विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अमेरिका येथे होत असलेल्या जागतिक स्वच्छ उर्जा मंचाच्या बैठकीमुळे भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना जगासमोर मांडण्याची उत्तम संधी मिळणार: केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांचे प्रतिपादन

Posted On: 19 SEP 2022 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

अमेरिकेत होत असलेल्या जागतिक स्वच्छ उर्जा मंचाच्या बैठकीमुळे भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना जगासमोर मांडण्याची उत्तम संधी मिळेल, असे मत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.

उच्च-स्तरावरील मंत्री पातळीवरील संयुक्त अधिकृत प्रतिनिधीमंडळाचे प्रमुख म्हणून 5 दिवसांच्या अमेरिका भेटीवर निघण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की, या बैठकीमुळे विविध देशांतील किमान 30 मंत्री, शेकडो उद्योग प्रमुख आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञ यांच्यासह सर्व संबंधित भागधारक समान मंचावर एकत्र येत असल्यामुळे स्वच्छ ऊर्जेविषयक समस्या सोडविण्यासाठी भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतेलेल्या प्रमुख भूमिकेची ही पोचपावती देखील आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाबाबतच्या आराखडा परिषदेला कळविण्यासाठीच्या भारताच्या अद्ययावत राष्ट्रीय पातळीवर निर्धारित योगदानाच्या माहितीला गेल्याच महिन्यात मंजुरी देण्यात आली, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली.   

इंग्लंडमधील ग्लासगो येथे नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आराखडा परिषदेच्या कॉप26 परिषदेत भारताने आपल्या हवामानविषयक कृतींच्या पाच अमृत घटकांचे (पंचामृत) जगासमोर सादरीकरण करून हवामान बदलाबाबतचे उपक्रम अधिक तीव्र करण्याबाबतचे भारताचे मत व्यक्त केले होते.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2021 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची सुरुवात केली असे सांगून डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की सरकारला हवामानविषयक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आणि भारताला हरित हायड्रोजनचे केंद्र बनविण्यासाठी मदत करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. या मोहिमेमुळे, वर्ष 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजनची निर्मिती करण्याचे आणि पुनर्नवीकरणीय उर्जा क्षमतेचा तत्संबंधित विकास करण्याचे लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की भारताला शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठून देण्याची जबाबदारी  केंद्र सरकारमधील कोणत्याही एका मंत्रालयाच्या खांद्यावर नाही तर, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, नूतन आणि पुनर्नवीकरणीय उर्जा मंत्रालय तसेच अवजड उद्योग मंत्रालय(भारतात विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या ‘फेम’ अर्थात ‘भारतातील मिश्र आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या अधिक वेगवान निर्मिती तसेच वापराचा स्वीकार यासाठी सुरु केलेली योजना राबविण्याची जबाबदारी असलेले मंत्रालय) इत्यादी सर्व मंत्रालये भारताच्या या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांची मोठ्या प्रमाणावर प्रेरक शक्ती बनले आहेत.

जागतिक स्वच्छ उर्जा मंचाच्या सगळ्या गोलमेज बैठका तसेच समारोप सत्रात अत्यंत सखोल विचारमंथन होईल, विशेषतः  देशात आणि विदेशात स्वच्छ उर्जा क्षेत्रात भारत सरकारला नुकत्याच मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये अधिक उत्तम माहिती मिळेल याबाबत आशावादी असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

 

* * *

R.Aghor/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860630) Visitor Counter : 187