कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कृषी भवन येथे डीडी किसान वाहिनीच्या स्टुडिओचे केले उद्घाटन

Posted On: 01 JUL 2022 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रयत्नांतून डीडीकिसान या वाहिनीने नवी दिल्ली येथे कृषी भवनात स्वतःचा स्टुडीओ उभारला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कैलाश चौधरी यांच्या उपस्थितीत आज या स्टुडीओचे उद्घाटन केले.

याप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की कृषी मंत्रालयाला या स्टुडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठा वाव आहे आणि डीडी न्यूज तसेच डीडी किसान या वाहिन्यांच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने मंत्रालयाशी संपर्क साधू शकतील असे शेतकरी आपल्या देशात खूप मोठ्या संख्येने आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 8 वर्षांत देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात फार मोठा कायापालट घडून आला आहे आणि कृषी क्षेत्रात देखील अत्यंत मूलगामी बदल घडून येत आहेत. अशा वेळी, देशातील शेतकरी तंत्रज्ञानाशी जोडला जावा, सद्यस्थितीबद्दल अवगत व्हावा आणि अधिक किफायतशीर पिकांकडे वळून त्याने अधिक फायदा मिळवावा या उद्देशाने ही वाहिनी सरकार आणि शेतकरी यांच्यादरम्यान सेतूचे काम करत आहे,” ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री तोमर यांनी सांगितले की या स्टुडिओच्या उभारणीमुळे, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे उपक्रम, कार्यक्रम आणि विविध अभियाने यांची माहिती अधिक जलद गतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. कृषी भवन येथे हा स्टुडिओ उभारल्याबद्दल तोमर यांनी दूरदर्शन आणि डीडी-किसान वाहिनीचे आभार मानले.  


* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838599) Visitor Counter : 137