ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 31 मे 2022 रोजी शिमला, हिमाचल प्रदेश येथे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद


केंद्रीय मंत्री आणि निवडून आलेले लोक प्रतिनिधी देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये गरीब कल्याण संमेलन कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधणार

Posted On: 28 MAY 2022 8:52PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या नऊ मंत्रालये आणि विभागांच्या सुमारे सोळा योजना आणि कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 31 मे 2022 रोजी शिमला येथे गरीब कल्याण संमेलन नावाचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केला असून पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधतील. 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा किसान सन्मान निधीचा 11वा हप्ताही पंतप्रधान जारी करतील. याचवेळी राज्यांची राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवरही कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमांअंतर्गत, योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्री, खासदार , आमदार आणि इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधतील.

यापैकी अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या कोटींमध्ये आहे आणि अनेक योजनांमध्ये ती  दहा कोटींपेक्षाही अधिक असून लोकसंख्येच्या सर्वात गरीब घटकांच्या सर्वात गंभीर समस्यााया योजना  सोडवतात, ज्यात घरे, पेयजल उपलब्धता, अन्न, आरोग्य आणि पोषण, उपजीविका आणि आर्थिक समावेशकता यांचा समावेश आहे. या संवादातून या योजनांच्या अभिसरण आणि सर्वदूर पोहोच शक्यतेची चाचपणी केली जाईल आणि 2047 साली स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करताना भारताविषयी नागरिकांच्या आकांक्षांचे मूल्यांकन करण्याची संधी मिळेल. हे संमेलन आतापर्यंतचे सर्वात मोठा देशव्यापी संवाद कार्यक्रम असेल , ज्यात पंतप्रधान लाभार्थ्यांशी या योजना आणि कार्यक्रमांचा त्यांच्या जीवनावर झालेल्या परिणामाबाबत संवाद साधतील.

दोन टप्प्यातील कार्यक्रमांतर्गत, राज्य/जिल्हा/केव्हीके स्तरावरील कार्यक्रम सकाळी 9.45 वाजता सुरू होईल. सकाळी 11.00 वाजता, तो राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाशी जोडला जाईल. दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. MyGov द्वारे राष्ट्रीय कार्यक्रम वेबकास्ट करण्याची तरतूद देखील आहे ज्यासाठी लोकांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया चॅनेल द्वारे देखील हा कार्यक्रम पाहता येईल.

या संवादामुळे या योजनांचा लोककेंद्रित दृष्टीकोन अधोरेखित होईल आणि त्यातून नागरिकांचे जीवन सुसह्य होईल तसेच लोकांच्या आकांक्षांची सरकारला माहिती होईल आणि देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत कोणीही मागे राहणार नाही याकडे लक्ष दिले जाईल.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829043) Visitor Counter : 341