आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त चौथा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक केला जारी


राष्ट्र आणि पोषण यांचा घनिष्ठ संबंध, देशातील प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करण्याकरता सरकार समर्पित – डॉ. मनसुख मांडविया

Posted On: 07 JUN 2022 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जून 2022

 

नागरिकांसाठी सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्याच्या दिशेने काम करण्याकरता राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सक्षम करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) चौथा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक (SFSI) जारी केला. यामधे अन्न सुरक्षेच्या पाच मापदंडांवर राज्यांची कामगिरी मोजली जाणार आहे. देशातील अन्न सुरक्षा परिसंस्थेत स्पर्धात्मक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने एसएफएसआयची सुरुवात 2018-19 पासून झाली. आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक आहार देण्यासाठी हा निर्देशांक मदत करेल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002Z46E.jpg

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त बोलताना, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. असे पुरस्कार लोकांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना मान्यता देण्यास मदत करतात असे ते म्हणाले.  राष्ट्र आणि पोषण यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. समृद्ध भारतासाठी आपल्याला निरामय (स्वस्थ) भारताची गरज आहे आणि निरामय भारतासाठी आपल्याला आरोग्यदायी नागरिकाची गरज आहे यावर डॉ. मांडविया यांनी यावर भर दिला.

देशातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार  समर्पित आहे. त्यासाठी आरोग्य आणि आरोग्यदायी (वेलनेस) केंद्रे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण यासारख्या विविध उपक्रमांसह प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय श्रेणी आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करत आहे असे डॉ मांडविया यांनी सांगितले. आपल्या देशातील नागरिकांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी एफएसएसएआय महत्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003BN4O.jpg

मापदंडानुसार 2021-22 या वर्षाच्या क्रमवारीवर आधारित प्रभावी कामगिरी करणाऱ्या विजेत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सत्कार केला. या वर्षी, मोठ्या राज्यांमध्ये, तामिळनाडू हे अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. लहान राज्यांमध्ये गोवा प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर मणिपूर आणि सिक्कीम यांचा क्रमांक आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि चंदीगडने प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.  डॉ. मांडविया यांनी राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकात लक्षणीय सुधारणा दर्शवणाऱ्या राज्यांचाही यावेळी सत्कार केला.

विविध ईट राईट इंडिया उपक्रमांचा अवलंब करून निरोगी, सुरक्षित आणि शाश्वत अन्नाला प्रोत्साहन देणारी योजना विकसित आणि अंमलात आणण्यासाठी स्मार्ट शहरांना प्रवृत्त करण्याकरता, ईटस्मार्ट सिटीज चॅलेंजमधील 11 विजेत्या स्मार्ट शहरांचाही आरोग्यमंत्र्यांनी सत्कार केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालया (MoHUA) अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनच्या सहकार्याने एफएसएसएआयने गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी शहरे आणि जिल्ह्यांसाठी इट राईट संशोधन स्पर्धा आणि इट राइट संशोधन पुरस्कार तसेच अनुदान विजेत्यांचाही सत्कार केला.

एफएसएसएआयच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटनही  डॉ मांडविया यांनी यावेळी केले. इट राइट संशोधन पुरस्कार आणि अनुदान – टप्पा II, इट राइट सृजनशीलता स्पर्धा - तिसरा टप्पा, शालेय स्तरावरची स्पर्धा आणि आयुर्वेद तसेच आहाराचे बोधचिन्ह ज्यात निसर्गाच्या पाच घटकांचे प्रतीक असणारी 5 पाने असलेली, आयुर्वेद आहाराची अद्याक्षरे आहेत यांचा यात समावेश आहे. 

एकूणच आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने  एक अनोखी ओळख, सुलभ ओळख याकरता हे बोधचिन्ह लाभदायी ठरेल.  

 

* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831829) Visitor Counter : 490