पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत बैठक

Posted On: 24 MAY 2022 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडन यांच्यात आज, 24 मे 2022 रोजी टोक्यो इथे, अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी बैठक झाली. या बैठकीतून जे भक्कम फलित आलेले आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय भागीदारी अधिक घट्ट आणि गतिमान होण्यास मदत होईल. 

या याआधी या दोन्ही नेत्यांमध्ये, सप्टेंबर 2021 मध्ये , वॉशिंग्टन डी. सी. इथे बैठक झाली होती, त्यानंतर, जी-20 आणि कॉप -26 या परिषदांच्या निमित्तानेही त्यांची भेट झाली होती. या भेटींमध्ये झालेल्या उच्चस्तरीय संवादालाच आजच्या बैठकीत पुढे नेण्यात आले. त्याआधी, अलीकडेच, दोन्ही नेत्यांमध्ये 11 एप्रिल 2022 रोजी आभासी स्वरुपात संवादही झाला होता.

भारत-अमेरिका यांच्यातील सर्वसमावेशक राजनैतिक जागतिक भागीदारी, लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य यांच्याप्रती असलेल्या सामायिक कटिबद्धतेवर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कायद्यांप्रती असलेल्या विश्वासावर आधारलेली आहे. या बैठकीत, दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रात द्वीपक्षीय अजेंडे पुढे नेण्याच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

तसेच, गुंतवणूक-प्राणित करारावर झालेल्या स्वाक्षऱ्यांचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. या करारामुळे अमेरिकेतील विकास वित्त महामंडळ, भारतातील विविध क्षेत्रे, जसे की आरोग्य सुविधा, अक्षय ऊर्जा, लघु आणि मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा यात सामायिक प्राधान्याच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक सुरू  ठेवू शकेल.

दोन्ही देशांनी मिळून भारत-अमेरिका महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानविषयक संयुक्त उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमामुळे, दोन्ही देशांसाठी फलदायी ठरू शकेल असं सहकार्य करण्याची सुविधा मिळू शकेल.  भारतातील राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय   आणि अमेरिकेची  राष्ट्रीय सुरक्षा परिषद – iCET यांच्या माध्यमातून, दोन्ही सरकारे, विचारवंत आणि अभ्यासक तसेच उद्योग क्षेत्र यांच्यात दृढ संबंध निर्माण होऊ शकतील विशेषतः, कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, 5G/6G, बायोटेक, अंतराळ आणि सेमी कंडक्टर्स अशा क्षेत्रात एकत्रित काम करणे सुलभ होईल.

भारत-अमेरिका यांच्या द्वीपक्षीय अजेंडयात संरक्षण आणि सुरक्षा विषयक सहकार्याला विशेष स्थान आहे, हे नमूद करत, दोन्ही देशांनी,हे सहकार्य अधिक दृढ कसे करता येईल, यावर चर्चा केली. याच संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उद्योगांनी  भारतात उत्पादनक्षेत्रांत तसेच ‘मेक-इन-इंडिया’ मध्ये भागीदारी करावी असे आवाहन केले. त्याशिवाय आत्मनिर्भर भारतासारखी अभियाने दोन्ही राष्ट्रांच्या सामाईक हिताची ठरू शकतील.

दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रांत वाढत असलेले सहकार्य अधिक दृढ करत, भारत आणि अमेरिकेने, दीर्घकालीन, लस कृती अभियाना (VAP)ला  2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे, दोन्ही देशातील लस विकसनासाठीचे आणि इतर तंत्रज्ञानाशी संबंधित संयुक्त जैव-वैद्यकीय संशोधन, देखील पुढे सुरु राहणार आहे.

दोन्ही देशांमधील नागरिकांचे संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी, उभय देशातील उच्चशिक्षणविषयक सहकार्य अधिक मजबूत  केले जावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. याचाही लाभ दोन्ही देशांना होऊ शकेल.

यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक विषयांवर विचारांचे आदानप्रदान केले तसेच, दक्षिण आशिया आणि हिंद-प्रशांत प्रदेशाशी संबंधित परस्पर मुद्यांवरही चर्चा करत मुक्त,खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत प्रदेशासाठीची आपले सामायिक विचार व्यक्त केले.

समृद्धीसाठीच्या हिंद-प्रशांत आर्थिक मंचाच्या (IPEF) शुभारंभाबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आणि, हा मंच जास्तीतजास्त सर्वसमावेशक आणि लवचिक असावा, यासाठी सर्व भागीदार देशांसोबत काम करण्यास भारत तयार आहे, असेही ते म्हणाले.

हा संवाद पुढेही सुरु ठेवण्यास आणि  भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारी उच्चस्तरावर नेण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

 

 

 

S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827907) Visitor Counter : 595