कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी केला देशातील 11 व्या कृषी गणनेचा प्रारंभ
कृषी गणनेत डेटा संकलनासाठी प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा होणार वापर
Posted On:
28 JUL 2022 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2022
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज देशात अकराव्या कृषी गणनेचा (2021-22) प्रारंभ केला. यावेळी बोलताना तोमर म्हणाले की, भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशात या गणनेमुळे मोठा फायदा होणार आहे असे तोमर यांनी यावेळी सांगितले. तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या राहणीमानात परिवर्तन घडवण्याबरोबरच लहान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना संघटित करणे, त्यांना फायदेशीर पिकांकडे आकर्षित करणे आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमादरम्यान, कृषी गणनेसाठी शुभेच्छा देत तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या ठोस पावलांचे फळ कृषी क्षेत्राला मिळत आहे, देश वेगाने डिजिटल शेतीकडे वाटचाल करत आहे. या गणनेत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची हीच वेळ आहे. कृषी गणनेचा व्यापक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. कृषी गणनेमुळे पिकांच्या मॅपिंगमध्येही योगदान मिळू शकते, जेणेकरून देशाला त्याचे फायदे मिळतील. तोमर यांनी केंद्रीय विभाग, राज्य सरकारे आणि संबंधित संस्थांना ही गणना पूर्ण निष्ठेनेने पार पाडण्यास सांगितले.
या प्रसंगी, तोमर यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या वापरासाठी गणनेच्या कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले आणि डेटा संकलन पोर्टल/अॅप सुरू केले.
कृषी गणना दर 5 वर्षांनी केली जाते, जी कोरोना महामारीमुळे विलंबानंतर आता हाती घेतली जात आहे. कृषी जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य ऑगस्ट 2022 मध्ये सुरू होईल. कृषी जनगणना हा तुलनेने सूक्ष्म पातळीवर विविध कृषी मापदंडांवर माहितीचा मुख्य स्त्रोत आहे, जसे की ऑपरेशनल होल्डिंगचा आकडा आणि क्षेत्र, त्यांचा आकार, वर्गवार वितरण, जमीन वापर, भाडेकरार आणि पीक पद्धती इ. कृषी गणनेसाठी प्रथमच डेटा संकलन स्मार्ट फोन आणि टॅब्लेटवर केले जाईल, जेणेकरून डेटा वेळेत उपलब्ध होईल. बहुतेक राज्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि सर्वेक्षणांचे डिजिटायझेशन केले आहे, ज्यामुळे कृषी गणनेच्या डेटाच्या संकलनाला गती मिळेल. डिजिटलाइज्ड भूमी अभिलेखांचा वापर आणि डेटा संकलनासाठी मोबाइल अॅप्सचा वापर देशातील ऑपरेशनल होल्डिंग डेटाबेस तयार करण्यास सक्षम करेल.
तांत्रिक सत्रादरम्यान, कृषी गणना अंमलबजावणी प्रक्रिया आणि वेब पोर्टल आणि मोबाइल अॅपची ठळक वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845947)
Visitor Counter : 910