राष्ट्रपती कार्यालय
जोमाने आणि अभिमानाने काम करत 2047 चा भारत अधिक समृद्ध, बलशाली आणि आनंदी असेल, याची सुनिश्चिती करू शकाल : राष्ट्रपती मुर्मू यांचे 2020 च्या तुकडीतील आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2020 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
25 AUG 2022 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2020 च्या तुकडीतील 175 अधिकाऱ्यांच्या गटाने, आज (25 ऑगस्ट, 2022) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सध्या सहाय्यक सचिव म्हणून काम करत असलेल्या या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले.
नागरी सेवक या नात्याने, तंत्रज्ञान-विकास,नवोन्मेष, पुरवठा-साखळी, ज्ञान आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये जागतिक केंद्र म्हणून भारताला पुढे आणण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. त्याच वेळी, सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील नेतृत्व भारताला अधिक बळकट करावे लागेल,असे त्या म्हणाल्या.
वर्ष 2047 पर्यंत, 2020 च्या तुकडीतील अधिकारी निर्णय घेणाऱ्यांमध्ये सर्वात वरिष्ठ अधिकारी असतील या बाबीकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. कामाविषयी अभिमान बाळगून ते जोमाने केले तर 2047 चा भारत अधिक समृद्ध, बलशाली आणि आनंदी असेल, याची सुनिश्चिती तुम्ही करू शकाल,असे मार्गदर्शन राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना केले. 2047 मधील भारत घडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी आधुनिक आणि सेवाभिमुख मानसिकतेने काम करावे,असे त्यांनी सांगितले. आपल्या नागरी सेवकांचा दृष्टिकोन अधिक आधुनिक, गतिमान आणि संवेदनशील करण्यासाठी मिशन कर्मयोगी हा एक प्रमुख उपक्रम असल्याचे राष्टपतींनी नमूद केले.
नागरी सेवकांनी सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती आणि करुणा, वस्तुनिष्ठता व निष्पक्षता, सचोटी व आचरणातील सर्वोच्च मूल्यांच्या पथावरून वाटचाल केली पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. पंचायती राज संस्थांशी संबंधित घटनात्मक तरतुदी, अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि नियंत्रण आणि सहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या ईशान्येकडील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबतच्या तरतुदींबाबत त्यांनी विशेषत: जागरूक आणि सक्रिय असणे अपेक्षित आहे,असे त्या म्हणाल्या.
नागरी सेवकांनी लोकांप्रती संवेदनशील असले पाहिजे ज्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. "वसुधैव कुटुंबकम" - संपूर्ण जग हे एक मोठे कुटुंब आहे -हा महान भारतीय संस्कृतीच्या मूल्याचा भाग आहे. त्याप्रमाणे "भारतमेव कुटुंबकम्" – संपूर्ण भारत माझे कुटुंब आहे - हा अखिल भारतीय सेवांशी संबंधित नागरी सेवेतल्या सर्वांच्या विचारधारणेचा अविभाज्य भाग असावा,असे राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854383)
Visitor Counter : 189