पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाची केली घोषणा


देसर इथे जागतिक दर्जाच्या “स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचे” पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन

“जेव्हा कार्यक्रम इतका अप्रतिम आणि अद्वितीय असतो, तेव्हा त्यापासून मिळणारी ऊर्जा देखील अनन्यसाधारण असणे स्वाभाविक आहे”-पंतप्रधान

“मैदानावर खेळाडूंचा विजय आणि क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या उत्तम कामगिरीतून, देशाला इतर क्षेत्रात विजयी होण्याचीही प्रेरणा मिळते”

“क्रीडा क्षेत्राची सुप्त शक्ति, देशाची ओळख आणि प्रतिमा कित्येक पटीने उंचावण्याचे काम करते”

“सावज, हा आशियाई सिंहाचा शुभंकर (मॅस्कॉट) भारताच्या युवाशक्तीत, देशाच्या निर्भय सहभागाच्या भावनेचे प्रदर्शन करतो”

“जेव्हा पायाभूत सुविधा दर्जेदार असतात, त्यावेळी, खेळाडूंचे मनोबलही उंचावते”

“आम्ही क्रीडा क्षेत्रासाठी खिलाडूवृत्तीने काम केले टॉप्स सारख्या योजनांच्या माध्यमातून, खेळांसाठी कित्येक वर्षे मिशन मोडवर तयारी केली”

‘फिट इंडिया’आणि ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम आता लोकचळवळ झाले आहेत”

“देशाच्या क्रीडाविषयक आर्थिक तरतुदीत गेल्या आठ वर्षांत सुमारे 70 टक्क्यांची वाढ झाली आहे”

“क्रीडा, भारताचा वारसा आणि हजारो वर्षांच्या प्रगतीचा प्रवासही आहे”

Posted On: 29 SEP 2022 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाची घोषणा केली. तसेच याच कार्यक्रमात त्यांनी देसर इथल्या जागतिक दर्जाच्या, स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचेही’ उद्घाटन केले. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी, उपस्थितांशी संवाद साधतांना, पंतप्रधान म्हणाले की आज या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात असलेले चैतन्यमयी वातावरण शब्दांतीत आहे. या ठिकाणी जाणवणारी ऊर्जा आणि सर्वांच्या भावनांचे वर्णन शब्दांत करता येणे शक्य नाही, असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

या राष्ट्रीय स्पर्धेत 7000 पेक्षा जास्त खेळाडू , 15000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग, 35000 पेक्षा जास्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि शाळा आणि 50 लाखांहून जास्त विद्यार्थ्याचा थेट संबंध, हे आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.  जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये, जगातला इतका तरुण देश आणि देशातला सर्वात मोठा क्रीडा महोत्सव! जेव्हा कार्यक्रम इतका सुंदर आणि अद्वितीय असतो, त्याची उर्जा असामान्य असायलाच हवी, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी स्टेडीयममध्ये उपस्थित प्रत्येकाला उत्साहीत करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय खेळांच्या गीतातली प्रभावी ओळ, ‘जुडेगा इंडिया – जितेगा इंडिया’ म्हणून दाखवले. खेळाडूंच्या चेहऱ्यांवर झळकत असलेला आत्मविश्वास, भारतीय क्रीडा जगताच्या सुवर्णमयी भविष्याची नांदी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  इतक्या कमी वेळात, इतका भव्य सोहळा आयोजित करण्याच्या गुजरातच्या लोकांच्या क्षमतेची देखील त्यांनी प्रशंसा केली.

काल अहमदाबादमध्ये झालेल्या भव्य ड्रोन शो बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा चित्तवेधक कार्यक्रम बघून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला होता आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक केलेला वापर गुजरात आणि भारताला नव्या उंचीवर नेईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 चा शुभंकर (मॅस्कॉट)- सावज, या आशियाई सिंह बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, हा शुभंकर भारताच्या तरुणांच्या मनःस्थितीचे, खेळाच्या मैदानात निर्भीडपणे पाय ठेवण्याच्या उत्कट इछेचे प्रतिबिंब आहे. हे भारताच्या जागतिक स्तरावर वाढत असलेल्या सन्मानाचे देखील प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.

