पंतप्रधान कार्यालय
कर्नाटक मधील मैसूर येथे विकास उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
20 JUN 2022 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2022
मैसूरु हागू कर्नाटका राज्यद समस्त नागरीक बंधुगड़िगे, नन्न प्रीतिय नमस्कारगड़ु। विविध अभिवृद्धि, काम-गारिगड़अ उद्घाटनेय जोतेगे, फलानुभवि-गड़ोन्दिगे, संवाद नडेसलु, नानु इंदु इल्लिगे बंदिद्देने.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री बसवराजा बोम्मई जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, कर्नाटक सरकारचे मंत्रिगण, खासदार , आमदार , मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि मैसुरूच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ,
कर्नाटक देशातील त्या राज्यांपैकी एक आहे जिथे देशाची आर्थिक आणि आध्यात्मिक संपन्नता दोन्हींचे एकाच वेळी दर्शन घडते. आपल्या प्राचीन संस्कृतीला समृद्ध करतानाच आपण कशा प्रकारे 21 व्या शतकाचे संकल्प तडीस नेऊ शकतो याचे कर्नाटक हे एक उत्तम उदाहरण आहे आणि मैसूरू मध्ये तर ऐतिहासिक , वारसा आणि आधुनिकता यांचा जो मेळ आहे तो ठिकठिकाणी दिसतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपला वारसा उत्सव साजरा करण्यासाठी आणि जगभरातील कोट्यवधी लोकांना निरोगी जीवनशैलीशी जोडण्यासाठी यावेळी मैसूरूची निवड करण्यात आली. उद्या जगभरातील कोट्यवधी लोक मैसूरूच्या या ऐतिहासिक भूमीशी जोडले जातील आणि योगाभ्यास करतील.
बंधू आणि भगिनींनो,
या भूमीने नलवाडी कृष्णा वोडेयर, सर एम विश्वेश्वरैया जी, राष्ट्रकवि कुवेंपु सारखी अनेक महान व्यक्तिमत्व देशाला दिली आहेत. अशा व्यक्तिमत्वांचा भारताचा वारसा आणि विकास यात महत्वपूर्ण योगदान आहे. आपल्या या पूर्वजांनी सामान्य लोकांचे जीवन सुविधा आणि सन्मानाशी जोडण्याचा मार्ग आपल्याला शिकवला आहे ,दाखवला आहे. डबल इंजिनचे सरकार कर्नाटकात संपूर्ण ऊर्जेने आणि समन्वयाने काम करत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, आज आपण इथे मैसूरू मध्येही अनुभवत आहोत. थोड्या वेळापूर्वी सरकारच्या लोककल्याणकारी अनेक योजनांच्या लाभार्थ्यांशी मी संवाद साधला आणि इथे मंचावर यायला मला थोडा उशीर झाला कारण त्यांच्याकडे इतके सांगायला होते आणि मलाही त्यांचे म्हणणे ऐकताना खूप मजा वाटत होती. तर खूप वेळ मी त्यांच्याशी बोलत होतो. आणि म्हणूनच इथे उशिराने आलो. मात्र त्या लोकांनी ज्या गोष्टी सांगितल्या आणि जे मित्र बोलू शकत नव्हते , त्यांची समस्या दूर करण्यासाठी, त्यांच्यावर उपचारासाठी उत्तम संशोधनाला प्रोत्साहित करणाऱ्या केंद्राचे आज लोकार्पण देखील करण्यात आले आहे. मैसूरू कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पाच्या पायाभरणीमुळे मैसूरू रेलवे स्थानक आधुनिक होईल, इथली रेल्वे कनेक्टिविटी बळकट होईल.
मैसूरूच्या माझ्या प्रिय बंधू -भगिनींनो,
हे वर्ष स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. मागील 7 दशकांमध्ये कर्नाटकने अनेक सरकारे पाहिली , देशातही अनेक सरकारे बनली. प्रत्येक सरकारने गाव, गरीब, दलित, वंचित,मागास , महिला, शेतकरी यांच्यासाठी खूप गोष्टी केल्या, काही ना काही योजना आखल्या. मात्र त्यांची व्याप्ती मर्यादित होती, त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला , त्यांचा लाभ देखील एका ठराविक मर्यादेपर्यंत राहिला. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला दिल्लीत संधी दिलीत, तेव्हा आम्ही जुन्या रीती, नियम, पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. आम्ही सरकारी लाभ, सरकारी योजना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्गापर्यंत पोहचण्यासाठी जे पात्र होते, त्यांना त्यांच्या हक्काचे मिळायला हवे यासाठी अहोरात्र काम सुरु केले.
