राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 केले प्रदान

Posted On: 01 OCT 2022 9:14PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (1 ऑक्टोबर 2022) नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रदान केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्या शहरांचे रहिवासी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे अभिनंदन केले. इंदूर शहराने सलग सहाव्यांदा पहिला क्रमांक पटकावल्याचे त्यांनी नमूद केले. इंदूर शहरातील रहिवाशांनी स्वीकारलेल्या लोकसहभागाचे मॉडेल देशभरातील इतर शहरांनीही स्वीकारावे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वच्छ सर्वेक्षण, राज्य आणि शहरांमध्ये स्वच्छतेसाठीच्या स्पर्धेला प्रोत्साहन देत आहे.  यंदाच्या सर्वेक्षणात 4000 हून अधिक शहरांमधील सुमारे नऊ कोटी लोकांनी भाग घेतला असल्याचेही  त्यांनी नमूद केले.  नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत व्यापक स्तरावर जनजागृती केल्याबद्दल राष्ट्रपतींनी गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे कौतुक केले.

 'स्वच्छ भारत अभियानाच्या ' यशामागे केंद्र आणि राज्य सरकारे तसेच सर्व नागरिकांचे गेल्या आठ वर्षातील सातत्यपूर्ण  प्रयत्न असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.   हे यश मिळवण्यात आमच्या सफाई मित्रांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्या म्हणाल्या. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी स्वच्छता राखण्यासाठी सतत काम केले.

वर्ष 2026 पर्यंत सर्व शहरे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी, 1 ऑक्टोबर रोजी 'स्वच्छ भारत अभियान -शहर  2.0' ची सुरुवात करण्यात आली, असे राष्ट्रपतींनी सांगितले. योग्य कचरा व्यवस्थापनासाठी, ओला आणि सुका कचरा घरोघरी विलग करण्याबाबत सर्व नागरिकांना जागरूक करण्यासाठी शहरांमध्ये 2 ऑक्टोबर 2022 पासून ही मोहीम राबवण्यात येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आपले रस्ते, गाव, परिसर आणि शहरे स्वच्छ ठेवणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. सर्वांनी विशेषतः तरुणांनी या मोहिमेत सहभागी होऊन समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी  केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

S.Kakade/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864258) Visitor Counter : 416