वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
परिवर्तन तसेच कौशल्य अद्ययावतीकरण यासाठी सॅन फ्रान्सिस्को येथील उद्योजकांना पाठबळ पुरविणाऱ्या ‘सेतू’ या अमेरिकी स्टार्ट अपची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सुरुवात
‘सेतू’ च्या मदतीने भारतातील स्टार्ट अप उद्योग अमेरिका स्थित गुंतवणूकदार आणि स्टार्ट अप परिसंस्थेतील आघाडीच्या उद्योगांशी जोडले जाणार
Posted On:
07 SEP 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरियातील उद्योजकांना पाठबळ पुरविणाऱ्या ‘सेतू’ या अमेरिकी स्टार्ट अपची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या मदतीने भारतातील स्टार्ट अप उद्योग निधीचा पुरवठा, विपणन तसेच व्यावसायिकीकरण यासारख्या विविध क्षेत्रात मार्गदर्शन तसेच मदत करण्याच्या उद्देशाने अमेरिका स्थित गुंतवणूकदार आणि स्टार्ट अप परिसंस्थेतील आघाडीच्या उद्योगांशी जोडले जाणार आहेत.
भारतातील स्टार्ट अप परिसंस्थेशी संबंधित विशिष्ट मुद्द्यांवर केंद्रित असलेल्या भोजनकालीन चर्चेदरम्यान या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बे एरियात असलेल्या या विषयातील यशस्वी सदस्यांकडून प्राथमिक पातळीवरील भारतीय स्टार्ट अप उद्योगांना देशांतर्गत समावेशन आणि मार्गदर्शन यासाठी प्रोत्साहन देण्यासाठीच्या विविध मार्गांवर या बैठकीत अधिक भर देण्यात आला.
भारतातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेले अमेरिकेतील तज्ञ मार्गदर्शक आणि भारतात नव्याने उदयाला येत असलेले स्टार्ट अप यांच्यामध्ये असलेले भौगोलिक अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने ‘सेतू’ची रचना करण्यात आली आहे. भारतातील स्टार्ट अप उद्योगांसाठी एक-केन्द्री समस्या समाधान केंद्र असलेल्या ‘मार्ग’ अर्थात मार्गदर्शन, सल्ला,मदत,लवचिकता आणि विकास यांच्याशी संबंधित स्टार्ट अप भारत उपक्रमाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मार्गदर्शक पोर्टलच्या माध्यमातून या परस्पर संवादाला पाठबळ पुरविले जाईल.
सुविधा मिळण्यातील सुलभतेत सुधारणा करणे, योग्य जुळवणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे, आभासी पद्धतीने बैठकांचे आयोजन करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करणे, विशेष अभ्यासवर्गांचे आयोजन करणे, संबंधित माहिती, विश्लेषण, वैशिष्ट्ये यांच्यासाठी विविक्षित डॅशबोर्ड पुरविणे, स्टार्ट अप परिसंस्था सक्षम करणाऱ्या घटकांना या कार्यक्रमाचा भाग करून घेण्यासाठी आणि प्रेरित कार्ये करणे शक्य व्हावे यासाठी समूहाधारित कार्यक्रम आयोजित करणे ही ‘मार्ग’ पोर्टलची मुख्य कार्ये आहेत.
आजघडीला भारत स्टार्ट अप उद्योगांच्या संदर्भात जगात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत सरकारने या क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर तज्ञ आणि उद्योग जगतातील आघाडीच्या घटकांना भारताच्या स्टार्ट अप प्रवासाला अधिक मूल्ये प्रदान करून देशाप्रती योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
‘मार्ग’तर्फे जगभरातील मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत,
संपूर्ण जगातील 200 हून अधिक मार्गदर्शक या उपक्रमासाठी ‘मार्ग’च्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. उद्योग जगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक प्रख्यात व्यक्ती आणि स्टार्ट अप परिसंस्थांकडून अर्ज सादर करण्यात आले आहेत.
G.Chippalkatti /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857428)
Visitor Counter : 220