पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधानांनी स्मृती वन स्मारकाचेही केले उद्घाटन
"स्मृती वन स्मारक आणि वीर बाल स्मारक हे कच्छ, गुजरात आणि संपूर्ण देशाच्या एकत्रित वेदनेचे प्रतीक "
“कच्छ कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही असं म्हणणारे अनेक होते. मात्र आज कच्छच्या लोकांनी परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे."
“तुम्ही पाहू शकता की मृत्यू आणि आपत्तीचं तांडव सुरु असतानाच, आम्ही 2001 मध्ये काही संकल्प केले आणि आज ते पूर्ण होत आहेत. अशाच प्रकारे आज आपण जो संकल्प केला आहे, तो 2047 मध्ये नक्कीच पूर्णत्वाला जाईल.”
"कच्छनं केवळ स्वत: भरारी घेतलेली नाही, तर संपूर्ण गुजरातला नव्या शिखरावर नेलं आहे"
“गुजरात नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतानाच कारस्थाने सुरू झाली. गुजरातची देशात आणि जगात बदनामी करण्यासाठी, येथील गुंतवणूक रोखण्यासाठी एकापाठोपाठ एक कारस्थाने रचली गेली."
"धोलावीराची प्रत्येक वीट, आपल्या पूर्वजांचं कौशल्य, ज्ञान आणि शास्त्र- विज्ञान दर्शवते"
"कच्छचा विकास हे, सबका प्रयाससह (सर्वांच्या प्रयत्नांतून) खऱ्या अर्थाने आमुलाग्र बदलाचे उत्तम उदाहरण आ
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2022 2:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी त्यांनी भुज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचं उद्घाटनही केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, की भुज येथील स्मृती वन स्मारक आणि अंजार येथील वीर बाल स्मारक हे कच्छ, गुजरात आणि संपूर्ण देशानं एकत्रित भोगलेल्या वेदनांचं प्रतीक आहेत. अंजार स्मारकाची संकल्पना कशी पुढे आली आणि ‘कर सेवा’ या स्वयंसेवी कार्यातून स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प कसा केला गेला, या पूर्वस्मृतिंना त्यांनी यावेळी उजाळा दिला. विनाशकारी भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ ही स्मारकं, अत्यंत जड अंतःकरणानं समर्पित करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. कार्यक्रमात झालेल्या आपल्या हृद्य स्वागताबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.
आज अंत:करणात दाटून आलेल्या अनेक भावनांचं त्यांनी स्मरण केलं आणि नम्रतापूर्वक सांगितलं की, दिवंगत जीवांच्या स्मरणार्थ उभारलेलं हे स्मृती वन स्मारक, 9/11 स्मारक आणि हिरोशिमा स्मारकाच्या धर्तीवर आहे. निसर्गाची कार्यप्रणाली आणि निसर्गाकडून राखला जाणारा समतोल याची कायम जाणीव ठेवण्यासाठी या स्मारकाला नेहमी भेट देत राहावं असं आवाहन त्यांनी जनता आणि शाळकरी मुलांना यावेळी केलं.
पंतप्रधानांनी यावेळी, विनाशकारी भूकंपाच्या संध्येचही स्मरण केलं. ते म्हणाले, “मला आठवतं जेव्हा भूकंप झाला तेव्हा दुसऱ्याच दिवशी मी स्वतः इथे पोहोचलो. मी तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो, पक्षाचा साधा कार्यकर्ता होतो. मला माहीत नव्हतं की मी कशी आणि किती लोकांना मदत करू शकेन. मात्र मी ठरवलं की दु:खाच्या या प्रसंगात मी तुम्हा सर्वांसोबतच असेन. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवेच्या या अनुभवानं मला खूप मदत केली.” या प्रदेशाशी असलेल्या त्यांच्या सखोल आणि दीर्घ संबंधांना त्यांनी यावेळी उजाळा दिला आणि संकटकाळात त्यांच्यासोबत काम केलेल्या लोकांचं स्मरण करुन त्यांच्याप्रती आदर भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान पुढे म्हणाले, “कच्छचं नेहमीच एक वैशिष्ट्य राहिलं आहे, ज्याबद्दल मी अनेकदा चर्चा करतो. इथल्या वाटेवर चालताना माणसानं एखादं स्वप्न जरी पेरलं, तर त्याचा वटवृक्ष बनवण्यात संपूर्ण कच्छ एकजुटीनं कंबर कसतो, सहभागी होतो. कच्छच्या या संस्कारांनी प्रत्येक शंकाकुशंका मोडीत काढल्या, प्रत्येक अंदाज चुकीचे ठरवले. आता कच्छ कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही असं म्हणणारे अनेक होते. मात्र आज कच्छच्या लोकांनी इथली परिस्थिती पूर्णपणे पालटवून टाकली आहे.” भूकंपानंतरची पहिली दिवाळी त्यांनी आणि त्यांच्या राज्य मंत्रिमंडळातील सहकार्यांनी कशी या भागातल्या लोकांचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्यासोबत साजरी केली याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की आव्हानाच्या त्या क्षणी, आम्ही मनोमन ठरवलं की आम्ही आपत्तीला संधी म्हणून स्वीकारू. (‘आपदा से अवसर’). “जेव्हा मी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून म्हणतो की भारत 2047 पर्यंत विकसित देश बनलेला असेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मृत्यू आणि आपत्तीच्या त्या तांडवात आम्ही केलेले संकल्प जसे आज वास्तवात उतरले आहेत, त्याचप्रमाणे आज आपण जो संकल्प केला आहे, तो 2047 मध्ये नक्कीच साकार होईल”, असं ते म्हणाले.
