आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, केरळ, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या ६ राज्यांमध्ये डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी) शाखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे केली पायाभरणी


"राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील एनसीडीसी शाखांमुळे सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांना चालना मिळण्यासोबत तत्परता, जलद निदान आणि रोगांवर लक्ष ठेवून लवकरात लवकर आवश्यक पावले उचलणे शक्य होईल”

Posted On: 06 SEP 2022 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

 

“रोग प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनामध्ये रोगनिरीक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी) प्रादेशिक शाखा एक महत्त्वाची भूमिका बजावतील. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील  एनसीडीसी शाखांमुळे सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांना चालना मिळण्यासोबत तत्परता, जलद निदान आणि रोगांवर लक्ष ठेवून लवकरात लवकर आवश्यक पावले उचलणे शक्य होईल ” असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले. सहा राज्यांमध्ये (आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र शाखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे पायाभरणी करताना ते बोलत होते. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. ”, असेही ते म्हणाले.

कोविड-19 च्या सध्याच्या साथीच्या आजाराने आपल्याला  संसर्गजन्य  रोगांचा प्रसार  केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता त्याचे रूपांतर कसे महामारीत होऊ शकते, हे दाखवून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एनसीडीसी शाखा राज्य सरकारांना वेळेवर रोगनिरीक्षण आणि देखरेखीसाठी मदत करतील. त्यामुळे लवकर इशारा देता येईल आणि जिथे रोग पसरला आहे त्या ठिकाणाहून गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारावर वेळेवर हस्तक्षेप करता येईल, असे ते म्हणाले. 

नवी दिल्ली येथील एनसीडीसी मुख्यालयाशी समन्वय साधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीचे रिअल टाइम शेअरिंग राज्य शाखा करतील. अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे वेळेवर जारी करण्यासाठी एनसीडीसी शाखा महत्त्वपूर्ण ठरतील. त्यामुळे अचूक वैज्ञानिकदृष्ट्या पाठबळ असलेल्या माहितीचा प्रसार सहजपणे केला जाऊ शकतो.

सध्या एनसीडीसीच्या राज्यांमध्ये आठ शाखा आहेत ज्यात एक किंवा काही रोगांवर लक्ष केंद्रित केले आहे.  त्या शाखा पुन्हा उपयोगात आणल्या जातील.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या एनसीडीसी प्रयोगशाळा ब्लॉक -1, निवासी संकुल आणि एनआरएलचे उद्घाटनदेखील केले. एनसीडीसी प्रयोगशाळा परिसरात सार्वजनिक आरोग्याशी संबंधित जिवाणू, विषाणूजन्य, बुरशीजन्य आणि परजीवी रोगांशी संबंधित अत्याधुनिक चाचणी आणि संदर्भ प्रयोगशाळा असतील. यात 50 उच्च-क्षमतेच्या सुसज्ज प्रयोगशाळा आहेत ज्यात 30 जैव-सुरक्षा स्तर 3 प्रयोगशाळा, 5 आरटी-पीसीआर प्रयोग शाळा आणि 15 इतर प्रयोगशाळांचा समावेश आहे. या प्रयोगशाळा केवळ चाचणी सुविधाच उपलब्ध करून देणार नाहीत, तर त्या देशभरातील प्रयोगशाळांच्या संपूर्ण जाळ्याला प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि गुणवत्ता हमी सेवा प्रदान करतील.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857160) Visitor Counter : 181