बंधू -भगिनींनो,
गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही गरीब कल्याण योजनांचा व्यापक विस्तार केला आहे. आधी जशा त्या केवळ एका राज्याच्या सीमेपर्यंतच मर्यादित असायच्या , आता त्या संपूर्ण देशासाठी सुलभ करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ एक राष्ट्र , एक शिधापत्रिका आहे. मागील 2 वर्षात कर्नाटकच्या सव्वाचार कोटींहून अधिक गरीबांना रेशनवर मोफत अन्नधान्याची सुविधा मिळत आहे. जर कर्नाटकची एखादी व्यक्ती दुसऱ्या राज्यात कामानिमित्त गेली असेल , तर एक राष्ट्र , एक शिधापत्रिका अंतर्गत ही सुविधा तिथेही मिळेल.
त्याचप्रमाणे आयुष्मान भारत योजनेचा लाभ देशभरात मिळत आहे. या योजनेच्या मदतीने कर्नाटकातील 29 लाख गरीब रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. यामुळे गरीबांच्या 4 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.
आताच मला खाली नितीश नावाचा एक युवक भेटला. त्याचा संपूर्ण चेहरा एका अपघातामुळे खराब झाला होता. आयुष्मान योजनेमुळे त्याला नवीन आयुष्य लाभले. तो इतका खुश होता, आत्मविश्वास भरपूर होता कारण त्याचा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा झाला होता. त्याचे बोलणे ऐकून मला इतका आनंद झाला, सरकारच्या पै-पै चा उपयोग गरीब व्यक्तीच्या आयुष्यात कसा नवा आत्मविश्वास भरतो, नवी ताकद देते, नवीन संकल्प करण्याचे सामर्थ्य मिळते.
मित्रांनो ,
जो खर्च आपण करत आहोत, ते पैसे जर आपण त्यांना थेट हातात दिले असते तर त्यांनी उपचार करून घेतले नसते. या योजनेचे लाभार्थी दुसऱ्या कुठल्याही राज्यात रहात असले तरी त्यांना तिथे त्याचा पूर्ण लाभ मिळत आहे.
मित्रांनो,
मागील 8 वर्षांत आमच्या सरकारने ज्या योजना तयार केल्या, त्यात याच भावनेला प्राधान्य देण्यात आले आहे की समाजाचे सर्व वर्ग , समाजाच्या सर्व क्षेत्रांत देशाच्या कानाकोपऱ्यात त्या पोहचाव्यात. एकीकडे आम्ही स्टार्ट अप धोरण अंतर्गत युवकांना अनेक प्रोत्साहन देतो तर शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधिचे पैसेही आज वेळेवर मिळत आहेत. पीएम किसान निधि अंतर्गत कर्नाटकच्या 56 लाखांहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे 10 हज़ार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
जर पण देशात उद्योग आणि निर्मितीला चालना देण्यासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना बनवत आहोत तर मुद्रा योजना, पीएम स्वनिधि योजना आणि किसान क्रेडिट कार्ड अभियानाच्या माध्यमातून छोटे उद्योजक, छोटे शेतकरी, पशुपालक आणि फेरीवाल्यांना बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून देत आहोत.
तुम्हाला हे ऐकून बरे वाटेल की मुद्रा योजनेअंतर्गत कर्नाटकातील लाखो छोट्या उद्योजकांना 1 लाख 80 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज देण्यात आले आहे. पर्यटन स्थळ असल्यामुळे होम स्टे, गेस्ट हाउस, अन्य सेवा देणाऱ्या सहकाऱ्यांना या योजनेमुळे खूप मदत झाली आहे. पीएम स्वनिधि योजनेतूनही कर्नाटकातील दीड लाखांहून अधिक फेरीवाल्यांना मदत मिळाली आहे.
