उपराष्ट्रपती कार्यालय
हेपेटायटिस या आजाराविषयी जनतेमध्ये आणि धोरण कर्त्यांमध्ये अधिक जागरूकता वाढवण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर
संसद भवनात जागतिक हेपेटायटिस दिवसानिमित्त आयोजित जागरूकता सत्राला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित
Posted On:
28 JUL 2022 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2022
उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी हेपेटायटिस विषयी जनतेमध्ये आणि धोरणकर्त्यांमध्ये अधिक जागरूकता वाढण्याच्या गरजेवर भर दिला आहे. हेपेटायटिस रोखण्यासाठी धोरण निर्माते आणि जनतेच्या प्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघांमध्ये जनतेपर्यंत संदेश पोहोचवावा असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.
संसदेच्या सभागृहात संसदेच्या सदस्यांसाठी जागतिक हेपेटाइटिस दिवसा निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष सत्राला संबोधित करताना स्वच्छ भारत अभियान आणि क्षयरोग मुक्त भारत अभियानाप्रमाणेच 2030 या वर्षापर्यंत हेपेटायटिस हद्दपार करण्यासाठी या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेपेटायटिस विरोधी मोहीम अधिक प्रभावशाली होण्यासाठी तसेच ती अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी धोरण कर्त्यांनी ही मोहीम स्थानिक भाषांमधून चालवावी असा सल्लाही त्यांनी दिला. सरकारी अभियानातला एकसुरीपणा टाळून हा संदेश अधिक प्रभावशालीपणे आणि सामान्य जनतेला समजण्यायोग्य राहावा यासाठी यामध्ये नवोन्मेशाला वाव देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जेव्हा भारत जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना आपला देश ‘आरोग्यसंपन्न आणि आनंदी देश’ होणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचं मत नायडू यांनी व्यक्त केलं. नागरिकांनी योग्य आहार पद्धती आत्मसात करावी त्याचप्रमाणे शारीरिक चलनवलन ठेवणारी जीवनशैली आत्मसात करावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
हेपेटायटिस विरोधी अभियानाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रशंसा केली त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्याविषयी सतत प्रयत्नशील राहिल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आयएलबीएसचे डॉक्टर एस के सरीन आणि त्यांच्या चमूला धन्यवाद दिले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह,दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह, संसदेचे सदस्य यांच्यासह इतर मान्यवर या सत्राला उपस्थित होते.
* * *
N.Chitale/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845893)
Visitor Counter : 173