नौवहन मंत्रालय

सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची भेट; भारत इराण द्विपक्षीय संबंधांसाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार


भारत आणि इराण दरम्यान खलाशांच्या प्रवासाबाबत सामंजस्य करार; चाबहार बंदराद्वारे व्यापार क्षमता अजमावण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर

Posted On: 22 AUG 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तेहरान येथे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची भेट घेतली. भारत-इराण द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्याला चालना देणाऱ्या भारताच्या नौवहन मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत भारतासोबतच्या संबंधांसाठी इराणचे विशेष दूत असलेल्या उपराष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. चाबहार बंदराच्या विकासामुळे व्यापार आणि जलवाहतुकीचे प्रमाण वाढेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. चाबहार बंदर हे व्यापारी जलवाहतुकीमध्ये प्रादेशिक वाढीचे साधन बनवण्यासाठी पुढील पावले उचलण्यासाठी उभय देशांनी सहकार्य करण्याचे महत्त्व केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले.

इराणच्या उपराष्ट्रपतींच्या भेटीनंतर सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “इराणचे उपराष्ट्रपती, मोहम्मद मोखबर यांना भेटून अत्यंत आनंद झाला, बदलत्या भारताला अधिक सशक्त आणि बळकट करण्याच्या मार्ग आणि साधनांबाबत आम्ही चर्चा केली. इराणसोबतचे संबंध आम्ही दृढ करत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मला दोन्ही देशांमधले परस्पराना लाभदायी ठरणारे  उभय देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ आणि विस्तारित करण्याच्या सर्वोच्च कटीबद्धतेबद्दल संवाद साधण्यास सांगितले होते.”

तत्पूर्वी, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे रस्ते आणि शहरी विकास मंत्री, रोस्तम घासेमी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीला सोनोवाल उपस्थित होते. खलाशांसाठी असलेल्या प्रशिक्षण, प्रमाणन आणि देखरेख मानकांच्या आंतरराष्ट्रीय करारातील तरतुदी (1978) नुसार यावेळी उभय देशांनी दोन्हीकडच्या खलाशांना मदत करण्यासाठी अमर्यादित प्रवासातील सक्षमतेचे प्रमाणपत्र मान्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. 

भारत-इराण संबंध अधिक दृढ करण्याविषयी सर्बानंद सोनोवाल आणि रोस्तम घासेमी दरम्यान एक फलदायी द्विपक्षीय बैठक झाली. उभय देशातील खलाशांचा प्रवास सुलभ करणे हा या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यामागचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. मध्य आशिया आणि दक्षिण आशिया, तसेच  दक्षिण पूर्व आशिया यांच्यातील एक जलद, आर्थिक व्यापाराचा दुवा  म्हणून काम करण्याची या बंदराची क्षमता पूर्णपणे उपयोगात आणणे बाकी असल्याचे सांगून केंद्रीय मंत्र्यांनी या क्षेत्रासाठी व्यापार वृद्धिंगत करण्यासाठीची  चाबहारची भूमिका अधोरेखित केली. 

इंडिया पोर्ट्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (IPGPL) ने शाहिद बेहेश्ती बंदरात कामकाज सुरु केल्यापासून, 4.8 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे.

सर्बानंद सोनोवाल हे इराणच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या इराण दौऱ्यानंतर मंत्री संयुक्त अरब अमिरातीच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील जिथे ते जेबेल अली बंदराला भेट देतील आणि द्विपक्षीय बैठकींमध्ये तसेच गुंतवणूकदारांच्या बैठकीत सहभागी होतील.


* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853620) Visitor Counter : 128