युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

किरेन रिजीजू, अनुराग सिंग ठाकूर यांनी गांधी जयंतीनिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 चा केला प्रारंभ

Posted On: 02 OCT 2022 5:08PM by PIB Mumbai

 

गांधी जयंतीनिमित्त आज रविवारी सकाळी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानात (स्टेडियममध्ये) फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 ला प्रारंभ झाला.  कोविड-19 महामारीचा  मोठ्या प्रमाणावर प्रसार होत होता,   तयावेळी म्हणजे 2020 मध्‍ये  केन्द्र सरकारने  या सर्वात मोठ्या देशव्यापी चळवळींपैकी एक असलेल्या मोहिमेची सुरुवात केली होती.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू तसेच केंद्रीय मंत्री युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी संयुक्तपणे चालवलेल्या फिट इंडिया- प्लॉगसह या दौडची सुरुवात  करण्यात आली. फिट इंडिया फ्रीडम रनचं हे तिसरं वर्ष असून आज, २ ऑक्टोबरला सुरू  झालेली ही दौड ३१ ऑक्टोबरपर्यंत चालेल.

माजी केन्द्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन गोयल, क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, फिट इंडियाचे सदिच्छादूत रिपू दमन बेवली तसेच क्रीडा मंत्रालय आणिक्रीडा प्राधिकरणाचे-  साईचे इतर अधिकारी आणि लोक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करत किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया चळवळ सुरू केली, तेव्हा त्यांची ध्येयदृष्टी संपूर्ण देशाला तंदुरुस्त बनवण्याची होती. इतक्या वर्षाने आता या चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे. प्रत्येकजण आता या चळवळीत सामील होण्यास इच्छुक आहे आणि फिट इंडिया मोबाईल अॅप देखील दररोज मोठ्या उत्साहाने डाउनलोड केले जात आहे.

रिजीजू यांच्याच वक्तव्याचा धागा पकडत अनुराग सिंग ठाकूर यांनी नमूद केले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते अमृतकालापर्यंत, भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नांसाठी आपल्याला काम करत राहावे लागेल. आपल्या तंदुरुस्तीविषयक सर्व बाबींचा स्तर नव्या उंचीवर नेणे हा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा पहिला मार्ग आहे.

यंदाच्या फ्रीडम रनमधे विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले. गांधी जयंतीच्या दिवशी या मलिकेतली ही तिसरी यशस्वी दौड सुरु करून एकता दिवस अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी तिचा समारोप करण्याइतका दुसरा चांगला योग नाही. गेल्या वर्षी एकूण 9 कोटी 30 लाख लोक यात सहभागी झाले होते. यंदा ही संख्या  दुप्पट करण्यासाठी आपल्याला फिट फ्रीडम रन 3.0 ला खूप पाठबळ द्यावे लागेल असे ते म्हणाले.

फिट इंडिया फ्रीडम रनमधे, गेल्या दोन वर्षांत, भारतीय सशस्त्र दलांसह सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), भारतीय रेल्वे, सीबीएसई आणि आयसीएसई शाळा तसेच युवा कार्य मंत्रालयाची युवा शाखा, नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांनी सहभाग घेतला आहे.

***

S.Bedekar/V.Ghode/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864501) Visitor Counter : 160