विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग हे भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग
Posted On:
20 MAY 2022 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2022
कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग हे भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार), केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार), पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
कृषी तंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञान याविषयी म्हैसूरमध्ये आयोजित मेळावा तथा प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. "गेल्या काही वर्षांत भारतात कृषी -तंत्रज्ञानाच्या स्टार्टअप उद्योगांची नवी लाट आली आहे. पुरवठा साखळ्यांचे व्यवस्थापन, जुनाट उपकरणांचा वापर, सदोष पायाभूत सुविधा आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याच्या व्यापक संधींचा अभाव अशा काही समस्या भारतीय कृषिक्षेत्राला दीर्घकाळापासून भेडसावत होत्या. मोदीप्रणीत सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे वातावरण सुधारून अधिक अनुकूल झाले आहे." असे ते म्हणाले. आता तरुणवर्ग माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांतील नोकऱ्या सोडून देऊन स्वतःचे स्टार्टअप उद्योग सुरु करताना दिसत आहे. काही सुरक्षित आणि फायदेशीर व्यवसायांमध्ये शेतीतील गुंतवणुकीचा समावेश होत असल्याचे तरुण उद्योजकांच्या लक्षात येत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
कृषिक्षेत्राचा सर्वांगीण विचार करता मूल्यसाखळ्यांच्या बाबतीत येणाऱ्या समस्यांना उत्तर देणाऱ्या अभिनव संकल्पना आणि किफायतशीर उपाय आता कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप उद्योगांकडून पुढे येत आहेत. भारतीय शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे आणि हळूहळू शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे सामर्थ्य या क्षेत्रात आहे, असा विश्वासही डॉ.जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला. हे स्टार्टअप उद्योग आणि उदयोन्मुख उद्योजक खऱ्या अर्थाने शेतकरी, डीलर, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यावसायिक आणि ग्राहक या घटकांना एकमेकांशी जोडणाऱ्या दुव्याचे काम करू शकतात. तसेच बाजारपेठेतील संपर्क वाढवणे आणि वेळेवर गुणवत्तापूर्ण उत्पादन निर्माण करणे, यासाठी हे उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी सांगितले.
तिसऱ्या 'टेकभारत' या तंत्रज्ञान संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना - 'भारताच्या अन्न-तंत्रज्ञान तसेच कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रात आणि कृषीआधारित अर्थव्यवस्थेत परिवर्तन' अशी असून, हे संमेलन अतिशय योग्य वेळी आयोजित होत आहे. देशातील 54 टक्के लोकसंख्या शेतीवर थेट अवलंबून असल्यामुळे, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. जीडीपी म्हणजे सकल देशान्तर्गत उत्पन्नात शेतीचा वाटा 19(21) टक्के इतका आहे', असेही डॉ.सिंग म्हणाले. "गेल्या काही वर्षांत, भारताच्या कृषीक्षेत्रात स्थिरपणे वाढ झाली असली तरी, तरुणांना प्रोत्साहन मिळेल व या क्षेत्रात काही नवीन ताज्या अभिनव संकल्पना येतील, अशा दिशेने अद्याप फार काही काम झाले नाही", असेही त्यांनी नमूद केले.
* * *
S.Thakur/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826897)
Visitor Counter : 233