पंतप्रधान कार्यालय

रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन


"रोटरीचे सदस्य हे खऱ्या अर्थाने यश आणि सेवेचे मिश्रण आहेत"

''इतरांसाठी जगणे म्हणजे काय हे ज्यांनी कृतीतून दाखवून दिले त्या बुद्ध आणि महात्मा गांधी यांची आपली भूमी आहे. "

"निसर्गाशी साहचर्य राखण्याच्या आपल्या शतकानुशतके जुन्या संस्कारांनी प्रेरित होऊन, आपली वसुंधरा स्वच्छ आणि हिरवीगार करण्यासाठी 1.4 अब्ज भारतीय सर्वतोपरी प्रयत्नशील''

Posted On: 05 JUN 2022 9:53PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या  संदेशाद्वारे रोटरी इंटरनॅशनलच्या  जागतिक परिषदेला संबोधित केले. इतक्या मोठ्या  प्रमाणातील प्रत्येक रोटरी मेळावा हा एखाद्या छोट्या -जागतिक परिषदेसारखा आहे, तिथे विविधता आणि चैतन्य आहे असे  सांगत रोटेरियन्स म्हणजे रोटरीचे सदस्य हे  'खऱ्या अर्थाने यश आणि सेवेचे  मिश्रण' आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
 
रोटरीच्या 'स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ ' ('सर्व्हिस अबोव्ह सेल्फ') आणि ' सर्वोत्तम सेवा देणाऱ्याला सर्वाधिक लाभ '(वन प्रॉफिटस मोस्ट हू सर्व्ह्स बेस्ट) या दोन बोधवाक्यांकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ही महत्त्वाची तत्त्वे आहेत आणि आपल्या साधुसंतांच्या शिकवणींशी अनुरुप आहेत."ज्यांनी इतरांसाठी जगणे म्हणजे काय हे कृतीतून दाखवून दिले त्या  बुद्ध आणि महात्मा गांधींची आपली भूमी आहे ", असे ते म्हणाले.

 “आपण सर्वजण परस्परावलंबी, परस्परसंबंधित आणि परस्पर संलग्न जगात जीवन व्यतीत करत आहोत. म्हणूनच, आपल्या वसुंधरेला  अधिक समृद्ध आणि शाश्वत करण्यासाठी व्यक्ती, संस्था आणि सरकारांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे'', असे स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले. पृथ्वीवर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी कठोर परिश्रम घेत  केल्याबद्दल त्यांनी रोटरी इंटरनॅशनलची प्रशंसा केली.

 भारत पर्यावरण संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या  प्रयत्नांमध्ये अग्रेसर आहे. “शाश्वत विकास ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निसर्गाशी साहचर्य राखण्याच्या आपल्या शतकानुशतके जुन्या संस्कारांनी  प्रेरित होऊन, आपली वसुंधरा  स्वच्छ आणि हिरवीगार करण्यासाठी 1.4  अब्ज भारतीय सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत.'' असे पंतप्रधान म्हणाले.  आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, 'एक सूर्य , एक जग , एक ग्रिड' आणि लाईफ (LIFE) - पर्यावरणास्नेही  जीवनशैली यांसारख्या भारताच्या उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची जागतिक समुदायाने प्रशंसा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 स्वच्छ पेयजलाचा पुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता आणि यासाठीच्या रोटरी इंटरनॅशनलच्या कामाचे कौतुक करत, पंतप्रधानांनी पाच वर्षांतील जवळपास एकूण स्वच्छता व्याप्तीसह स्वच्छ भारत अभियानाच्या फायद्यांबद्दल माहिती दिली. नवी  जागरूकता आणि वास्तविकता यामुळे आकार घेणाऱ्या जलसंधारण आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या चळवळींबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी भारतातील गतिमान स्टार्टअप क्षेत्राबद्दलही माहिती दिली. .

जगातील लोकसंख्येपैकी सातवा हिस्सा भारत आहे, त्यामुळे,जागतिक लोकसंख्येत भारताचे एवढे मोठे प्रमाण असताना भारताच्या कोणत्याही कामगिरीचा जगावर सकारात्मक प्रभाव पडेल, असे ते म्हणाले. त्यांनी उदाहरणादाखल म्हणून कोविड-19 प्रतिबंधक  लसीची कथा आणि 2030 च्या जागतिक उद्दिष्टाच्या  5 वर्षे आधी 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला.

तळागाळापर्यंत  या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मोदी यांनी  रोटरी परिवाराला आमंत्रित केले.तसेच त्यांनी जगभरात योग दिन मोठ्या संख्येने साजरा करण्यास सांगितले.

****

RG/RA/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831479) Visitor Counter : 146