आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारी लसीकरण केंद्रांवर सर्व पात्र प्रौढ लोकसंख्येला मोफत खबरदारीची लसमात्रा (प्रिकॉशन डोस) देण्यासाठी उद्यापासून 75 दिवस ‘कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृत महोत्सव’


राज्ये/केंद्रशासित प्रदेश मिशन मोडमध्ये वाढीव कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिरांद्वारे ‘जन अभियान’ म्हणून राबवणार ‘कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृत महोत्सव’

विविध यात्रा मार्ग, मेळे आणि सभांमध्ये विशेष लसीकरण शिबिरे

कार्यालयीन संकुले, औद्योगिक आस्थापना, रेल्वे स्थानके, आंतरराज्यीय बस स्थानके, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यस्थळ लसीकरण शिबिरे

Posted On: 14 JUL 2022 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2022

 

सरकारी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर (CVCs) सर्व पात्र प्रौढ लोकसंख्येला (18 वर्षे आणि त्यावरील) मोफत खबरदारीची लसमात्रा (प्रिकॉशन डोस) देण्यासाठी उद्यापासून (15 जुलै 2022) 75 दिवस ‘कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृत महोत्सव’ सुरू होत आहे. ‘मिशन मोड’ मध्ये राबविण्यात येत असलेली ही विशेष कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग आहे. जास्तीत जास्त पात्र प्रौढ लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीची खबरदारीची मात्रा देणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पात्र लाभार्थ्यांचे खबरदारीच्या लसमात्रेद्वारे लसीकरण करून संपूर्ण कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचा टप्पा गाठण्याच्या दिशेने व्यापक आणि महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी अधोरेखित केले की 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकसंख्येतील (8%) आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये (27%) खबरदारीच्या लसमात्रेची कमी झालेली टक्केवारी हे चिंतेचे कारण आहे. केंद्र सरकारने 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी सर्व सरकारी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर मोफत खबरदारीची लसमात्रा देण्यासाठी 'कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृत महोत्सव' ही विशेष मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ती 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 75 दिवसांसाठी असेल. खबरदारीच्या लसमात्रेसाठी पात्र असलेल्यांमध्ये 18 वर्षांच्या त्या सर्व व्यक्तींचा समावेश आहे ज्यांनी दुसरी लसमात्रा घेतल्याच्या तारखेपासून 6 महिने (किंवा 26 आठवडे) पूर्ण केले आहेत.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीकरण अमृत महोत्सव 75 दिवसांपर्यंत व्यापक सामूहिक एकत्रीकरणाद्वारे आणि वेगवेगळी शिबिरे आयोजित करून त्या माध्यमातून जन अभियान म्हणून राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चार धाम यात्रा (उत्तराखंड), अमरनाथ यात्रा( जम्मू आणि काश्मीर), कावड यात्रा (ईशान्येतील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश) तसेच प्रमुख मेळावे आणि संमेलने यांच्या मार्गावर विशेष लसीकरण शिबिरे लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोठ्या कार्यालयीन संकुलांमध्ये (सरकारी आणि खासगी), औद्योगिक कारखाने, रेल्वे स्थानक, आंतरराज्य बस स्थानके, शाळा आणि महाविद्यालये येथे विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचा सल्ला दिला आहे. अशा सर्व विशेष लसीकरण शिबिरांमध्ये, कोविनच्या माध्यमातून लसीकरण करणे अनिवार्य केले असून लसीकरणाची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजवणीसाठी आणि सर्व पात्र लोकसंख्येला खबरदारीची मात्रा मिळेल, याची सुनिश्चिती करण्यासाठी महत्वाकांक्षी जिल्हे, तालुके, सीव्हीसी निहाय सत्रे आयोजित करण्याची योजना आखण्याची आवश्यकता आहे

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असाही सल्ला देण्यात आला आहे की, या उपक्रमाची मुद्रित प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि सार्वजनिक माध्यमांच्या मदतीने व्यापक प्रमाणावर आगाऊ प्रसिद्धी केली जावी. राज्यांच्या आरोग्य  सचिवांना राज्यस्तरावरील प्रगतीचा नियमित आढावा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असाही सल्ला देण्यात आला आहे की, उपलब्ध कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा योग्य वेळेवर घेतल्या जाव्यात आणि सरकारी आणि खासगी केंद्रांमध्ये लसीच्या मात्रा वाया जाऊ नयेत, याची सुनिश्चिती केली जावी. कोविड प्रतिबंधक लसीची मात्रा ही राष्ट्राची अत्यंत मौल्यवान संपत्ती आहे, यावर प्रकाश टाकत राज्यांना 75 दिवसांच्या विशेष मोहीमेसाठी राज्यातील पात्र लोकसंख्येच्या गटांनुसार किती मात्रांची आवश्यकता आहे, याचे मूल्यमापन करून त्याची माहिती केंद्राला द्यावी. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या गरजेनुसार लसीच्या पुरेशा मात्रांचा पुरवठा करणे शक्य होईल. मुदत संपणारी मात्रा प्रथम बाहेर हे तत्व कोविड लसीकरणाला यापुढेही मार्गदर्शक राहील.

 

 

S.Patil/Vasanti/Umesh K/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841560) Visitor Counter : 309