माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"या, तुमचे चित्रपट भारतात चित्रित करा"- कान येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांचे चित्रनिर्मात्यांना निमंत्रण

Posted On: 23 MAY 2022 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2022

केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमन्त्री डॉ. एल.मुरुगन यांनी आज कान चित्रपट महोत्सवात भारतीय दालनात झालेल्या एका गोलमेज बैठकीत भाग घेतला. 'भारत दरवर्षी सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करतो' अशी माहिती देत, वीसपेक्षा अधिक भाषांमध्ये हे चित्रपट तयार होतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. चित्रपटाच्या प्रेक्षकांची संख्या एक अब्जापेक्षा अधिक असल्याचे सांगून चित्रपटांसाठीची बाजारपेठ म्हणूनही भारताचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सरकारच्या यशस्वी कामगिरीची माहिती देताना, "2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून, चित्रपट उद्योगाच्या फायद्याचे अनेक उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत", असे त्यांनी सांगितले.

सरकारकडून स्टार्टअप उद्योगांना दिल्या जात असलेल्या प्रोत्साहनाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने, सरकारने चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील प्रज्ञावान भारतीयांचे स्टार्टअप उद्योग कान महोत्सवात आणले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

परदेशी चित्रपटनिर्मात्यांना बरोबर घेऊन चित्रपटांची सहनिर्मिती करण्यासाठी सरकार विविध प्रकारे प्रोत्साहन देत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, परदेशी चित्रपटांचे चित्रीकरण भारतात करण्यासाठी दिलेल्या जात असलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी विशेष माहिती दिली. कथाकथनाची परंपरा आणि रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांचा सांस्कृतिक वारसा सोबत घेऊन भारत या क्षेत्रात झेपावण्यासाठी सज्ज झाला आहे. "फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस- चित्रपट सुविधा कार्यालय यासारख्या उपक्रमांमुळे विविध प्रकारच्या परवानग्या एका खिडकीत मिळणे शक्य होत आहे", असेही त्यांनी सांगितले.

"कलाकृतीच्या बाबतीत आता भाषेचे बंधन जाणवत नाही" असे सांगून मुरुगन म्हणाले की, "भारतातील प्रादेशिक भाषांतील चित्रपटांकडेही आता जगाचे लक्ष वेधले जात आहे."

मुरुगन यांनी तेथे सहभागी झालेल्या सर्वांना, 'भारतात येऊन चित्रीकरण करण्यासाठी' तसेच भारतातील विविध चित्रपट महोत्सवांत सहभागी होण्यासाठीही निमंत्रित केले.

डॉ.एल.मुरुगन यांच्यासह पुढील मान्यवरांनी या गोलमेज बैठकीत भाग घेतला-:

  1. सेल्वागिया वेलो, संचालक, रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सव, फ्लोरेन्स, इटली
  2. कॉलिन बरोस, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, स्पेशल ट्रीट्स प्रोडक्शन्स, युनायटेड किंगडम
  3. मायकेल स्वेनसून, चित्रपट आयुक्त, दक्षिण स्वीडन चित्रपट आयोग
  4. ऍमी जेन्सन, प्रकल्प व्यवस्थापक, संकल्पनात्मक संवाद एकक, स्वीडन संवाद विभाग
  5. मेरी लिझा दिनो, चित्रपट आयुक्त, फिलिपिन्स
  6. ज्यूडी ग्लाडस्टोन, कार्यकारी आणि कलाविषयक संस्थापिका, एजलेस इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव, अमेरिका
  7. स्टीफन ओटेनब्रच, दिग्दर्शक, भारतीय-जर्मन चित्रपट
  8. कॅरे सॉहने, संचालक, लंडन भारतीय चित्रपट महोत्सव

 

 

S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 


(Release ID: 1827720) Visitor Counter : 238