क्रीडा संकुलाच्या वेगळेपणाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, इतर संकुले केवळ काही क्रीडा सुविधांपुरती  मर्यादित असली तरी सरदार पटेल क्रीडा संकुलात फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग आणि लॉन टेनिस यासारख्या अनेक खेळांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. एक प्रकारे हे संपूर्ण देशासाठी एक मॉडेल आहे. जेव्हा पायाभूत सुविधा या दर्जाच्या असतात, तेव्हा खेळाडूंचे मनोबलही वाढते, पंतप्रधान पुढे म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंनी राज्यातील नवरात्री उत्सवाचा आनंद देखील घ्यावा असे आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले की सण हा माता दुर्गेच्या उपासने पलीकडे असतो आणि यावेळी गरब्याचा आनंदोत्सव देखील साजरा होतो. त्याला स्वतःची ओळख आहे. मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय जीवनातील खेळाच्या महत्वाचा पुनरुच्चार केला. खेळाच्या मैदानातील खेळाडूंचा विजय, त्यांची मजबूत कामगिरी, देखील देशाच्या अन्य क्षेत्रांमधील प्रगतीचा मार्ग खुला करते. खेळांची सुप्त शक्ती देशाची ओळख आणि प्रतिमा अनेक पटींनी वाढवते. ते पुढे म्हणाले मी क्रीडा क्षेत्राशी संबंधित माझ्या मित्रांना नेहमी सांगतो- यश हे कृतीने सुरु होते! म्हणजेच, ज्या क्षणी तुम्ही सुरुवात करता, त्याच क्षणी यश देखील सुरु होते. जर तुम्ही पुढे जाण्याची आस सोडली नाहीत, तर यश तुमच्या पाठोपाठ येत राहते.

क्रीडा क्षेत्रात झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, 8 वर्षांपूर्वी भारतातील खेळाडू शंभरहून कमी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत होते. त्या उलट आता भारतामधील खेळाडू सहभागी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांची संख्या 300 वर पोहोचली आहे. 8 वर्षांपूर्वी भारतातील खेळाडू 20-25  क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. आता भारतातील खेळाडू विविध प्रकारच्या अंदाजे 40 स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतात. आज पदकांची संख्या देखील भारताची आभा वाढवत आहे, पंतप्रधान म्हणाले. 

कोविडच्या बिकट काळात देखील, पंतप्रधान म्हणाले की खेळाडूंचे मनोबल कमी होऊ दिले नाही. आम्ही क्रीडा भावनेने खेळांसाठी काम केले. टाॅप्स (TOPS) सारख्या योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे मिशन मोड मध्ये तयारी केली. आज, मोठ्या खेळाडूंच्या यशापासून ते भविष्यातील नवीन खेळाडू घडवण्यापर्यंत, TOPS मोठी भूमिका बजावत आहे. यंदाच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आपली सर्वोत्तम ऑलिम्पिक कामगिरी केल्याचे त्यांनी स्मरण केले. त्याचप्रमाणे थॉमस चषक स्पर्धेतील बॅडमिंटन संघाच्या यशाने नवीन उमेद जागवली. विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील पॅरा-अॅथलीट्सच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. या पुनरुत्थानात महिला खेळाडूंच्या समान आणि मजबूत सहभागाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी हे निदर्शनास आणले की हे यश यापूर्वीही शक्य होते पण भारतीय क्रीडा विश्वाला आवश्यक असलेल्या व्यावसायिकतेऐवजी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने ग्रासले होते. आम्ही ते साफ केले आणि युवा खेळाडूंच्या मनात त्यांच्या स्वप्नांबद्दल आत्मविश्वास वाढवला, ते म्हणाले. नवा भारत केवळ धोरण बनवण्यावर विश्वास ठेवत नसून देशाच्या तरुणांबरोबर जोमाने पुढे जातो असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी फिट इंडिया आणि खेलो इंडियासारख्या प्रयत्नांकडे लक्ष वेधले, जे एक जनआंदोलन बनले आहे.  पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत देशाची क्रीडा क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद जवळजवळ 70 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी अधिकाधिक साधन-सुविधा उपलब्ध होत आहेत आणि खेळाडूंसाठी अधिक संधी निर्माण व्हायला त्याची मदत होत आहे. देशात क्रीडा विद्यापीठे स्थापन केली जात आहेत आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रगत क्रीडा पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मोदी पुढे म्हणाले की, निवृत्त खेळाडूंचे जीवन सुलभ करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. निवृत्त होणाऱ्या खेळाडूंच्या अनुभवांचा फायदा नव्या पिढीला व्हावा, या दिशेनेही काम सुरू आहे.

