रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
गुणात्मक सुधारणांसाठी सर्व संबंधितांमधल्या सहकार्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला भर
Posted On:
08 SEP 2022 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022
गुणात्मक सुधारणांसाठी सर्व संबंधितांमधल्या सहकार्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. 'मंथन - आयडिया टू अॅक्शन' या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आपण प्रत्येकाचा स्वतंत्र विचार न एकत्रित विचार करत मतभेदांवर मात केली पाहिजे. सर्व भागधारकांनी एकमेकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि परस्पर संमतीने भविष्यकालीन धोरणे आखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून देशाची वाहतूक केवळ भारतात बनवलेल्या इंधनावर चालेल असे ते म्हणाले.
भारताला सर्वात विकसित देश बनवण्यासाठी नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी गुणात्मक योगदान आणि दूरदृष्टी असलेला दृष्टीकोन यावर त्यांनी भर दिला. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची बनवायची असेल तर बहुआयामी वाहतूक व्यवस्था केंद्रस्थानी असलेल्या एकात्मिक दृष्टिकोनाचे महत्त्व गडकरी यांनी अधोरेखित केले. 90 टक्के प्रवासी वाहतूक आणि 70 टक्के माल वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो असे सांगून जलमार्ग, रेल्वेमार्ग आणि विमानतळ परस्परांशी जोडलेले असावेत यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाची गरज त्यांनी व्यक्त केली. या स्थितीत लॉजिस्टिक पार्क महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. राज्य सरकारांनी जमीन उपलब्ध करून दिल्यास, रस्ते वाहतूक मंत्रालय लॉजिस्टिक पार्कच्या बांधकामात मदत करेल असे ते म्हणाले. बांधकामाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा करतानाच बांधकाम खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मालवाहतूक खर्च 16 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत (चीन 10 टक्के, युरोप 12 टक्के) कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन आवश्यक आहे. बस-बंदरे ही विकासाची केंद्रे कशी असू शकतात याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे तसेच सामग्रीच्या माध्यमातून रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करताना वाहतुकीची विविध माध्यमे परस्परांशी जोडणे अत्यावश्यक आहे. आपल्या मतदारसंघातील 750 किमी रस्ते कसे खड्डेमुक्त आहेत याचे उदाहरण देताना ते म्हणाले की बिटुमेन आणि सिमेंटचा थर हे रस्त्यांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्याचे मार्ग आहेत. मुंबई महानगरपालिका सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून रस्त्यांचे संपूर्ण सिमेंटीकरण करत आहे. यासाठी सुरुवातीचा खर्च जास्त असू शकतो, परंतु 25 वर्षांसाठी त्याला देखभाल खर्चाची गरज नसेल.
पर्यावरण आणि वन मंत्रालयासह त्यांच्या मंत्रालयाने 'ट्री बँक' अर्थात वृक्ष बँक हा प्रकल्प आणला आहे. या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महामार्गालगत झाडे लावणार आहे. त्यामुळे हरित पट्ट्यांची व्याप्ती वाढेल असे सांगून त्यांनी शाश्वत दृष्टिकोन विषद केला.
मंत्रालयाने 80 लाखांहून अधिक झाडे आणली आहेत, कार्बन डायऑक्साइड शोषणाऱ्या या झाडांमुळे पर्यावरणाला मदत होईल. वन क्षेत्र किंवा हरित पट्टयात भारताचे मानांकन आधीच वधारले आहे. राज्ये आणि केंद्र यांच्यात सहकार्य असावे असे आवाहन त्यांनी केले. फक्त सहा राज्यांनी रिमोटली ऑपरेटेड वाहन प्रकल्पांसाठी 16,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. राज्यांनी त्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे कारण त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे असे गडकरी म्हणाले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री, जनरल (डॉ.) व्ही.के. सिंह यांनी रस्ते वाहतूक क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीचा संदर्भ देत, ही प्रगती थांबणार नाही असे सांगितले.
यावेळी नितीन गडकरी यांनी हॅकेथॉनच्या 10 विजेत्यांची घोषणा केली. रस्ते वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवणारे अॅप्स विकसित करण्यासाठी त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि सहाय्य देण्यात येईल.
N.Chitale /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857814)
Visitor Counter : 211