2001 मधल्या संपूर्ण विध्वंसानंतर झालेली अनेक अचंबित करणारी कामं अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, 2003 मध्ये क्रांतिगुरु श्यामजी कृष्णवर्मा विद्यापीठाची स्थापना कच्छमध्ये झाली , तर 35 हून अधिक नवीन महाविद्यालयं देखील स्थापन करण्यात आली आहेत. भूकंपरोधक जिल्हा रुग्णालयं, परिसरात कार्यरत असललेले 200 हून जास्त दवाखाने आणि त्या दिवसांतील पाणीटंचाईच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर, आज प्रत्येक घराला मिळत असलेलं, पवित्र नर्मदेचं शुद्ध पाणी, या बाबींचा उल्लेखही पंतप्रधानांनी यावेळी केला. या प्रदेशात जलसुरक्षा राखण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की कच्छच्या लोकांच्या आशीर्वादामुळे इथले सगळे प्रमुख भाग, नर्मदेच्या पाण्याने जोडले गेले आहेत. कच्छ भुज कालव्याचा फायदा या भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना होईल, असं ते म्हणाले. संपूर्ण गुजरातमधला, पहिल्या क्रमांकाचा फळ उत्पादक जिल्हा ठरल्याबद्दल त्यांनी कच्छचं अभिनंदन केलं. पशुपालन आणि दूध उत्पादनात अभूतपूर्व प्रगती केल्याबद्दल त्यांनी इथल्या लोकांचं कौतुक केलं.
"कच्छनं केवळ स्वत: भरारी घेतली नसून, संपूर्ण गुजरातलाच नवीन उंचीवर नेलं आहे", असंही ते पुढे म्हणाले. गुजरातवर एकामागून एक संकट कोसळत असतानाचा काळ आठवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले, “गुजरात नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतानाच कटकारस्थानं सुरू झाली. गुजरातची देशात आणि जगात बदनामी करण्यासाठी, इथली गुंतवणूक रोखण्यासाठी एकापाठोपाठ एक कारस्थान रचली गेली, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
अशा परिस्थितीतही आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य कसे ठरले हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "या कायद्यापासून प्रेरणा घेत पुढे संपूर्ण देशासाठी असा कायदा करण्यात आला. महामारीच्या काळातही या कायद्याने देशातील प्रत्येक सरकारला मदत केली,” असे ते पुढे म्हणाले. गुजरातची बदनामी करण्याच्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून गुजरातने नव्या औद्योगिक मार्गावरून वाटचाल सुरु केली असे ते म्हणाले. कच्छ हा त्याच्या मोठ्या लाभार्थ्यांपैकी एक होता.
ते म्हणाले की, कच्छमध्ये आज जगातील सर्वात मोठे सिमेंटचे कारखाने आहेत. वेल्डींग पाईप उत्पादनात कच्छ जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील दुसरा सर्वात मोठा कापड कारखाना कच्छमध्ये आहे. आशियातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) कच्छमध्ये सुरू झाले. कांडला आणि मुंद्रा बंदरात भारतातील 30 टक्के माल हाताळणी होते तसेच देशासाठी 30 टक्के मीठ इथे तयार केले जाते. कच्छमध्ये सौर आणि पवन ऊर्जेद्वारे 2500 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते आणि सर्वात मोठे सौर हायब्रीड पार्क कच्छमध्ये येणार आहे. आज देशात सुरू असलेल्या हरित गृह मोहिमेत गुजरात मोठी भूमिका बजावू शकते . तसेच जेव्हा गुजरात जगाची हरित गृह राजधानी म्हणून आपला ठसा उमटवेल तेव्हा कच्छचे त्यात मोठे योगदान असेल असे पंतप्रधान म्हणाले.
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जाहीर केलेल्या पंचप्रण पैकी एक प्रण, आपल्या वारशाचा अभिमान याची आठवण करून देत पंतप्रधानांनी कच्छची समृद्धी आणि वैभव अधोरेखित केले. धोलावीराच्या शहर उभारणीतील कौशल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, “धोलावीराला गेल्या वर्षीच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. धोलावीराची प्रत्येक वीट आपल्या पूर्वजांचे कौशल्य, ज्ञान आणि विज्ञान याचे दर्शन घडवते. ” त्याचप्रमाणे प्रदीर्घ काळ दुर्लक्षित राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे हा देखील आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचा भाग आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे अवशेष मायदेशी परत आणण्याचे भाग्य लाभल्याची आठवण त्यांनी सांगितली. मांडवी येथील स्मारक आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी हे या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
कच्छचा विकास हे ‘सबका प्रयास’ द्वारे अर्थपूर्ण बदलाचे उत्तम उदाहरण आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. “कच्छ हे केवळ एक ठिकाण नाही, तर ते एक चैतन्य, जिवंत भावना आहे. हीच भावना आपल्याला स्वातंत्र्याच्या अमृत काळातील भव्य संकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग दाखवते,” असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील आणि विनोद एल चावडा, गुजरात विधानसभेच्या अध्यक्ष डॉ. निमाबेन आचार्य, गुजरातचे राज्यमंत्री किरीटसिंह वाघेला आणि जितूभाई चौधरी उपस्थित होते.
प्रकल्पांचा तपशील
भुज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या संकल्पनेतील स्मृती वन हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. भूज येथे केंद्रबिंदू असलेल्या 2001 च्या भूकंपात सुमारे 13,000 लोकांच्या मृत्यूनंतर लोकांनी दाखविलेल्या लवचिकतेच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी सुमारे 470 एकर भूखंडावर हे उभारण्यात आले आहे. भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांची नावे या स्मारकात आहेत.
सात संकल्पनांवर आधारित सात विभागांमध्ये हे अत्याधुनिक स्मृती वन भूकंप संग्रहालय विभागलेले आहे: पुनर्जन्म, पुनर्शोध , पूर्ववत , पुनर्बांधणी , पुनर्विचार पुनर्रनुभव आणि नूतनीकरण . पहिला विभाग पुनर्जन्म या संकल्पनेवर आधारित आहे, जो पृथ्वीची उत्क्रांती आणि प्रत्येक वेळी मात करण्याची पृथ्वीची क्षमता दर्शवतो. दुसरा विभाग गुजरातचे स्थलवर्णन आणि गुजरातला सामोरे जावे लागणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीचे दर्शन घडवतो. तिसरा विभाग 2001 च्या भूकंपानंतर झालेला विध्वंस दाखवतो. इथल्या दालनात व्यक्तींनी तसेच विविध संस्थांनी हाती घेतलेल्या विराट मदत कार्याची माहिती आहे. चौथा विभाग 2001 च्या भूकंपानंतर गुजरातचे पुनर्निर्माण उपक्रम आणि यशोगाथा यांचे दर्शन घडवतो. पाचवा विभाग अभ्यागताला विविध प्रकारच्या आपत्तींबद्दल आणि कधीही कुठल्याही प्रकारच्या आपत्तीसाठी भविष्यातील सज्जतेबाबत विचार करण्यास आणि शिकण्यास प्रवृत्त करतो. सहावा विभाग सिम्युलेटरच्या सहाय्याने भूकंप पुन्हा अनुभवण्यास मदत करतो. हा अनुभव 5D सिम्युलेटरमध्ये तयार केला गेला आहे आणि इथे भेट देणाऱ्यांना भूकंपाची तीव्रता जाणवून देणे हा उद्देश आहे. सातवा विभाग अभिवादन करण्यासाठी आहे जिथे लोक श्रद्धांजली अर्पण करू शकतात.
पंतप्रधानांनी भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या कच्छ शाखा कालव्याचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कालव्याची एकूण लांबी सुमारे 357 किमी आहे. कालव्याच्या एका भागाचे उद्घाटन 2017 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते आणि उर्वरित भागाचे उद्घाटन आता होत आहे. या कालव्यामुळे कच्छ जिल्ह्यातील सर्व 948 गावे आणि 10 शहरांमध्ये सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल. सरहद डेअरीच्या नवीन स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्प यासह भूजच्या प्रादेशिक विज्ञान केंद्र, गांधीधाम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, अंजार येथील वीर बाल स्मारक, नखतरणा येथे भूज -2 उपकेंद्र आदी विविध प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. भूज - भीमासर रस्त्याच्या कामासह 1500 कोटींहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
***
N.Chitale/A.Save/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1855048)
आगंतुक पटल : 409
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam