रेल्वे मंत्रालय

"ऑपरेशन महिला सुरक्षा" या संपूर्ण भारतभर झालेल्या मोहिमेदरम्यान रेल्वे पोलिस दलाने 150 मुली/महिलांची केली सुटका


महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7000 हून अधिक जणांना अटक

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि काय करावे/ काय टाळावे, याविषयी शिक्षित करण्यासाठी 5742 जनजागृती मोहिमांचे आयोजन

Posted On: 02 JUN 2022 11:22AM by PIB Mumbai

भारतीय रेल्वेने महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रेल्वे सुरक्षा  दल (RPF) आणि रेल्वेत आघाडीवर काम करणारे कर्मचारी भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षित आणि संरक्षित होईल,हे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करत असतात.  महिला सुरक्षेच्या या उद्दिष्टाला समर्पित असलेली "ऑपरेशन महिला सुरक्षा" मोहीम दिनांक 3 ते 31 मे 2022 दरम्यान संपूर्ण भारतात राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान आरपीएफने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7 हजारांहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे.  आरपीएफने 150 मुली/महिलांना मानवी तस्करीचे बळी होण्यापासून वाचवले.

 रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी अधिक संरक्षण आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने "मेरी सहेली" हा उपक्रम संपूर्ण भारतभर  कार्यरत आहे.283 प्रशिक्षित महिला अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या या  चमूने (223 स्थानके व्यापणारा ) विविध ठिकाणी दररोज सरासरी एकूण 1125 महिला आरपीएफ कर्मचारी तैनात केले आहेत, ज्यांनी या कालावधीत 2 लाख 25 हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला आणि त्यांना पूर्णतः मदत केली.

 या काळात पुरुष आणि महिला आरपीएफ कर्मचार्‍यांच्या मिश्र तुकड्या असलेले ट्रेन एस्कॉर्ट देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते.मिश्र तुकड्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

 रेल्वे प्रवास करणाऱ्यांना  त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी  काय करावे  आणि काय टाळावे,याबद्दल शिक्षित करण्यासाठी, 5742 जागरुकता मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या.  या महिनाभर चाललेल्या कार्यवाहीमध्ये, आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमध्ये चढताना/ उतरताना घसरलेल्या आणि चालत्या ट्रेनखाली येण्याची शक्यता असलेल्या 10 महिलांचे प्राण वाचवले.

 भारतीय रेल्वे संपूर्ण भारतभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यामध्ये  महिलांचे सुरक्षा कवच वाढविण्यासाठी प्रयत्नशील आणि वचनबद्ध आहे.

****

Shailesh P/SP/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830423) Visitor Counter : 250