पंतप्रधान कार्यालय
एका ऐतिहासिक उपक्रमात, पंतप्रधानांच्या हस्ते 30 जुलै रोजी पॉवर सेक्टरच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा शुभारंभ
योजनेसाठीचा पाच वर्षांचा एकूण खर्च 3 लाख कोटींहून अधिक
विद्युत वितरण कंपन्या आणि ऊर्जा विभागांची कार्यक्षमता आणि आर्थिक स्थैर्य सुधारणे हा योजनेचा मुख्य उद्देश
‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य – पॉवर @ 2047’ च्या भव्य सांगता समारोहामध्ये पंतप्रधान होणार सहभागी
राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ (NTPC) च्या 5200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध हरित ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार
पंतप्रधान राष्ट्रीय सौर रूफटॉप पोर्टलचा देखील प्रारंभ करणार
Posted On:
29 JUL 2022 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या म्हणजेच 30 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य – पॉवर @ 2047’ च्या भव्य सांगता सोहळ्यात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा शुभारंभ करतील. ते राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाच्या (NTPC) विविध हरित ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. तसेच नॅशनल सोलर रूफटॉप पोर्टलचेही लोकार्पण करतील.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकारने ऊर्जा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सर्वांसाठी परवडणारी वीज उपलब्ध करून देण्यावर भर असलेल्या या सुधारणांमुळे उर्जा क्षेत्राचा कायापालट झाला आहे. ज्यांना या पूर्वी वीज उपलब्ध नव्हती अशा सुमारे 18,000 खेड्यांचे विद्युतीकरण करणे हे देशाच्या शेवटच्या मैलापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
एका ऐतिहासिक उपक्रमात, पंतप्रधान, ऊर्जा मंत्रालयाच्या प्रमुख सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेचा उद्देश विद्युत वितरण कंपन्या (DISCOMs) आणि ऊर्जा विभागांची परिचालन कार्यक्षमता तसेच आर्थिक स्थैर्य सुधारणे हा आहे. आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2025-26 या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असणाऱ्या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट, अंतिम ग्राहकाला वीज पुरवठ्याची विश्वासार्हता आणि गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, वितरण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच बळकटीकरण करण्यासाठी विज वितरण कंपन्यांना (DISCOMs) आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे. यासोबतच, विद्युत वितरण कंपन्या (DISCOMs) आणि ऊर्जा विभागांची परिचालन कार्यक्षमता तसेच आर्थिक स्थिरता वाढवून, 2024-25 पर्यंत संपूर्ण भारतातील AT&C (एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक) नुकसान 12-15% आणि ACS-ARR (पुरवठ्याची सरासरी किंमत - सरासरी महसूल प्राप्ती) हे अंतर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाच्या (NTPC) 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध हरित ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. ते तेलंगणातील 100 मेगावॅटच्या रामागुंडम तरंगत्या सौर प्रकल्पाचे आणि केरळमधील 92 मेगावॅट कायमकुलम तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करतील. ते राजस्थानमध्ये 735 मेगावॅट नोख सौर प्रकल्प, लेहमधील ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी प्रकल्प आणि गुजरातमध्ये नैसर्गिक वायूसह कावास ग्रीन हायड्रोजन ब्लेंडिंग प्रकल्पाची पायाभरणी करतील.
रामागुंडम प्रकल्प हा 4.5 लाख ‘मेड इन इंडिया’ सोलर पीव्ही मॉड्यूल्सचा भारतातील सर्वात मोठा तरंगणारा सौर पीव्ही प्रकल्प आहे. कायमकुलम प्रकल्प हा पाण्यावर तरंगणाऱ्या ३ लाख ‘मेड इन इंडिया’ सोलर पीव्ही पॅनल्सचा समावेश असलेला भारतातील दुसरा सर्वात मोठा तरंगणारा सौर पीव्ही प्रकल्प आहे.
राजस्थानातील जैसलमेर येथील नोख येथे ७३५ मेगावॅटचा सोलार पीव्ही प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा देशांतर्गत सामग्री आवश्यकता आधारित सौर प्रकल्प आहे ज्यामध्ये एकाच ठिकाणी 1000 MWp क्षमतेचा, ट्रॅकर सिस्टीमसह उच्च-वॅटेज बायफेशियल PV मॉड्यूल्स तैनात केले आहेत. लेह, लडाख येथील ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी प्रकल्प हा एक पथदर्शी प्रकल्प आहे तसेच पाच फ्युएल सेल बसेस लेह आणि परिसरात चालवण्याचे उद्दिष्ट आहे. हा पथदर्शी प्रकल्पाद्वारे भारतात सार्वजनिक वापरासाठी प्रथमच फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहने तैनात केली जाणार आहेत. एनटीपीसी कावास टाउनशिप येथील ग्रीन हायड्रोजन ब्लेंडिंग पथदर्शी प्रकल्प हा भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन ब्लेंडिंग प्रकल्प असेल जो नैसर्गिक वायूचा वापर कमी करण्यात मदत करेल.
पंतप्रधान राष्ट्रीय सौर रूफटॉप पोर्टल देखील लॉन्च करतील. हे पोर्टल वापरून रूफटॉप सोलर प्लांट्साठीच्या अर्ज नोंदणी करण्यापासून ते प्लांटची स्थापना आणि तपासणीनंतर निवासी ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान जमा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेचे ऑनलाइन ट्रॅकिंग करता येईल.
उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य – पॉवर @ 2047 हा यावर्षी सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून 25 ते 30 जुलै दरम्यान होत आहे. देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून ऊर्जा क्षेत्रातील गेल्या आठ वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे दर्शन घडेल. सरकारच्या विविध ऊर्जा संबंधित उपक्रम, योजना आणि कार्यक्रमांमध्ये नागरिकांची जागरूकता आणि सहभाग वाढवून त्यांना सक्षम बनवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846248)
Visitor Counter : 261
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam