पंतप्रधान कार्यालय

साबरकांठा येथील साबर डेअरी परिसरात 1000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांची कोनशीला रचताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 28 JUL 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2022

 

भारत माता की – जय, भारत माता की – जय

गुजरातचे लोकप्रिय, मृदूभाषी आणि सौम्य स्वभावाचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, माझे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, गुजरात विधानसभेचे उपाध्यक्ष जेठाभाई, गुजरात सरकारमधील सर्व मंत्री, संसद सदस्य आणि सर्व आमदार, साबर डेअरीचे पदाधिकारी आणि या डेअरीशी संबंधित असलेले सर्व शेतकरी बंधू-भगिनी, पशुपालक बंधू-भगिनींनो!

आज साबर डेअरीचा विस्तार झाला आहे. शेकडो कोटी रुपयांचे नवे प्रकल्प या भागात उभारण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दूध भुकटीचे संयंत्र आणि जंतूविरहित पॅकिंग विभागासाठी आणखी एक वाहिनी यांची भर पडल्यामुळे साबर डेरीची क्षमता आता आणखी वाढणार आहे. आज ज्या नव्या उत्पादन संयंत्राचे भूमिपूजन झाले आहे ते देखील साबर डेअरीची क्षमता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरेल. मी साबर डेअरी आणि या सहकारी आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींचे, डेअरीच्या अध्यक्षांचे, डेअरीच्या सर्व संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

आणि जेव्हा साबर डेअरीचा विषय निघतो तेव्हा भुराभाई यांची आठवण आली नाही तर चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. भुराभाई पटेल यांनी अनेक दशकांपूर्वी जो उपक्रम सुरु केला होता तो आज लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मदत करत आहे.साबरकांठा येथे आलो की एखाद्या नव्या ठिकाणी आलो आहे असे वाटत नाही, पण येथे रोज काहीतरी नवीन गोष्ट घडताना नक्कीच दिसते. साबरकांठा मध्ये क्वचितच एखादा भाग असा असेल जेथे मी गेलेलो नाही. येथे आल्यावर पूर्वीचे सर्व आठवते, बस स्थानकावर उभा असलो की, खेर..खेर..खेर...वडाली... वडाली....वडाली..खेर-वडाली, खेर-भिलोडा, चला,चला, अशा हाका आठवतात. मी जेव्हा जेव्हा साबरकांठा येथे येतो तेव्हा माझ्या कानात या हाका ऐकू येऊ लागतात. याठिकाणी माझे अनेक सहकारी मित्र होते, त्यांची देखील आठवण होते. काही सहकारी आपल्याला सोडून ईश्वरचरणी लीन झाले त्याचे दुःख वाटत राहते. आमच्या श्रीराम सांखला यांची आठवण येते, आमचे जयेंद्रभाई राठोड, आमचे एस.एम. खांट, धीमंत पटेल, माझे बंधू गजानंद प्रजापती, विनोद खिलजीभाई...अश्या कितीतरी जुन्या सहकाऱ्यांचे चेहेरे माझ्या नजरेसमोर येत आहेत. माझे सुहृद वालजीभाई, प्रवीणसिंह देवडा, माझे इतर सहकारी, मोडासाचे राजाबली आठवतात. अनेक सहकाऱ्यांसोबतच्या माझ्या आठवणी जाग्या होतात, येथील अनेक कुटुंबांशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. डाया भाई भट्ट, मूलजीभाई परमार असे अनेक ज्येष्ठ नेते आणि सहकारी अशा अनेकांसोबत मी काम केले. ईडर येथे येणे झाले तर ज्यांच्याकडे मी अवश्य जात असे ते रमणिकभाई सुद्धा आठवतात. अशा अनेक कुटुंबांची भेट होत असे. पण आता तुम्ही सर्वांनी आता अशी महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे की जुन्या दिवसांचा केवळ स्मरणानंदच घेता येतो.

मित्रांनो,

दोन दशकांपूर्वी येथील परिस्थिती काय होती हे तुम्ही जाणताच आणि मीदेखील त्या स्थितीशी उत्तम प्रकारे परिचित आहे. अलीकडच्या काळात गुजरातच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करावालागत आहे. पण पूर्वीच्या काळी, गुजराती माणसासाठी पाऊस पडणे ही घटनाच किती सुखाचे आणि समाधानाचे  क्षण घेऊन येत असे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. कारण या भागात 10-10 वर्ष,5 वर्ष दुष्काळ पडत असे. माणसे पावसाकडे डोळे लावून बसत. आणि जेव्हा भरपूर पाउस पडतो तेव्हा आपले मन समाधानाने भरून जाते. दुष्काळाच्या परिस्थितीचे फार वाईट परिणाम असत,शेतात पाऊस पडला तर एकाद-दुसरे पीक हाती येत असे. पशुपालन करावे तर गुरांसाठी गवत-चारा मिळणे कठीण. आणि त्यात, गावाची मनोधारणा अशी की मुलांना इथे ठेवू नका, शहरात पाठवून द्या. आम्ही गावात कसेतरी आयुष्य काढू. ते दिवस आम्ही पाहिले आहेत. त्यावेळी मी निर्धार केला, तुम्हा लोकांच्या भरवशावर असा निश्चय केला, तुमच्या सहकार्यावर अढळ विश्वास ठेवून ही परिस्थिती बदलण्याचा विडा उचलला. आणि म्हणूनच, गुजरात राज्यात जसजसा सिंचनाच्या सुविधांचा विस्तार होत गेला, त्यानुसार, कृषी क्षेत्रात, पशुपालन क्षेत्रात आम्ही लक्षणीय विकास करून प्रगती केली. या कार्यात डेअरीने विकासाच्या नव्या संधी देखील दिल्या.काही वेळापूर्वी मी येथील भगिनीवर्गासोबत चर्चा करत होतो. त्यांची चौकशी केली, व्यवसाय कसा सुरु आहे, किती फायदा होतो याबाबत त्यांना बोलते केले. मग मी त्यांना विचारले की मिळालेल्या नफ्याचे तुम्ही काय करता? त्या म्हणे की साहेब, मिळालेल्या नफ्यातून आम्ही सोने खरेदी करतो.नफा हाती आल्यावर सर्वप्रथम काय करतो तर सोने खरेदी करतो.

मित्रांनो,

गुजरात राज्यात काही वर्षांपूर्वी आम्ही जनावरांसाठी आरोग्य कार्ड जारी केली होती. पशु आरोग्य मेळावे भरविण्यास सुरुवात केली. जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या मोतीबिंदूच्या तसेच दातांच्या समस्यांवर उपचाराची सोय आम्ही केली. तुम्हांला सांगतो, या पशु आरोग्य मेळाव्यात जेव्हा काही कारणाने गायींचे पोट कापले जायचे तर त्यातून 15-15, 20-20 किलो प्लॅस्टिकचा कचरा निघत असे. पाहणाऱ्याच्या डोळ्यात देखील पाणी उभे राहत असे. आणि म्हणूनच आम्ही प्लॅस्टिकबंदीची मोहीम हाती घेतली आहे. हे प्लॅस्टिक आपल्या जनावरांचा फार मोठा शत्रू आहे. यासोबतच आम्ही जनावरांची काळजी घेण्यास सुरुवात केली, त्यांना उत्तम आहार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आज येथील भगिनींनी मला फार आनंदाची गोष्ट सांगितली आहे.

मला वाटते की, या गोष्टीचा फारसा प्रसार झालेला नाही. त्यांनी मला सांगितले की, आता जेव्हा गाई-गुरे आजारी पडतात तेव्हा आम्ही आयुर्वेदिक औषधांनी त्यांना बरे करतो. याचा अर्थ असा, की अनादि काळापासून, आपल्या घरांमध्ये पशुंवरील उपचाराच्या ज्या जुन्याजाणत्या पद्धती परंपरागत पद्धतीने प्रचलित होत्या त्यांचे आता पुनरुज्जीवन झाले आहे. आयुर्वेदिक पद्धतीने पशुंवर उपचार करण्याची सुरुवात केल्याबद्दल मी गुजरातमधील डेअरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांचे तसेच साबर डेअरीमध्ये काम करणाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. या सर्वांनी पशुपालक बंधू-भगिनींना आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने जनावरांवर उपचार करण्याचा मार्ग दाखविला आणि तो स्वीकारण्यासाठी मदत केली आहे.जेव्हा मी 2001 मध्ये गुजरातला भेट दिली तेव्हा येथील लोक म्हणत असत की, साहेब, संध्याकाळी जेवताना तरी घरात वीज उपलब्ध होईल असे काहीतरी करा. त्याकाळी, गुजरातमध्ये संध्याकाळी वीज नसायची. त्यासाठी आम्ही ज्योतिग्राम योजनेची मोहीम हाती घेतली. अंधार काय असतो हे आजच्या 20-22 वर्षांच्या मुलामुलींना माहित देखील नसेल. त्यावेळी ज्योतिग्राम योजनेमुळे गुजरातमधील घरांना उजळून टाकले, त्या घरांमध्ये टिव्ही सुरु झाला. एवढेच नव्हे तर, आमच्या गावच्या डेअरीमध्ये चिल्ड मिल्क युनिट उभारण्याकामी देखील या विजेने मोलाची मदत केली.

त्यामुळे दुधाचे संकलन वाढले आणि दुधाची नासाडी थांबली. गाडी येईपर्यंत दूध शीतकरण केंद्रात सुरक्षित राहते आणि त्यामुळे तोटाही कमी होऊ लागला. आणि ते विजेमुळे झालेले असू शकते. गेल्या दोन दशकांत गुजरातमध्ये जी व्यवस्था तयार करण्यात आली त्याचे आज चांगले परिणाम दिसून येत आहेत. आज गुजरातचे डेअरी मार्केट एक लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

बंधू आणि भगिनींनो,

मला आठवते मी इथे 2007 मध्ये आलो होतो, 2011 मध्ये सुद्धा. त्यावेळी मी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा उपक्रम घेतला होता आणि त्या दिवशी मी आमच्या डेअरी सहकाऱ्यांशी बोललो. आता तुम्ही महिलांचा सहभाग वाढवा असे मी त्यांना सांगितले होते. दूध समित्यांमध्ये महिलांकडे पूर्वी फार कमी काम होते, आज किमान तीन स्त्रिया मंडळाच्या कार्यकारी म्हणून राहतात, त्या मंडळ चालवतात आणि काही ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त काम हाताळतात याचा मला आनंद आहे.

गुजरातमध्येही आम्ही हा नियम केला होता. आज मी सर्व भगिनींना भेटून त्याबद्दल विचारले. त्यावेळी मी नियम केला होता की, कोणीही दूध भरायला यावे पण दुधाचे पैसे कोणत्याही पुरुषाला देऊ नका, दुधाचे पैसे फक्त महिलांना मिळावेत. जर पैसा महिलांकडे गेला तर पै न पै चा योग्य वापर होईल, तो पैसा कुटुंबाच्या भल्यासाठी असेल, प्राण्यांच्या कल्याणासाठी असेल.

आणि आज गुजरातमध्ये फक्त आणि फक्त महिलांनाच दुधाचा मोबदला मिळतो. त्यामुळे माझ्या महिला, भगिनी आणि मातांची शक्तीही खूप वाढली आहे. गुजरातमध्ये सहकाराची समृद्ध परंपरा आहे आणि तेथे संस्कारही आहेत, त्यामुळे सहकार आहे. सहकार आहे त्यामुळे समृद्धी आहे. दूध सहकार चळवळीला मिळालेल्या यशाचा विस्तार आता आम्ही शेतीशी संबंधित इतर क्षेत्रातही करत आहोत. आज देशात 10 हजार शेतकरी उत्पादक संघ-एफपीओ, च्या स्थापनेचे काम जोरात सुरू आहे.

या एफपीओच्या माध्यमातून लहान शेतकरी अन्न प्रक्रिया, मूल्याशी निगडित निर्यात आणि पुरवठा साखळीशी थेट संपर्क साधू शकतील. गुजरातच्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना याचा खूप फायदा होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

केंद्र सरकारने गेल्या 8 वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे गुजरातसह देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होताना दिसत आहे.

फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यव्यवसाय यातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, सर्वात गरीब असलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली आहे ही सर्वात मोठी बाब समोर येत आहे. तसेच अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. म्हणजेच पिकांव्यतिरिक्त उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतांवर काम करण्याचे धोरण आज कार्यरत आहे.

खादी आणि ग्रामोद्योग हेही याचे उत्तम उदाहरण आहे. खादी आणि ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. यामुळेच गेल्या 8 वर्षांत या भागातून गावात 1.5 कोटींहून अधिक नवीन रोजगार निर्माण झाला आहे. 2014 पूर्वीच्या 7-8 वर्षांच्या तुलनेत गेल्या 8 वर्षात मधमाशी पालन,  मधाचे उत्पादन यासाठी शेतकऱ्यांना तयार केले. साबर डेअरीने मला सांगितले की, आता आम्ही संपूर्ण साबरकांठामध्ये शेतकऱ्यांना मध उत्पादनासाठी तयार करत आहोत. त्यांना पेट्या देत आहोत आणि इतक्या कमी कालावधीत मधाचे उत्पादन दुप्पट, जवळपास दुप्पट होणार आहे. हा आणखी एक फायदा आहे. जर शेतात मधमाशी असेल तर ती तुमची सोबती म्हणून काम करते. शेतमजूराप्रमाणे मदत करते. मधमाश्या या शेतीला पूरक आहेत. एवढेच नाही तर पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून, आज आपण 10 टक्क्यांहून अधिक, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळतो. हे इथेनॉल कसं बनवलं जातं, उसाच्या लाकडापासून, उसापासून, मक्यापासून, म्हणजेच तेल आजपर्यंत मध्य पूर्वेतील देशांमधून येत होतं. आता धान्याच्या टरफलापासून खनिज तेल  मिळवून, आज संसाधनाच्या मदतकारक  ठरण्याबरोबर  पर्यावरण देखील संरक्षित केले जात आहे. 2014 पर्यंत देशात 400 दशलक्ष लिटरपेक्षा कमी इथेनॉल मिसळले गेले. आज ते 400 कोटी लिटरच्या आसपास पोहोचले आहे. आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षांत विशेष मोहीम राबवून ३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिली आहेत. प्रथमच शेतकऱ्यांबरोबरच मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डची सुविधाही देण्यात आली आहे.

बंधु आणि भगिनींनो

शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. नीम कोटेड युरिया, बंद झालेले खत कारखाने पुन्हा सुरू करणे, नॅनो खतांवर काम करणे या त्या उपाययोजना. नॅनो खतांचे काम असे आहे कीपूर्वी  तुम्ही पिशवी भरून खत आणत असत, आता ते बाटलीत येते आणि समान फायदे मिळतात. कमी मेहनत, जास्त नफा. आज नॅनो खतावर काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरात युरियाच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत, पण त्याचा बोजा आपण देशातील शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. खत बाहेरच्या जगातून आणावे लागते. अचानक भाव अनेक पटींनी वाढले. दिल्लीत बसलेल्या तुमच्या या सरकारने युरियाचे भाव इतके वाढवले, पण त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. त्याचा भार आज भारत सरकार उचलत आहे.

युरियाच्या 50 किलोच्या बॅगसाठी सरकारला साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. किती म्हणाल? साडेतीन हजार रुपयांची थाळी. साडेतीन हजार रुपये, किती? आणि सरकार शेतकऱ्यांना ती थाळी 300 रूपयांत देते. 350 हजारांची थाळी माझ्या शेतकरी बांधवांवर भार पडू नये, म्हणून संपूर्ण देशात फक्त 300 रुपयांना दिली जाते. एक प्रकारे डीएपी खताच्या ५० किलोच्या पिशवीवर पूर्वी ५०० रुपयांचा बोजा सरकार उचलत असे. आज जगात वाढत्या महागाईमुळे सरकारला 2500 रुपयांचा बोजा सोसावा लागत आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यावर बोजा जाऊ देत नाही.

मित्रांनो.