भारताची सभ्यता आणि संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, खेळ हा  हजारो वर्षांपासून भारताच्या वारशाचा आणि विकास प्रवासाचा महत्त्वपूर्ण भाग राहिला  आहे.  "स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश आपल्या वारशाचा अभिमान बाळगून या परंपरेचे पुनरुज्जीवन करत आहे." असे पंतप्रधान  म्हणाले.  देशाचे प्रयत्न आणि उत्साह केवळ एका खेळापुरते मर्यादित नाहीत, तर 'कलारीपयट्टू' आणि योगासने यांसारख्या भारतीय खेळांनाही महत्त्व प्राप्त होत आहे.  या खेळांचा राष्ट्रीय  क्रिडा स्पर्धांसारख्या मोठ्या आयोजनात समावेश करण्यात आला याचा आपल्याला आनंद आहे, असे ते म्हणाले.  या क्रिडा प्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे.  एकीकडे तुम्ही  हजारो वर्षांची परंपरा पुढे नेत आहात, त्याचवेळी क्रीडा जगताच्या भविष्याला नेतृत्व देखील प्रदान करत आहात.  येणाऱ्या काळात जेव्हा या खेळांना जागतिक मान्यता मिळेल तेंव्हा या क्षेत्रात तुमचे नाव आख्यायिकेच्या रुपात घेतले जाईल.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी थेट खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना यशाचा एक मंत्र दिला.   "जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल, तर वचनबद्धता आणि सातत्य हे गूण तुमच्या अंगी भिनले पाहिजेत." असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.  क्रीडा भावनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी खेळातील पराभव आणि विजय हा कधीही अंतिम निकाल मानू नये असे सूचवले.  खिलाडूवृत्ती  तुमच्या जीवनाचा भाग बनल्यास भारतासारख्या तरुण देशाची स्वप्ने साकार होऊ शकतात, असेही ते म्हणाले. कायम लक्षात ठेवा, जिथे कृती आहे, तिथेच प्रगती घडते असे पंतप्रधानांनी सांगितले.  तुम्हाला मैदानाबाहेरही ही गती राखायची आहे .  ही गती तुमच्या जीवनाचे ध्येय असायला हवे.  मला खात्री आहे की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील  तुमचा विजय देशाला आनंद साजरा करण्याची संधी देईल आणि भविष्यात नवीन आत्मविश्वास देखील निर्माण करेल, असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार  सी आर पाटील, गुजरातचे गृहमंत्री  हर्ष संघवी आणि अहमदाबादचे महापौर किरीट परमार यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

गुजरात राज्यात प्रथमच राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन होत आहेत.  या स्पर्धा 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत. या आयोजनात 36 क्रीडा प्रकारात देशभरातील सुमारे 15,000 खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी सहभागी होणार आहेत, त्यामुळे ही आजवरची सर्वात मोठी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा ठरणार आहे.  अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले  आहे.  गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने आंतरराष्ट्रीय दर्जाची भक्कम क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला होता. त्यामुळेच गुजरातला अतिशय कमी कालावधीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी करणे शक्य झाले आहे.

 

 

 S.Kane /Radhika/Rajashree/Shraddha/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863550) Visitor Counter : 578