पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान, येत्या 26 मे रोजी हैदराबाद आणि चेन्नईला देणार भेट


तामिळनाडूमधील 31,400 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी तसेच पंतप्रधान काही प्रकल्प राष्ट्राला करणार समर्पित

या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल, तसेच दळणवळणाच्या सोयी वाढून या प्रदेशातील जनतेचे राहणीमान सुलभ होण्यास मिळणार गती

इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद या व्यवस्थापन संस्थेच्या द्विदशकपूर्ती समारंभात आणि 2022 च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान होणार सहभागी

Posted On: 24 MAY 2022 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 26 मे 2022 रोजी हैदराबाद आणि चेन्नईला भेट देणार आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास,पंतप्रधान इंडियन स्कूल ऑफ बिझनेस(ISB), हैदराबाद या व्यवस्थापन संस्थेच्या द्विदशकपूर्ती  (20 वर्षे पूर्ण झाल्याच्या) समारंभात सहभागी होणार आहेत आणि 2022 च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या  (PGP)दीक्षांत  समारंभाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 5:45 च्या सुमारास, पंतप्रधान चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडिअममध्ये   31,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 11 प्रकल्पांसाठी पायाभरणी  करुन, काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.

पंतप्रधानांचा चेन्नई दौरा

पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी, दळणवळण वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रातील  जनतेच्या  जीवन सुलभतेला  चालना देण्यासाठी  काही प्रकल्प, पंतप्रधान यावेळी राष्ट्राला समर्पित करतील; तसेच चेन्नईमध्ये 31,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 11 प्रकल्पांची पायाभरणी करतील.या प्रकल्पांमुळे या  भागातील सामाजिक-आर्थिक समृद्धीत  लक्षणीयरीत्या भर पडण्यास मदत होईल, विविध क्षेत्रांत परिवर्तन होईल आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्यास चालना मिळेल.

चेन्नईमध्ये पंतप्रधान 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पाच प्रकल्प यावेळी राष्ट्राला समर्पित करणार आहेत. 75 किमी लांबीच्या  मदुराई-तेनी (रेल्वे गेज रूपांतरण प्रकल्प) या सुमारे 500 कोटी रुपये प्रकल्पखर्चाच्या  या प्रकल्पामुळे  या भागात सुगमता निर्माण होऊन  या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल. एकूण  590 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तांबरम - चेंगलपट्टू दरम्यान 30 किमी लांबीच्या तिसऱ्या रेल्वेमार्गामुळे   उपनगरीय मार्गांवरील सेवा अधिक उत्तम प्रकारे  सुलभ होईल आणि आरामदायी प्रवासात वाढ होईल.

सुमारे 850 कोटी रुपये प्रकल्पखर्चाचा  115 किमी लांबीचा  एन्नोर-चेंगलपट्टू आणि सुमारे 910 कोटी रुपये प्रकल्पखर्चाची  ईटीबीपीएनएमटीच्या  (ETBPNMT)तिरुवल्लूर-बेंगळुरू क्षेत्रातील 271 किमी लांबीची नैसर्गिक गॅस पाईपलाईन यामुळे  तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील उद्योगांना तसेच इतर ग्राहकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा सुलभ होईल.

या कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजना-शहरी याअंतर्गत लाइट हाऊस प्रकल्प- चेन्नईचा एक भाग म्हणून बांधलेल्या 116 कोटी रुपये खर्चाच्या 1152 घरांचे उद्‌घाटनदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

28,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सहा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करतील.

14,870 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून 262 किमी लांबीचा बेंगळुरू-चेन्नई द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे.  हा मार्ग  कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून जाणार असून  बेंगळुरू आणि चेन्नईदरम्यानचा प्रवासाचा  अवधी 2-3 तासांनी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.   चेन्नई बंदर, मदुरवॉयलला  ( राष्ट्रीय महामार्ग-4) जोडणारा 5850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा  सुमारे 21 किमी लांबीचा,चौपदरी डबलडेकर  उन्नत मार्ग  बांधला जाणार आहे.  या मार्गामुळे मालवाहू वाहनांना  चेन्नई बंदराला पोहोचण्यासाठी अहोरात्र सुविधा उपलब्ध राहील.    राष्ट्रीय महामार्ग -844(NH-844)/ च्या नेरालुरू ते धर्मपुरी या  94 किमी लांबीच्या मार्गाचे  चौपदरीकरण  आणि राष्ट्रीय महामार्ग -227(NH-227) च्या मीनसुरुट्टी ते चिदंबरम या 31 किमी लांबीच्या  मार्गाचे दुहेरीकरण यामुळे या क्षेत्रात प्रवास सुकर होण्यास मदत होईल. यासाठी अनुक्रमेसुमारे 3870 कोटी रुपये आणि 720 कोटी  रुपये खर्च होणार आहे.

चेन्नई एग्मोर, रामेश्वरम, मदुराई, कटपडी आणि कन्याकुमारी या पाच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. 1800 कोटी रुपये खर्च करून, आधुनिक सुविधांच्या  तरतुदींद्वारे प्रवाशांच्या सोयी आणि सुविधा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.

चेन्नई येथे 1400 कोटी रुपयांपेक्षा अधिक  किमतीच्या  मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कची  पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. हे केंद्र अखंडपणे बहुविध साधनांद्वारे  मालवाहतूक  करण्याची सुविधा प्रदान करेल आणि बहुविध प्रकारे कार्यक्षमता निर्माण करेल.

पंतप्रधानांचा हैदराबाद  दौरा

आपल्या हैदराबाद दौऱ्यात पंतप्रधान इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) या  हैदराबाद येथील व्यवस्थापन संस्थेच्या द्विदशकपूर्ती समारंभात सहभागी होतील आणि 2022 च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (PGP) दीक्षांत  समारंभाला संबोधित करतील. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे उद्‌घाटन 2 डिसेंबर 2001 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते. हे  देशातील सर्वोत्तम व्यवस्थापनविषयक महाविद्यालयातील एक म्हणून ओळखले जाते तसेच, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ही संस्था सरकारच्या अनेक मंत्रालये आणि विभागांसोबत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसाठी कार्यरत आहे.    

 

 

 

 

S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828065) Visitor Counter : 191