या सर्व योजनांचा लाभ गुजरातच्या शेतकर्‍यांना देखील मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अरवली येथील 50 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतं मायक्रो इरिगेशन (सूक्ष्म सिंचन) सुविधेबरोबर जोडली गेली आहेत. आणि मला विशेषतः अरवली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं अभिनंदन करायचं आहे. हे काम केल्या बद्दल. आज अरवली मधली अनेक गावं अशी आहेत, जिथले  शंभर टक्के शेतकरी ड्रीप इरिगेशन/ठिबक सिंचना द्वारे सिंचन करत आहेत.

सुजलाम-सुफलाम योजनेमुळे साबरकांठा मधल्या अशा अनेक तालुक्यांमध्ये पाणी पोहोचलं आहे, जिथे त्याची कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. हथामती नाल्याचा सुशोभीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण परिसराचं सौंदर्य वाढलं आहे. शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी हर घर जल अर्थात घरोघरी पाणी  अभियाना अंतर्गत देखील कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. 

मित्रांनो,

आज साबरकांठा आणि आसपासच्या भागात कनेक्टिव्हिटीच्या (दळणवळणाच्या) अभूतपूर्व  पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे मार्गांचे रुंदीकरण, रेल्वेचे पूल बांधणे, महामार्गांचे  रुंदीकरण, महामार्ग दूरवर पोहोचवणे, आपला हा शामलाजी-मोडासा 150 किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग पुढे जाऊन दक्षिण गुजरात बरोबर सरळ जोडला जातो. दक्षिण गुजरात मध्य गुजरात बरोबर हा माझा साबरकांठा जोडला जाईल.  आणि त्यामुळेच खेडब्रह्मा असो, मेघराज असो, मालपूर असो, भिलोडा असो, हा माझा संपूर्ण आदिवासी पट्टा विकासाबरोबर वेगानं जोडला जात आहे. हिंमतनगर ते खेडब्रह्मा ब्रॉडगेज मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. बंधू-भगिनींनो, तुम्हाला आठवत असेल की हिम्मतनगरहून महेसाणाला जायचे असेल तर आपण सात वेळा विचार करत असू, की मी या रस्त्याने कसा जाऊ, मी कधी पोहोचेन. तासनतास  लागत होते, पण आता नवा रस्ता बनल्यामुळे आपण साडे तीन तासांत पोहोचतो. हिंमतनगर, महेसाणा, विजापूर इथे पटापट पोहोचतो. हिंमत नगर ते अंबाजी चौपदरी मार्ग बनला, आणि आई अंबेचं दर्शन घेण्यासाठी येणारे लोक, आता सगळ्यांना उत्तर गुजरात मधून जायचं असो, दक्षिण गुजरात-मध्य गुजरातचे लोक हाच रस्ता पकडतात. म्हणजेच आसपासच्या लोकांनाही उपजीविका मिळत राहील. आणि आता शामलाजी पासून अहमदाबाद 6 पदरी महामार्ग बनवण्याचं काम वेगानं सुरु आहे. यावर 1300 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हिंमतनगरमधील वैद्यकीय महाविद्यालय, आणि कोरोना विरूद्धच्या लढाईत आम्हाला हे वैद्यकीय महाविद्यालय केवढे उपयोगी ठरले, किती आशीर्वाद मिळाले हे तुम्हाला माहित आहे, मी ही जाणतो.

मित्रांनो,

जेव्हा दळणवळण आणि पायाभूत सिविधा उत्तम असतात, तेव्हा त्याचा सर्वात मोठा लाभ पर्यटनाला होतो, आपल्या तरुण नौजवानांना रोजगार मिळण्यामध्ये होतो. आणि आपली  साबरकांठा, बनासकांठा ही दोन ठिकाणं श्रद्धा, आदिवासी परंपरा, नैसर्गिक वातावरणाने  भरली आहेत. आणि माझे तर भाग्य आहे की शामालाजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संधी मला मिळाली आहे. आज जो जाईल त्याला शामालाजीची काय अवस्था होती हे कळणार नाही. आणि या क्षेत्रात जो विकास होत आहे त्यामुळे यात्रेकरूंची संख्या वाढत आहे, उपजीविकेच्या संधी वाढत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

मी साबरकांठामध्ये अशा वेळी आलो आहे, जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणार आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. याच वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात आदिवासी हत्याकांड, बाल चितरीया इथली ही घटना त्याला देखील 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आदिवासी नेता मोतीलाल तेजावतजी त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी इंग्रजां विरोधात युद्ध पुकारलं. आणि त्यांनी इंग्रजांना हादरवून सोडलं, हाच माझा साबरकांठा. आणि इंग्रजांनी आदिवासींचं हत्याकांड केलं, त्यांना ठार मारलं. पण दुर्दैव, स्वातंत्र्यानंतर या घटनेचा विसर पडला. हे माझं भाग्य होतं की आदिवासी समुदायाचा त्याग आणि बलिदान येणाऱ्या पिढीला समजायला हवं. आणि त्यासाठी आम्ही बालचितरीयामधलं शहिदांचं स्मारक पुन्हा जगासमोर आणण्यात यशस्वी झालो. आज शहीद स्मृती वन, त्या अमर बलीदानींपासून मिळालेल्या प्रेरणेने नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा रस्ता दाखवत आहे. माझे हे देखील भाग्य आहे की मला पंतप्रधानाच्या भूमिकेत स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाने दिलेल्या योगदानाला राष्ट्रीय ओळख देण्याची देखील संधी मिळाली आहे. 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी गौरव दिनाच्या रुपात संपूर्ण देशात साजरा केला जावा हा निर्णय आम्ही घेतला. आमचं सरकार देशभरात आदिवासी स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृती प्रीत्यर्थ विशेष संग्रहालये देखील उभारत आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर एक आणखी योग जुळून आला आहे. पहिल्यांदाच आदिवासी समाजामधून आलेली देशाची कन्या भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर पोहोचली आहे. देशाने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवलं आहे. हा 130 कोटी पेक्षा जास्त भारत वासियांसाठी अत्यंत गौरवाचा क्षण आहे. ज्या सर्वसमावेशक लोकशाहीचं स्वप्नं स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या पूर्वजांनी पाहिलं होतं, ते आज साकार होत आहे.

मित्रांनो,

आज मी साबरकांठाच्या या पवित्र भूमीवरून गुजरातच्या सर्व जनतेला एक आवाहन करतो, देशवासियांना देखील आवाहन करतो, आणि आत्ताच आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियान सुरु केलं जात आहे. या अभियानात 13 ऑगस्टपासूनच देशातलं प्रत्येक घर आपल्याकडे तिरंगा फडकावणार. साबरकांठा, अरवली बरोबर संपूर्ण गुजरात आणि संपूर्ण देशात हा तिरंगा फडकावून एक भारत, श्रेष्ठ भारताचा अमृत संकल्प घ्यायचा आहे. ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्यांचा आत्मा जिथे कुठे असेल तो आपल्या घरी तिरंगा फडकताना पाहून त्यांचा आत्मा आपल्या कुटुंबाला देखील आशीर्वाद देणार आहे. आज साबरकांठा ने जो मान-सन्मान, आणि विराट जनसागर, एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता-भगिनींनो, आपला आशीर्वाद हीच माझी शक्ती आहे, हीच माझी ऊर्जा आहे, हीच माझी प्रेरणा आहे. आपल्या अशीर्वादांनी प्रयत्नांच्या मार्गावर पुढे जाऊन जनतेचे कल्याण होवो, जो संस्कार गुजरातने दिला आहे. तो हिंदुस्तानच्या गावा-गावा पर्यंत पोहोचवणं हाच आशीर्वाद माझी सर्वात मोठी पुंजी आहे. मी आपला मनापासून आभारी आहे, आणि साबर डेरीच्या संपूर्ण टीमचे (चमूचे) सतत विस्तार आणि विकासासाठी अभिनंदन करतो. खूप-खूप धन्यवाद! दोन्ही हात वर करा आणि माझ्या बरोबर मोठ्याने बोला,

भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

धन्यवाद !


* * *

JPS/SRT/Sanjna/Rajshree/Prajna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846137) Visitor Counter : 196