पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभेत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभात पंतप्रधानानी केलेले भाषण

Posted On: 08 AUG 2022 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022

 

सदनाचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय श्री वेंकय्या नायडू यांच्या कार्यकाळाची समाप्ती होत असल्याने त्यांच्याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. सदनासाठी हा अतिशय भावुक क्षण आहे. आपल्या सन्माननीय उपस्थितीत सदनाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत.तरीही मी राजकारणातून निवृत्त झालो आहे मात्र सार्वजनिक जीवनासाठी थकलो नाही असे आपण अनेक वेळा सांगितले आहे. म्हणूनच या सदनाच्या नेतृत्वाची आपली जबाबदारी पूर्ण झाली असली तरी भविष्यात आपल्या अनुभवांचा लाभ देशाला दीर्घ काळ होणार आहे.सार्वजनिक जीवनातल्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनाही होणार आहे.

आदरणीय सभापती महोदय,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देश येत्या 25 वर्षाचा नवा प्रवास सुरु करत आहे तेव्हा देशाचे नेतृत्वही एका प्रकारे नव्या युगाच्या हाती आहे. या वेळी आपण असा 15 ऑगस्ट साजरा करत आहोत ज्यामध्ये देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष,पंतप्रधान हे सर्वजण स्वतंत्र भारतात जन्मलेले आहेत आणि हे सर्वजण सामान्य परिस्थितीतून आले आहेत. याचे एक सांकेतिक  महत्व आहे असे मी मानतो.त्याच बरोबर देशाच्या एका नव्या युगाचे प्रतीकही आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपण तर देशाचे असे उपराष्ट्रपती आहात ज्यांनी आपल्या सर्व पदांवरून नेहमीच युवकांसाठी काम केले आहे. सदनातही  आपण नेहमीच युवा खासदारांना प्रोत्साहन दिले आहे. विद्यापीठे आणि संस्थाना भेट देत आपण सातत्याने युवकांशी संवाद साधला आहे. नव्या पिढीशी आपला सातत्याने एक बंध जुळला आहे आणि युवकांना आपले मार्गदर्शन मिळाले आहे आणि युवकही आपल्या भेटीसाठी नेहमीच उत्सुक राहिले आहेत. या सर्व संस्थांमध्ये आपली अमाप लोकप्रियता राहिली आहे. उपराष्ट्रपती म्हणून आपण सदनाबाहेर जी भाषणे दिली आहेत त्यापैकी सुमारे 25 टक्के युवकांमध्ये झाल्याची माहिती मला देण्यात आली आहे आणि खरोखरीच ही मोठी बाब आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्याला वेगवेगळ्या पदांवरच्या भूमिकेत अगदी जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे.आपल्या अनेक भूमिकांमध्ये आपल्यासमवेत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. पक्ष कार्यकर्ता म्हणून आपली वैचारिक कटीबद्धता असू दे,एक आमदार म्हणून आपले कामकाज असू दे, खासदार म्हणून सदनातली आपली सक्रियता असो, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आपले संघटनात्मक कौशल्य आणि नेतृत्वाची बाब असो, कॅबिनेट मंत्री म्हणून  आपले काम, मेहनत,नावीन्यतेचा प्रयत्न आणि त्यातून मिळालेले यश देशासाठी अतिशय उपयुक्त राहिले आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती आणि सदनाचे सभापती या नात्याने प्रतिष्ठा आणि आपली निष्ठावेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावताना निष्ठेने आणि मेहनतीने काम करताना मी आपल्याला पाहिले आहे. कोणत्याही कामाला आपण ओझे मानले नाही.प्रत्येक कामात आपण जीव ओतला आहे. आपला हुरूप,आपली निष्ठा आम्ही सर्वांनी नेहमीच पाहिली आहे. समाज, देश आणि लोकशाही याबाबत आपल्याकडून खूप शिकण्यासारखे आहे हे मी प्रत्येक खासदार,देशातल्या प्रत्येक युवकाला  या सदनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. लिसनिंग, लर्निंग, लीडींग, कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेजिंग आणि  रिफ्लेक्टिंग,रिकनेक्‍टिंग यासारखी पुस्तके आपल्याविषयी खूप काही माहिती देतात. आपले हे अनुभव आपल्या युवकांना मार्गदर्शन करतील आणि लोकशाही अधिक बळकट करतील.

आदरणीय महोदय,

आपल्या पुस्तकांचा उल्लेख मी यासाठी केला कारण त्यांच्या नावातच आपले  शब्द प्रभुत्व दिसून येते ज्यासाठी आपण ओळखले जाता.आपली ‘वन लायनर’ अर्थात एका ओळीतली टिप्पणी अगदी चपखल असते,त्या नंतर  अधिक काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. आपला शब्द आणि शब्द ऐकून त्याला पसंती दिली जाते, प्रतिसाद दिला जातो आणि त्याचा प्रतिवाद कधीच केला जाऊ शकत नाही. आपल्या ओघवत्या भाषेसाठी आणि भाषा  प्रभुत्वाच्या या सामर्थ्यासाठी आपल्याला  ओळखले जाणे आणि या कौशल्याद्वारे परिस्थितीचा रोख वळवण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी असणे, आपल्या या सामर्थ्यासाठी मी अभिनंदन करतो. 

मित्रहो,

आपण जे सांगतो ते महत्वपूर्ण असतेच मात्र ज्या पद्धतीने सांगतो ते जास्त महत्वाचे असते. एखाद्या संवादाचा खोलवर प्रभाव निर्माण होणे, लोकांच्या स्मरणात तो संवाद राहणे आणि त्या संदर्भात लोकांना विचार करण्यासाठी  भाग पाडणे  यावरच  त्या संवादाचे यश जोखले जाते. अभिव्यक्तीच्या या कलेत वेंकय्या जी यांची पारंगतता  आपल्याला सदनात आणि सदनाबाहेर देशातल्या लोकांनाही उत्तम प्रकारे परिचित आहे. आपल्या अभिव्यक्तीची शैली  जितकी रोखठोक  आहे तितकीच अनुपमही आहे. आपल्या वक्तव्यात व्यासंगही असतो आणि गांभीर्यही असते. वाणी मध्ये विजेची लखलखता असते आणि शब्दांना तितकेच वजनही असते.त्यात एक स्नेहभावना असते आणि प्रतिभेची झलकही असते. संवाद साधण्याची आपली शैली थेट मनाला भिडणारी आणि त्याचबरोबर  कर्णमधुर आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपण दक्षिणेत विद्यार्थी दशेतल्या राजनीतीपासून आपला राजकीय प्रवास सुरु केला.तेव्हा लोक म्हणत होते आपण ज्या विचारधारेशी जोडलेले आहात.

आदरणीय सभापती महोदय

आपण दक्षिण भारतात विद्यार्थी दशेतच राजकारणाच्या माध्यमातून आपली राजकीय यात्रा सुरु केलीत. तेव्हा लोक म्हणत असत, की ज्या विचारधारेशी आपण संलग्न आहात तिचे आणि त्या पक्षाचे नजीकच्या भविष्यकाळात दक्षिण भारतात तरी काही सामर्थ्य असेल असे काही नजरेस पडत नाही. पण आपण मात्र एक सामान्य विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू केलात आणि दक्षिण भारतातले असूनही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वोच्च स्थानी पोचलात. आपली अविचल विचारनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि कर्माप्रति समर्पण भावनेचे प्रतीक आहे. एखाद्याकडे देशाप्रति भावना असेल, बोलण्याची कला असेल, विविध भाषांप्रति आस्था असेल तर भाषा कोणासाठी अडचण ठरत नाही हे आपण सिद्ध केले आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपण सांगितलेली एक गोष्ट अनेकांच्या लक्षात असेल, माझ्या तर खास करून आठवणीत आहे. मी नेहमी ऐकतो की आपण भाषेच्या संदर्भात खूप संवेदनशील आहात, खूप आग्रही आहात. पण ते सांगण्याची आपली पद्धत मोठी आकर्षक आहे. जेव्हा आपण म्हणता की मातृभाषा दृष्टीसारखी असते, पुढे आपण म्हणता की दुसरी भाषा चष्म्यासारखी असते. अशा भावना विशाल हृदयातूनच उचंबळून येतात.  वैकेंय्याजींच्या उपस्थितील सदनातील कामकाजादरम्यान प्रत्येक भारतीय भाषेला खास महत्व दिले गेले आहे.  सदनात सर्व भारतीय भाषांना पुढे नेण्याचे काम आपण केलेत. आपले माननीय संसद सदस्य आपल्या 22 अधिकृत भाषांपैकी कोणत्याही भाषेत बोलू शकतात ही सोय आपण केलीत. आपली ही प्रतिभा, आपली निष्ठा सदनासाठी मार्गदर्शक या स्वरूपात अगदी नेहमी काम करत राहील. संसदीय आणि सभ्य पद्धतीने भाषेच्या मर्यादा पाळत एखाद्याला आपले म्हणणे कसे प्रभावीपणे मांडता येते या संदर्भात आपण प्रेरणास्थानी आहात.

आदरणीय सभापती महोदय,

आपली नेतृत्व क्षमता, आपल्या शिस्तीने या सदनाची जबाबदारी आणि कामकाजक्षमता यांना नवीन शिखरावर नेले आहे. आपल्या कार्यकाळातील वर्षांमध्ये राज्यसभेची कामकाजक्षमता 70 टक्केनी वाढली आहे. सदनात सदस्यांची उपस्थिती वाढली आहे. या दरम्यान जवळपास 177 विधेयके मंजूर झाली वा जी महत्वाची बहुचर्चित होती त्यांच्यावर चर्चा झाली. आपल्या मार्गदर्शनाखाली आधुनिक भारताचे स्वप्न साकार करणारे असे अनेक कायदे तयार झाले. आपण किती तरी असे निर्णय घेतलेत जे वरच्या सभागृहाचा चढत्या भाजणीचा प्रवास  म्हणून आठवणीत राहतील. सचिवालयातील कामात अधिक कार्यक्षमता यावी म्हणून आपण एक समितीही स्थापन केलीत. याप्रकारे राज्यसभा सचिवालय सुविहीत करणे, माहिती तंत्रज्ञानाला वाव देणे, पेपरलेस ऑफिससाठी ई-ऑफिस व्यवस्था लागू करणे अशी आपली कितीतरी कामे आहेत त्यांच्या मुळे उच्च सदनाला नवी उंची लाभली आहे.

आदरणीय  सभापती महोदय,

आपल्या शास्त्रात म्हटले आहे न स सभा यत्र न सन्ति वृद्धा न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम् ! अर्थात ज्या सभेत अनुभवी लोक असतात ती सभा असते आणि अनुभवी लोक तेच असतात जे धर्माची म्हणजेच कर्तव्याची शिकवण देतात. आपल्या मार्गदर्शनाने राज्यसभेत हे मापदंड पूर्ण गुणवत्तेनिशी पूर्णत्व मिळवते झाले आहेत. आपण माननीय सदस्यांना आदेश देत होतात, त्यांना आपल्या अनुभवाला लाभ देत होतात आणि शिस्तीचे महत्व लक्षात ठेऊन प्रेमाने रागवतही होतात. मला विश्वास आहे कि कोणत्याही सदस्यांना आपल्या कोणत्याच शब्दाचा विपर्यास केला  नाही. हे सर्व तेव्हाच आपल्या गाठीशी रहातं जेव्हा व्यक्तिगत जीवनात आपण त्या आदर्शांचे मापदंडांचे पालन करता. संसदेतील व्यत्यय एका मर्यादेपलीकडे सदनाचा अपमान असतो, या बाबीवर आपण नेहमीच भर दिला आहे. आपल्या या मापदंडात मला लोकशाहीची परिपक्वता दिसते. सदनात चर्चेदरम्यान आरडाओरडा होत असेल तर कार्यवाही स्थगित केली जाते, असे आधी मानले जात होते. आपण मात्र संवाद, संपर्क आणि समन्वयाच्या माध्यमातून फक्त सदनाचे कामकाजच चालवले नाही तर सदनाला कामकाजक्षमसुद्धा केले. सदनाच्या कामकाजादरम्यान कधी सदस्यांमध्ये वादाचे टोक गाठले जाई तेव्हा आपल्याकडून  let the Government propose, let the opposition oppose and let the house dispose. हे वारंवार ऐकायला मिळत असे. या सदनात दुसऱ्या सदनातून आलेल्या विधेयकांवर निश्चितरुपात सहमती वा असहमतीचा अधिकार आहे. हे सदन ते मंजूर करू शकते, नाकारु शकते, किंवा सुधारू शकते. पण त्यांना थांबवण्याची, बाधा घालण्याची कल्पना आपल्या लोकशाहीत नाही.

आदरणीय सभापती महोदय,

आमच्या सर्व सहमती आणि असहमतीं बाजूला ठेवून आज आपल्याला निरोप देण्यासाठी सदनाचे सर्व सदस्य एकत्र उपस्थित आहेत. हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. या सदनाला आपल्याबद्दल असलेल्या आदराचे हे उदाहरण आहे. आपले कार्य आपले अनुभव सर्व सदस्यांना पुढे जरुर प्रेरणा देतील. विशिष्ठ पद्धतीने सदन चालवण्यातून आपण असा मापदंड स्थापित केला आहेत जो पुढे या पदावर आसनस्थ होणाऱ्यांना प्रेरणा देत राहील, जी परंपरा आपण स्थापन केली आहे त्याला राज्यसभा पुढे चालवेल, देशाप्रति आपल्या जबाबदारीप्रमाणे काम करेल. याच विश्वासासह  आपल्याला पूर्ण सदनाच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने अनेकानेक शुभेच्छा देतो. या देशासाठी आपण जे काही केलं आहे, या सदनासाठी जे काही केलं आहे त्यासाठी सर्वांच्या वतीने आपले ऋण मान्य करत मी आपल्याला धन्यवाद देतो. अनेकानेक शुभेच्छा.

 

S.Patil/Nilima/Vijaya/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850260) Visitor Counter : 194