पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे केले अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन


‘‘प्रेम,करूणा, सेवा आणि त्यागाचे मूर्त स्वरूप असलेल्या अम्मा भारताच्या अध्यात्मिक परंपरेच्या वाहक ’’

‘‘भारत असे राष्ट्र जिथे उपचार ही सेवा, निरामय आरोग्य ही सुद्धा सेवा; आरोग्य आणि अध्यात्म एकमेकांशी जोडलेले आहे’’

‘‘आपल्याकडे धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, औषधोपचाराला सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणतात, मात्र मी त्याकडे ‘परस्पर प्रयत्न’ या अर्थाने पाहतो.

‘‘अध्यात्मिक नेत्यांनी दिलेल्या संदेशांमुळे इतर देशांप्रमाणे लसीकरणासाठी भारतामध्ये अडचणीची परिस्थिती निर्माण झाली नाही’’

‘‘ज्यावेळी आपण गुलामगिरीच्या मानसिकतेवर विजय मिळवतो, त्यावेळी आपल्या कृतीची दिशा बदलते’’

“सर्वांपर्यंत पोहोचतो, तोच खरा विकास”

Posted On: 24 AUG 2022 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फरीदाबाद येथे अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, माता अमृतानंदमयी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देश अमृत काळामध्ये प्रवेश करीत आहे, आणि सामूहिक आकांक्षा आणि संकल्प आकाराला येत आहेत. अशा काळामध्ये देशाला श्री माता अमृतानंदमयी यांच्या आशीर्वादाचे अमृत मिळत आहे. हे रूग्णालय म्हणजे आधुनिकता आणि अध्यात्म यांचा संगम आहे. हे रूग्णालय गरजूंना सुलभतेने आणि किफायतशीर दरामध्ये उपचाराचे माध्यम बनेल.  ‘‘प्रेम, करूणा, सेवा आणि त्यागाचे मूर्त स्वरूप असलेल्या अम्मा भारताच्या अध्यात्मिक परंपरेच्या वाहक आहेत’’, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारताला सेवा आणि औषधोपचार यांची एक महान परंपरा लाभली आहे, असा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, भारत एक असे राष्ट्र  आहे, जिथे उपचार करणे ही सेवा आहे, तसेच निरामय आरोग्य असणे ही सुद्धा सेवा आहे. आरोग्य आणि आध्यात्म हे दोन्ही परस्परांशी संबंधित आहेत. आपल्याकडे वैद्यक शास्त्र हे वेद आहे. आपण आपल्या वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे संबोधन दिले आहे.’’ अनेक शतके गुलामगिरीच्या काळातही भारताने आपला आध्यात्माचा आणि सेवेचा वारसा कधीही विस्मरणात जाऊ दिला नाही, याचे स्मरण पंतप्रधानांनी उपस्थितांना करून दिले.

पूज्य अम्मांसारख्या संतांच्या रूपात देशाच्या कानाकोपऱ्यात अध्यात्मिक ऊर्जा नेहमी पसरत असते हे राष्ट्राचे सौभाग्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांद्वारे शिक्षण आणि वैद्यक विषयक  जबाबदाऱ्या पार पाडणारी ही प्रणाली एक प्रकारे जुन्या काळातील सार्वजनिक- खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल आहे. याला सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणतात, पण याकडे आपण 'परस्पर प्रयास’, परस्परांच्या  प्रयत्नातून सहकार्य करणे असेही पाहतो, असे  पंतप्रधान पुढे म्हणाले.

मेड इन इंडिया लस आणि काही लोकांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचारावर आणि त्यामुळे  समाजात पसरणाऱ्या अफवांवर पंतप्रधानांनी भाष्य केले. जेव्हा समाजातील धार्मिक नेते आणि आध्यात्मिक गुरु एकत्र आले आणि त्यांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असे सांगितले तेव्हा त्याचा परिणाम त्वरित दिसला, इतर देशांत लस घेण्याबाबत जशी द्विधा मनस्थिती दिसली तसा लसीबाबत संभ्रमावस्थेचा सामना भारताला करावा लागला नाही, असे त्यांनी नमूद केले.

लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. या भाषणात त्यांनी अमृत कालसाठी  पाच प्रतिज्ञा देशासमोर ठेवल्या होत्या आणि या पाच प्रतिज्ञांपैकी एक प्रतीज्ञा होती गुलामगिरीच्या मानसिकतेचा संपूर्ण त्याग. त्याचीही सध्या देशात खूप चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा आपण गुलामगिरीची मानसिकता सोडतो, तेव्हा आपल्या कृतीची दिशाही बदलते. देशाच्या पारंपरिक ज्ञानावर विश्वास वाढत असल्याने हा बदल देशाच्या आरोग्य व्यवस्थेत दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले. योगाला आज जागतिक स्वीकृती आहे आणि जग पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य  वर्ष साजरे करेल, असे मत त्यांनी मांडले.

आज हरियाणा हे देशातील एक आघाडीचे राज्य आहे. या राज्यात प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो, असे त्यांनी सांगितले. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी हरियाणातील लोकांचे अभिनंदन केले. तंदुरूस्ती आणि खेळ हे हरियाणाच्या संस्कृतीचा एक भाग आहेत, असे त्यांनी भाषणाचा समारोप करताना नमूद केले.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन केल्याने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये (एनसीआर) अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेला चालना मिळेल. माता अमृतानंदमयी मठाद्वारे या रूग्णालयाचे व्यवस्थापन केले जाणार आहे. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 2600 खाटांनी सुसज्ज असेल. सुमारे 6000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे अद्ययावत रुग्णालय  फरीदाबाद आणि संपूर्ण एनसीआर भागातल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवेल. 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/S.Thakur/Suvarna/Prajna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854112) Visitor Counter : 277