माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांना सर्वाधिक धोका प्रमुख वृत्त वाहिन्यांपासूनच : अनुराग ठाकूर


“ध्रुवीकरण करणाऱ्या चर्चात्मक कार्यक्रमामुळे वाहिन्यांची विश्वासार्हता कमी होते, मोडतोड न करता केवळ बातम्यांचे वृत्तांकन करणे हेच पत्रकारांचे कर्तव्य असते.”

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD) 47 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार 2022 प्रदान

Posted On: 20 SEP 2022 10:10AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD)  20 व्या बैठकीचे आणि 47 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी,  माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव, अपूर्व चंद्रा आणि एआयबीडीच्या संचालक फिलोमेना नानाप्रगासम उपस्थित होत्या. 

यावेळी बोलतांना, ठाकूर म्हणाले, की मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांना जर आज कोणाचा सर्वात मोठा धोका असेल, तर ती नव्या युगातील डिजिटल माध्यमे नाहीत, तर प्रसारमाध्यमांना मुख्य धोका या वृत्त वाहिन्या स्वतः आहेत. खरी पत्रकारिता सत्याचा सामना करणे, सत्य लोकांसमोर आणणे आणि आपल्या व्यासपीठावर दोन्ही बाजूंना त्यांचे विचार मांडण्याची समान संधी देणे ही असते, असेही ते पुढे म्हणाले. 

चर्चात्मक कार्यक्रमात अशा वक्त्यांना बोलावणे, जे ध्रुवीकरण करतात, खोटे, दिशाभूल करणारे समज पसरवतात, जे अशा वादविवादात बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, अशा लोकांमुळे वाहिन्यांची  विश्वासार्हता कमी होते, असे मत अनुराग ठाकूर यांनी मांडले. “वक्ते कोण असावेत, कार्यक्रमाचा सूर कसा असावा, दृश्य कशी असावीत याबद्दलचे तुमचे निर्णयच, प्रेक्षकांच्या मनात तुमच्याविषयीची विश्वासार्हता निश्चित करत असतात.कदाचित, एखादा प्रेक्षक, मिनिटभर तुमची चर्चा बघण्यासाठी थांबेलही, मात्र तो कधीही तुमच्या सूत्रसंचालक/निवेदकावर विश्वास ठेवणार नाही. तुमच्या वाहिन्या किंवा ब्रॅंड विश्वासार्ह आणि पारदर्शक बातम्या देणारा स्त्रोत आहे, असे त्याला कधीही वाटणार नाही.” असे ते पुढे म्हणाले. 

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तव्याचा बाईट तुमच्या वाहिनीकडे असेल, तर तेवढ्यावरुन तयार झालेलं मत  दाखवू नका, तर त्या म्हणण्यामागचा उद्देश आणि अर्थ समजून घेत, स्वतः त्याचा अन्वयार्थ लावा, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केले. आपल्या वाहिनीवर येणारे पाहुणे आणि वाहिन्यांसाठीही स्वतःच काही अटी घालून घ्याव्यात अशी सूचनाही त्यांनी केली. 

यावेळी उपस्थित प्रेक्षकांनाच थेट भेदक प्रश्न विचारात, ठाकूर म्हणाले, “तुमच्या युवा प्रेक्षकांनी तुमच्या वाहिन्या बघणे बंद करणे, आणि वाहिन्यांवर चालणाऱ्या किंचाळणाऱ्या चर्चा ऐकून वाहिन्यांपासून दूर जावे, अशी आपली इच्छा आहे का? आपल्याला वृत्तवाहिन्यांतील कार्यक्रम, बातम्या आणि चर्चासत्र यांच्यात पुन्हा एकदा ‘तटस्थता’  आणायची आहे, आणि या प्रसारमाध्यमांच्या जगात टिकून राहायचे आहे, असे ठाकूर यावेळी म्हणाले.” 

कोविड महामारीच्या काळात, सर्व सदस्य राष्ट्रांना ऑनलाईन मार्गाने एकत्रित ठेवण्याचे तसेच कोविड महामारीचा प्रभाव कमी कसा करता येईल, याबद्दल सातत्याने चर्चा करण्याचे श्रेय, ठाकूर यांनी एआयबीडीच्या नेतृत्वाला दिले. 

“वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत माहिती, कोविड लढवय्याच्या सकारात्मक कथा, अशा माहितीच्या देवघेवीतून या काळात एआयबीडीच्या सदस्य देशांना मोठाच लाभ मिळाला. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, महामारीपेक्षाही अधिक वेगाने पसरणाऱ्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रतिवाद करुन, सत्य लोकांसमोर आणण्यात संस्थेची भूमिका महत्वाची होती.” ठाकूर यांनी एआयबीडीच्या संचालक फिलोमेना नानाप्रगासम, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात कोविड महामारीच्या काळात, प्रसारमाध्यमांकडून उत्तम वृत्तप्रसारण सेवा  देण्यासाठी एकत्रित काम केलेल्या सर्व सदस्य राष्ट्रांचे अभिनंदन केले. 

“कोविड महामारी नंतरच्या काळात, प्रसारण सेवेसाठी एका मजबूत भविष्याची उभारणी” या संकल्पनेवर बोलतांना, ठाकूर म्हणाले, “जरी प्रसारण माध्यमे कायमच पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहाचा भाग राहिली आहेत, तरीही, कोविड-19 युगाने, त्याची अधिक धोरणात्मक रित्या सुसंगत रचना केली आहे. योग्य माहिती योग्य वेळी, जर लोकांपर्यंत पोहोचली तर त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतात, हे कोविडने आपल्याला शिकवले. प्रसारमाध्यमांनीच या परीक्षेच्या काळात,  संपूर्ण जगाला एका व्यासपीठावरएकत्र आणले आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ चे तत्व पुन्हा आचरणात आणले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

“भारतीय प्रसारमाध्यमांची कोविड महामारीच्या काळातील भूमिका’ ही एक यशोगाथा आहे, असं सांगत, ते म्हणाले की कोविड-19 विषयी जनजागृती करणारे संदेश, सरकारच्या महत्वाच्या मार्गदर्शक सूचना, डॉक्टरांकडून मोफत ऑनलाईन मार्गदर्शक सेवा-सुविधा देशातल्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची होती.

उत्तम  दर्जा असलेल्या  आशयाच्या  देवाणघेवाणीच्या क्षेत्रात सहकार्य स्थापित करण्याच्या दृष्टीने ठाकूर यांनी सदस्य देशांना प्रोत्साहित केले. .अशा सहकार्याच्या माध्यमातून विनिमय कार्यक्रम हे  जागतिक संस्कृतींना एकत्र आणतात. देशांमधली अशा प्रकारची माध्यम भागीदारी लोकांमध्ये परस्पर  दृढ संबंध निर्माण करण्यासाठी मदत करते, असे ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या सर्व प्रकारच्या स्वरूपात, सक्षमीकरणाचे प्रभावी साधन म्हणून सार्वजनिक धारणा आणि दृष्टीकोनांना आकार देण्याची अपार क्षमता आहे, असे भाषणाच्या शेवटी मंत्र्यांनी अधोरेखित केले. प्रसारमाध्यमांचे अवकाश अधिक सचेत आणि लाभदायी  बनवण्यासाठी आपल्या पत्रकार आणि प्रसारक मित्रांसाठी पोषक  वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे”, असे ते म्हणाले.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेचे (एआयबीडी) अध्यक्ष मयंक अग्रवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, टाळेबंदीच्या  काळातही एआयबीडीने प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी  कार्यक्रम सुरु  ठेवले. गेल्या वर्षभरात 34 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले  आणि  त्यात परंपरेसह  हवामान बदल, हरित तंत्रज्ञान, शाश्वत विकास, जलद वृत्तांकन, मुलांसाठी प्रयोजन इत्यादीसारख्या उदयोन्मुख मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

प्रसारणात इंटरनेटचा वापर वाढल्याने, पत्रकारांना सायबर सुरक्षा पत्रकारितेचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे,हा मुद्दा अग्रवाल यांनी अधोरेखित केला. प्रशिक्षण कार्यक्रमांचा भाग म्हणून या विषयावरील प्रशिक्षणाचा   समावेश करणारी एआयबीडी ही पहिली संस्था आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांचे भवितव्य  हे त्यांच्याकडून निर्माण होणाऱ्या आशयावरून  निश्चित होणार आहे आणि हा आशय कशा प्रकारे सामायिक केला जातो  आणि त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कशाप्रकारे घेतले जाते  हे प्रसारणाचे भविष्य निश्चित करेल, असे फिलोमिना नानाप्रगासम यांनी सांगितले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे  आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींचेही आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली  2021 आणि 2022 च्या पुरस्कारांचे  वितरण करण्यात आले. रेडिओ टेलिव्हिजन ब्रुनेईला 2021 साठीचा  प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर 2022 चा प्रशंसा पुरस्कार अर्थव्यवस्था, नागरी सेवा, दळणवळण, गृहनिर्माण आणि समुदाय विकास मंत्रालय, फिजी प्रजासत्ताक  आणि फिजी प्रसारण महामंडळाला विभागून देण्यात आला.  

2021 चा जीवनगौरव पुरस्कार कंबोडियाचे माहिती आणि दळणवळण मंत्री  खियू खानहरिथ यांना प्रदान करण्यात आला.  प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेचे (एआयबीडी ) अध्यक्ष मयंक अग्रवाल  यांना 2022 साठीचा  जीवनगौरव पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

भारतातील विविध परदेशी मोहिमांचे  प्रमुख, एआयबीडी सदस्य देशांचे प्रतिनिधी, प्रसार भारतीचे अधिकारी आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध खात्यांचे  अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्था  (एआयबीडी) विषयी:

युनेस्कोच्या (UNESCO) संयुक्त विद्यमाने 1977 मध्ये आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेची   (एआयबीडी) स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र आशिया आणि प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UN-ESCAP) मधील देशांना  इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम विकासाच्या क्षेत्रात सेवा देणारी एक अनोखी  प्रादेशिक आंतर-सरकारी संस्था आहे. याचे संचालन मलेशिया सरकारने केले आहे आणि सचिवालय क्वालालंपूर येथे आहे.

एआयबीडीमध्ये सध्या 26 पूर्ण सदस्य (देश) आहेत, ज्यांचे प्रतिनिधित्व 43 संस्था  आणि 50 संलग्न सदस्य (संस्था) करतात यासह  46 देश आणि प्रदेशांचे  प्रतिनिधित्व करणारे असे एकूण 93 सदस्य आणि आशिया, प्रशांत, युरोप, आफ्रिका, अरब देश आणि उत्तर अमेरिकेतील 50 हून अधिक भागीदार आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे एआयबीडीचे  पूर्ण सदस्यत्व आहे. भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक असलेली प्रसार भारती, एआयबीडीच्या विविध सेवांचा उपयोग करते.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860741) Visitor Counter : 315