संरक्षण मंत्रालय
अग्निपथ योजनेसाठी वयोमर्यादा शिथिल करणे हे सरकारची तरुणांप्रति असलेली काळजी दर्शवते : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
लवकरच भरती सुरू होणार असून तरुणांनी सशस्त्र दलात सहभागी होऊन देशसेवा करावी - संरक्षण मंत्र्याचे आवाहन
Posted On:
17 JUN 2022 2:19PM by PIB Mumbai
अग्निपथ योजना ही भारतीय तरुणांसाठी सशस्त्र दलात भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याची सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले. जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेलया राजनाथ सिंह यांनी एका निवेदनात सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया होऊ न शकल्यामुळे अनेक तरुणांना सशस्त्र दलात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही.तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, सरकारने 2022 च्या भरती कालावधीसाठी अग्निवीरांच्या भरतीसाठीची वयोमर्यादा 21 वर्षांवरून 23 वर्षे केली आहे.
“.वयातील शिथिलता हे सूचित करते की , सरकार आपल्या तरुणांची काळजी घेते. लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी, लष्करी व्यवहार विभाग, संरक्षण मंत्रालय आणि सेवा वचनबद्ध आहेत.आम्ही तरुणांना सशस्त्र दलात सहभागी होण्यासाठी आणि अग्निपथच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करण्यासाठी आमंत्रित करत आहोत, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
त्यांनतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ,पहलगाम येथील जवाहर गिर्यारोहण आणि हिवाळी क्रीडा संस्थेच्या (जेआयएम अँड डब्ल्यू एस ) 9 व्या कार्यकारी परिषदेला आणि चौथ्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले. संरक्षण मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ,संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे आणि प्रलंबित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
कठोर प्रशिक्षण मानके, उत्कृष्ट व्यवस्थापन, निष्ठा तसेच प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांचे तांत्रिक प्रावीण्य यांची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. याच वैशिष्ट्यांच्या बळावर जवाहर गिर्यारोहण आणि हिवाळी क्रीडा संस्था देशातील अग्रगण्य संस्था बनली आहे, असे ते म्हणाले. गिर्यारोहण आणि संबंधित उपक्रम हे केवळ शारीरिक सहनशक्तीचेच नव्हे तर मानसिक कणखरपणा आणि उत्साहाचे लक्षण आहे, असे वर्णन त्यांनी केले.
एके काळी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या उपक्रमांमध्ये महिलांच्या सहभागाच्या वाढत्या संख्येची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. गिर्यारोहण मोहिमा कौशल्य आणि उत्साहाने पूर्ण करणाऱ्या दिव्यांगजनांचेही त्यांनी कौतुक केले.दृढ निश्चयाने माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग भारतीय गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्यामुळे या संस्थेतील सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सदस्य संख्या वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
विविध क्षेत्रात सार्वजनिक-खाजगी भागीदारी वाढविण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे देशाच्या विकासाला एक नवीन बळ मिळाले आहे, असे सांगून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘JIM&WS’ ला त्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम पुढे नेण्यासाठी खाजगी क्षेत्राबरोबर भागीदारी करण्याची सूचना केली. “खाजगी क्षेत्रात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान, कौशल्य आणि नवकल्पना आहेत जे सार्वजनिक क्षेत्राकडे उपलब्ध नाहीत. खाजगी क्षेत्रासोबतच्या सहकार्यामुळे –‘JIM&WS’ ला लोकांना, विशेषत: तरुणांना, पर्वतारोहणासारख्या उपक्रमांशी जोडण्यात आणि स्थानिक समृद्धी सुनिश्चित करण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी संस्थेला त्यांच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे पर्वतारोहण आणि हिवाळी खेळांविषयी लोकांना, विशेषत: तरुणांना परिचित करून त्यांच्यामध्ये देशभक्ती, धैर्य आणि ऊर्जा- चैतन्य वाढवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, यामुळे या उपक्रमांची लोकप्रियता तर वाढेलच, शिवाय रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच स्थानिक समुदायाचा सहभागही वाढेल आणि त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल, असेही राजनाथ सिंह म्हणाले. स्थानिक लोकांनी केवळ शेर्पा नाही तर, राष्ट्रीय-सांस्कृतिक ऐक्याचे भागीदार बनले पाहिजे, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला.
राष्ट्रीय सुरक्षेला बळ देण्यासाठी राजनाथ सिंह यांनी सीमावर्ती भागाचा विकास करण्याचा सरकार जो संकल्प केला आहे, त्याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की ‘JIM&WS’ सारख्या संस्था अशी दूरदृष्टी ठेवून पुढे जाण्यासाठी मदत करू शकतात आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतात. पर्यावरण संरक्षणाच्या महत्त्वावर भर देऊन, त्यांनी –‘JIM&WS’ सारख्या संस्थांना पर्यावरण-संवेदनशील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि निसर्ग वाचवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. आगामी काळात JIM&WS ही जगातील आघाडीच्या संस्थांपैकी एक बनेल अशी आशा व्यक्त करून राजनाथ सिंह यांनी आपले भाषण संपवले.
या प्रसंगी, संरक्षण मंत्र्यांनी संस्थेतील कर्नल के एस मॉल बोल्डर क्लाइंबिंग वॉल आणि हिमालयन संग्रहालयाचे उद्घाटनही केले. ‘JIM&WS’ चे उद्दिष्ट तरुणांना निसर्गाविषयी माहिती देणे आणि साहसी खेळांद्वारे त्यांचे व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि आत्मविश्वास विकसित करणे हा आहे.
***
S.Patil/S.Chavan/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834815)
Visitor Counter : 278