवासी समाजामधील साक्षरतेच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. या योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

गेल्या दोन दशकांमध्ये गुजरात हे विकासाच्या अनेक निकषांवर आघाडीचे राज्य ठरले आहे.  या राज्याने उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधांच्या सर्वसमावेशक विकासामध्ये आपला दर्जा सर्वांसमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.  

प्रत्येक राज्याचे स्वतःचे विकासाचे मॉडेल असते, जे राज्याची साधन संपत्ती आणि गरजांवर अवलंबून असते. पण गुजरातने ज्या पद्धतीने सर्वांगीण प्रगती केली आहे, त्यामधून इतर राज्यांना सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवला आहे. एकमेकांकडून शिकत एकमेकांची यशस्वी मॉडेल स्वीकारत सर्व राज्यांनी आगेकूच केली, तर अमृत-काळात भारत एक विकसित देश म्हणून आपले स्थान निश्चित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

M.Pange/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865088) Visitor Counter : 175