बंधू -भगिनींनो,
मागील 8 वर्षात आम्ही शेवटच्या गावापर्यंत सामाजिक न्याय प्रभावीपणे पोहचवला आहे. गरीब व्यक्तीला आज विश्वास वाटत आहे की ज्या योजनेचा लाभ शेजाऱ्याला मिळाला आहे, तो आज ना उद्या त्यालाही नक्की मिळेल.त्याचीही वेळ येईल. सैचुरेशन म्हणजेच शंभर टक्के लाभ, भेदभाव विना, गळती विना लाभ मिळेल हा विश्वास देशातील सामान्य कुटुंबामध्ये दृढ झाला आहे. जेव्हा कर्नाटकातील पावणेचार लाख गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळतात, तेव्हा हा विश्वास अधिक दृढ होतो. कर्नाटकातल्या 50 लाखांहून अधिक कुटुंबांना प्रथमच पाईपद्वारे पाणी मिळायला सुरुवात होते तेव्हा हा विश्वास अधिक दृढ होतो. जेव्हा गरीब मूलभूत सुविधांच्या चिंतेतून मुक्त होतो, तेव्हा तो राष्ट्राच्या विकासात अधिक उत्साहाने सहभागी होतो.
बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळामध्ये, भारताच्या विकासात सर्वांचा सहभाग असेल,सर्वांचे प्रयत्न असतील,यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलत आहोत. आमचे दिव्यांग सोबती, त्यांना पावलापावलावर अडचणींचा सामना करावा लागत असे. आपल्या दिव्यांग साथीदारांचे इतरांवर अवलंबून रहाणे कमीत कमी व्हावे यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या चलनातील नाण्यांमध्ये दिव्यांगांच्या सोयीसाठी काही नवीन सुविधा करण्यात आल्या आहेत.देशात दिव्यांगांच्या शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम समृद्ध केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणे, बस, रेल्वे व इतर कार्यालये दिव्यांगांसाठी अनुकूल करण्यावर भर दिला जात आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचा त्रास कमी करण्यासाठी सर्वसामान्य ठिकाणीही सांकेतिक भाषाही विकसित करण्यात आली आहे. देशातील कोट्यवधी दिव्यांगांना आवश्यक ती उपकरणेही विनामूल्य देण्यात येत आहेत.
आजही, बंगळुरूमधील ज्या आधुनिक सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाचे उदघाटन झाले आहे, त्यामध्ये ब्रेल लिपीतील नकाशे आणि विशेष चिन्हे तयार केली आहेत, सर्व फलाटांना जोडणाऱ्या भुयारी मार्गात रॅम्पची सुविधाही देण्यात आली आहे. म्हैसूरमध्ये,ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग एक अतिशय उत्तम सेवा देत आहे. देशातील दिव्यांग माणसांच्या संसाधनातून सशक्त भारत निर्माण करण्यात एक महत्त्वाची ताकद तयार करण्यास मदत करण्यासाठी या संस्थेतर्फे आज सेंटर ऑफ एक्सलन्सचे उदघाटन करण्यात आले आहे.
जे लोक बोलू शकत नाहीत त्यांच्या समस्यांवर उत्तम उपचार करण्यासाठी, आवश्यक अशा संशोधनाला हे केंद्र प्रोत्साहन देईल,अशा लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र कार्यरत राहील. आणि आज मी स्टार्टअप जगतातील तरुणांना आग्रहाची विनंती करतो की तुमच्याकडे नवनवीन संकल्पना आहेत, तुम्ही नाविन्यपूर्ण विचार करणारे आहात,तुम्ही जे काही नवीन करत आहात, त्यायोगे माझ्या दिव्यांग बंधू-भगिनींसाठी तुमचे स्टार्टअप्स खूप काही करू शकतील. अशा अनेक गोष्टींचा विकास करू शकता ज्यामुळे माझ्या दिव्यांग बंधू-भगिनींना आयुष्यात मोठी ताकद देऊ शकतील नवे सामर्थ्य देऊ शकतील. आणि मला खात्री आहे की माझ्या स्टार्टअप विश्वातील तरुण माझ्या दिव्यांग बांधवांच्या जीवनाला ताकद देऊ शकतील,नवे सामर्थ्य देऊ शकतील आणि मला विश्वास आहे की माझ्या स्टार्टअप्स विश्वातील नवीन युवक माझ्या सोबत आपल्या दिव्यांग बांधवांची चिंता करतील आणि आम्ही मिळून निश्चितच चांगले करू.
