आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई संजीवनी - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आयुषमान भारत डिजिटल मोहिमेशी संलग्न असलेली भारत सरकारची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा


ई संजीवनीचे लाभार्थी त्यांचे 14-अंकी युनिक आयुषमान भारत आरोग्य खाते (ABHA) तयार करू शकतात आणि ते त्यांच्या सध्याच्या आरोग्यविषयक नोंदी करण्यासाठी वापरू शकतात.

Posted On: 03 JUN 2022 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) ई संजीवनी या त्यांच्या महत्वाकांक्षी योजनेला आयुषमान भारत डिजिटल मोहिमेशी (ABDM) यशस्वीपणे संलग्न केल्याचे घोषित केले आहे. या एकत्रीकरणामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा असलेल्या ई संजीवनी योजनेचे विद्यमान लाभार्थी अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांचे आयुषमान भारत आरोग्य खाते तयार करू शकतात आणि त्यात त्यांच्या सध्याच्या आरोग्यविषयक माहितीची नोंद करू शकतात, यामध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि प्रयोगशाळांमधले अहवाल यांची नोंद करता येईल. याशिवाय ईसंजीवनी वर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांना लाभार्थी स्वतःची आरोग्य विषयक माहिती दाखवू शकतील जेणेकरून उपचारांसंदर्भात योग्य निर्णय घेता येईल आणि आरोग्यविषयक देखभाल निरंतर सुरु राहील.

या एकत्रीकरणाच्या महत्वाविषयी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आर एस शर्मा म्हणाले की भारतातील विद्यमान डिजिटल आरोग्य सेवा आणि हितधारकांमधील अंतर कमी करण्यासाठी आयुषमान भारत डिजिटल मोहीम सेतूचे कार्य करत आहे. ई संजीवनी आणि आयुषमान भारत डिजिटल मोहीम यांचे एकत्रीकरण हे याचेच एक उदाहरण आहे. ज्यायोगे आयुषमान भारत आरोग्य खाते असलेले 22 कोटी लाभार्थी त्यांची आरोग्यविषयक माहिती थेट

ई संजीवनी द्वारे त्यांच्या पसंतीच्या आरोग्य लॉकर मध्ये जतन करू शकतात. तसंच ते त्यांचे पूर्वी लिंक केलेले आरोग्य रेकॉर्ड ई संजीवनी वर डॉक्टरांना दाखवू शकतात ज्यामुळे संपूर्ण सल्लामसलत प्रक्रिया कागद विरहित होईल.

ई संजीवनी सेवा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी पाहिले म्हणजे ई संजीवनी आयुषमान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्र (AB-HWC) -डॉक्टर-ते-डॉक्टर टेलिमेडिसिन सेवा, ज्याद्वारे आरोग्य आणि निरामयता केंद्राला भेट देणारे लाभार्थी केंद्रातील डॉक्टर किंवा तज्ञांना थेट भेटू शकतात. जे तृतीय श्रेणी आरोग्य सुविधा केंद्र किंवा रुग्णालय अथवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असू शकतात. यामुळे केंद्र सरकारला ग्रामीण आणि दुर्गम भागात सामान्य आणि विशेष आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने लाभ होईल.

दुसरा प्रकार आहे ई संजीवनी - बाह्य रुग्ण विभाग , याद्वारे देशभरातल्या रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांशी बोलता येतं आणि त्यांना आवश्यक आरोग्यविषयक सेवा पुरवली जात आहे. ई संजीवनी आयुषमान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्र (AB-HWC) आणि ई संजीवनी - बाह्य रुग्ण विभाग (OPD) हे दोन्ही प्रकार आयुषमान भारत डिजिटल मोहीम या व्यापक अभियानासोबत एकत्रित केले आहेत.

ई संजीवनी टेलिमेडिसिन मंच आता इतर 40 डिजिटल आरोग्य उपक्रमांमध्ये सामील झाला आहे तसेच त्याचे आयुषमान भारत डिजिटल मोहिमेशी एकत्रीकरण पूर्ण झाले आहे. तंत्रज्ञानावर आधारित या आरोग्य सेवा देशासाठी एक मजबूत, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य परिसंस्था तयार करत आहेत. ABDM इंटिग्रेटेड अॅप्सबद्दल अधिक माहिती इथे मिळेल : https://abdm.gov.in/our-partners.


G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830793) Visitor Counter : 562