अर्थ मंत्रालय
अग्निवीरांना मदत करण्यासाठी काय करता येईल यावर विचारविनिमयासाठी वित्तीय सेवा विभागाची सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांशी चर्चा
अग्निवीरांना मदत करण्यासाठी कर्जसुविधा, सरकारी योजना आणि विमा उत्पादने यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांवर सार्वजनिक बँका, पीएसआयसी आणि वित्तीय संस्था काम करणार
Posted On:
16 JUN 2022 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2022
देशातल्या जास्तीतजास्त युवकांना लष्करी दलांमध्ये सेवा देता यावी, ह्या हेतूने, ‘अग्निपथ’ ही एक आकर्षक भरती योजना सुरु करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने 14 जून 2022 रोजी मंजूरी दिली. या योजनेअंतर्गत निवडल्या गेलेल्या युवकांना अग्निवीर असे म्हटले जाणार आहे. ‘अग्निपथ’ अंतर्गत, देशभक्त आणि कुठल्या तरी ध्येयपूर्तीसाठी प्रेरित युवकांना चार वर्षांसाठी लष्करी दलात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय लष्कराला एक ‘तरूण चेहरा’मिळावा, अशा तऱ्हेने ‘अग्निपथ’ योजनेची रचना करण्यात आली आहे.
या अग्निवीरांनी आपल्या सेवेची चार वर्षे पूर्ण केल्यानंतर, बँका किंवा वित्तीय संस्था त्यांना कशाप्रकारे मदत करु शकतील, यावर विचारविनिमय करण्यासाठी, आज केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS)सचिवांनी, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकां, सार्वजनिक विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत, लष्करी व्यवहार विभागाच्या सहसचिवांनी अग्निपथ योजनेची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सादरीकरण केले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकां, सार्वजनिक विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था, या ‘अग्निवीरांसाठी’ त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन कोणत्या नोकऱ्या दिल्या जातील, याचा विचार करतील, त्यांचे शिक्षण आणि कौशल्ये लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही रोजगार तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, आवश्यक असल्यास त्यासाठी काही अटी शिथिल करणे, सवलती देणे यांचाही विचार केला जाईल, असा निर्णय ह्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच, ह्या अग्निवीरांना पाठबळ देण्यासाठी, त्यांची कौशल्ये वाढवणे, उच्च शिक्षण घेणे अथवा एखादा व्यवसाय तसेच स्वयं उद्यमशीलता यासाठी आवश्यक तो कर्जपुरवठा करण्याच्या शक्यतांचाही विचार केला जाईल. केंद्र सरकारच्या सध्या अस्तित्वात असलेया मुद्रा योजना, स्टँड अप योजना, इत्यादीचा लाभ अग्निवीरांना मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834582)
Visitor Counter : 250