बंधू आणि भगिनींनो,
जीवन आणि व्यवहार सुलभ करण्यात आधुनिक पायाभूत सुविधा सर्वात मोठी भूमिका बजावतात. कर्नाटकातील दुहेरी इंजिन सरकार या दिशेने मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. गेल्या 8 वर्षांत केंद्र सरकारने कर्नाटकात 5 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांसाठी सुमारे 70 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. आजच बंगळुरूमध्येच 7,000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे. राष्ट्रीय महामार्गांद्वारे कर्नाटकात हजारो रोजगाराच्या संधी आणि कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार यावर्षी सुमारे 35,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. मला आनंद आहे की कर्नाटकातील दुहेरी इंजिन सरकारमुळे हे प्रकल्प मार्गी लागत आहेत आणि जलद गतीने पूर्ण होत आहेत.
मित्रांनो,
गेल्या 8 वर्षांत रेल्वे कनेक्टीव्हिटीचा कर्नाटकला अधिक लाभ झाला आहे. म्हैसूर रेल्वे स्थानक आणि नागनहल्ली स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू झाल्याने येथील शेतकरी, तरुणांचे जीवन सुलभ होणार आहे. नागनहल्ली हे उपनगरीय वाहतुकीसाठी कोचिंग टर्मिनल आणि मेमू ट्रेन शेड म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या म्हैसूर यार्डावरील भार कमी होणार आहे. मेमू(MEMU) गाड्या सुरू झाल्यामुळे, मध्य बंगळुरू, मंड्या आणि इतर आजूबाजूच्या परीसरातून दररोज म्हैसूर शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना विशेष फायदा होईल. त्यामुळे म्हैसूरच्या पर्यटनालाही खूप बळ मिळेल, पर्यटनाशी संबंधित नवीन रोजगार निर्माण होतील.
मित्रांनो,
दुहेरी इंजिनचे सरकार कर्नाटकच्या विकासासाठी, येथील कनेक्टिव्हिटीसाठी कसे काम करत आहे, याचे आणखी एक उदाहरण मी आपल्याला सांगतो, 2014 पूर्वी केंद्रात जे सरकार होते, त्यावेळी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकसाठी दरवर्षी सरासरी 800 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. कर्नाटकातील माध्यमांतून काम करणाऱ्या मित्रांनो जरा लक्षात घ्या, पूर्वीचे सरकार दरवर्षी सरासरी 800 कोटी रुपयांची तरतूद करत असे. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजेच 6 पटींपेक्षा अधिक सरळ सरळ वाढ. कर्नाटकात, रेल्वेच्या 34,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाच्या बाबतीतही आमचे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी तुम्हाला एक आकडा सांगतो, तुम्ही ते नीट लक्षपूर्वक ऐका. 2014 पूर्वीच्या दहा वर्षांत म्हणजे 2004 ते 2014 या काळात कर्नाटकातील केवळ 16 किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले. आमच्या सरकारच्या काळात कर्नाटकात सुमारे 1600 किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. 10 वर्षांत 16 किलोमीटर… या 8 वर्षांत 1600 किलोमीटर. कुठे 16 किलोमीटर आणि कुठे 1600 किलोमीटर. ही दुहेरी इंजिनची काम करण्याची गती आहे.
बंधू आणि भगिनींनो,
कर्नाटकच्या सर्वांगीण विकासाचा हा वेग असाच कायम राहिला पाहिजे. डबल इंजिन सरकार तुमची अशीच सेवा करत राहू दे. या संकल्पासह आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आणि सदैव तत्पर आहोत आणि तुमचे आशीर्वाद हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला आहात, हेच तुमचे आशीर्वाद, तुमच्या सेवेसाठी आम्हाला बळ देतात.
या अनेक योजनांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी तुमचा मनापासून आभारी आहे, आज कर्नाटकाने ज्याप्रकारे स्वागत सन्मान केला आहे.मग ते बंगलोर असो किंवा म्हैसूर, मी मनःपूर्वक आपले आभार मानतो आणि उद्या जेव्हा संपूर्ण जग योग दिन साजरा करेल, जेव्हा जग योगाशी जोडले जाईल, तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा म्हैसूरकडेही लागलेल्या असतील. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद!
R.Aghor/N.Chitale/S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836065)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam