पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्री स्वामीनारायण मंदिराने वडोदरा इथे आयोजित केलेल्या युवा शिबिरातील भाषण

Posted On: 19 MAY 2022 2:47PM by PIB Mumbai

जय स्वामी नारायणाय!

कार्यक्रमाला उपस्थित परम पूज्य गुरुजी श्री ज्ञानजीवन दास जी स्वामी, भारतीय जनता पार्टीचे गुजरात प्रदेशचे  अध्‍यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी  सीआर पाटील, गुजरात सरकार मधील मंत्री मनीषाबेन, विनुभाई, खासदार रंजनबेन, वडोदराचे महापौर केयूरभाई, सर्व मान्यवर अतिथिगण, पूज्‍य संतगण, उपस्थित सर्व  हरिभक्‍त, स्त्री आणि पुरुषगण आणि विशाल संख्येने माझ्यासमोर  युवा पिढी बसली आहे , हा  युवा झोम, युवा झुसा, युवा प्रेरणा, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.  जय स्‍वामीनारायण !

मला आनंद झाला आहे की संस्कार अभ्युदय शिबिराच्या या आयोजनात आज मला सहभागी होण्याची संधी मिळाली, हा  खरोखरच आनंदाचा प्रसंग आहे. या शिबिराची जी रूपरेखा आहे, जो उद्देश आहे, आणि जो प्रभाव आहे, तो तुम्हा सर्व संतांच्या उपस्थितीत आणखी उजळून निघेल. आपल्या संतांनी, आपल्या शास्त्रांनी आपल्याला शिकवले आहे की कुठल्याही समाजाची निर्मिती समाजाच्या प्रत्येक पिढीत सातत्यपूर्ण चरित्र घडवण्यामुळे होते. आपली भारतीय संस्कृती, परंपरा, त्यांचे आचार विचार एक प्रकारे आपल्या सांस्कृतिक वारसा समृद्धीमुळे घडतात.  आणि आपल्या संस्कृतीचे  सृजन, त्याची जर कुठली शाळा आहे, त्याचे जर कुठले मूळ बीज आहे तर ते आपले संस्कार आहेत. म्हणूनच हे संस्कार अभ्युदय शिबिर आपल्या युवकांच्या  अभ्युदय  प्रयत्नांबरोबरच आपल्या समाजाच्या अभ्युदयाचे  देखील एक स्वाभाविक पवित्र अभियान आहे.

हे प्रयत्न आहेत आपली ओळख आणि गौरवाच्या अभ्युदयाचे,  हे प्रयत्न आहेत आपल्या राष्ट्राच्या अभ्युदयाचे. मला विश्वास आहे,  हे युवा सहकारी जेव्हा या शिबिरात जातील,  तेव्हा त्यांच्यामध्ये  एका नवीन  ऊर्जेचा संचार  झालेला त्यांना जाणवेल. एक  नवीन स्पष्टता आणि नवचैतन्याचा संचार ते अनुभवतील. मी तुम्हा सर्वांना या नवीन सुरुवातीसाठी, नव - प्रस्थानासाठी, नव -संकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो ,    

यावर्षी  'संस्कार अभ्युदय शिबिराचे ' हे आयोजन एका अशा वेळी होत आहे, जेव्हा  देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.  आज आपण नवभारताच्या निर्मितीसाठी सामूहिक संकल्प करत आहोत, सामूहिक प्रयत्न करत आहोत.  एक असा नवीन भारत, ज्याची नवी ओळख असेल, आधुनिक असेल, भविष्याचा विचार करणारा असेल, आणि परंपरा प्राचीन मजबूत मुळांशी बांधलेली असेल. असा नवीन भारत, जो नवीन विचार आणि प्राचीन संस्कृती, या दोन्हींची सांगड घालून पुढे जाईल, आणि संपूर्ण मानव जातीला  दिशा देईल.

तुम्ही कोणतेही क्षेत्र बघा जिथे आव्हाने आहेत तिथे नव्या उमेदीने भारत अनेक संधी घेऊन आला आहे, जिथे समस्या आहेत तिथे भारत उपाय योजना सादर  करत आहे. कोरोना संकटाच्या काळात जगाला लस आणि औषधांचा पुरवठा करण्यापासून ते पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना आत्मनिर्भर भारत ही आशा, जागतिक अशांतता आणि संघर्षामध्ये शांततेसाठी एक सामर्थ्यवान राष्ट्राची भूमिका अशा अनेक बाबतीत आज भारत जगाची नवी उमेद बनला आहे, जगासमोर हवामान बदलाचे संकट आवासून उभे असताना, भारत शाश्वत जीवनासाठी आपल्या प्राचीन अनुभवांद्वारे भविष्यासाठी नेतृत्व करत आहे. आपण संपूर्ण मानवतेला योगसाधनेचा मार्ग दाखवला आहे, आयुर्वेदाच्या सामर्थ्याची ओळख करून देत आहोत. सॉफ्टवेअर पासून अंतराळ क्षेत्रापर्यंत एका नवीन भविष्यासाठी तत्पर  देशाच्या रूपाने उदयाला येत आहोत. 

मित्रांनो,

आज भारताचे यश हा आपल्या युवकांच्या सामर्थ्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. आज देशात सरकारच्या कामकाजाची पद्धत बदलली आहे. समाजाची विचारसरणी बदलली आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की लोकसहभाग वाढला आहे. जे उद्दिष्ट भारतासाठी अशक्य मानले जात होते, हे जगच पाहत आहे की भारत अशा विविध क्षेत्रांमध्ये किती उत्तम कामगिरी करत आहे. स्टार्टअप विश्वात भारताचा वाढता दबदबा हे देखील त्याचंच उदाहरण आहे. आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप परिसंस्था असलेला देश आहे.  याचे नेतृत्व  आपले युवकच करत आहेत .

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटले जाते, शुद्ध बुद्धी आणि मानवीय संस्कार आपल्याबरोबरच इतरांचे देखील कल्याण करतात. जर बुद्धी शुद्ध आहे, तर काहीही अशक्य नाही, काहीही अप्राप्य नाही. म्हणूनच,  स्वामी नारायण संप्रदायातील  संत संस्कार अभ्युदय कार्यक्रमांच्या माध्यमातून स्व-निर्माण, चरित्र निर्माण, याचे एवढे मोठे अनुष्ठान चालवत आहेत. आपल्यासाठी संस्कार म्हणजे शिक्षण, सेवा आणि संवेदनशीलता! आपल्यासाठी संस्कार म्हणजे समर्पण, संकल्प आणि सामर्थ्य आहे. आपण आपली प्रगती साध्य करूया मात्र त्याच बरोबर ते इतरांच्या कल्याणाचे माध्यमही बनावे. आपण यशाची नव-नवी शिखरे साध्य केली तरी आपले यश हे सर्वांच्या सेवेचे माध्यम  असावे.  हेच भगवान स्वामीनारायण यांच्या शिकवणीचे सार आहे आणि हाच भारताचा स्वभाव देखील आहे.

आज तुम्ही सर्व गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आला आहात, आणि एवढ्या मोठ्या संख्येने युवक- युवती माझ्या डोळ्यांसमोर आहेत, तेव्हा मला वाटले की मी वडोदरा मध्ये प्रत्यक्ष आलो असतो तर  बरे झाले असते. तुम्हा सर्वांची प्रत्यक्ष भेट झाली असती तर आणखी मजा आली असती. मात्र अनेक अडचणी असतात, वेळेचे बंधन असते. त्यामुळे शक्य झाले नाही. आपले जीतुभाई हसत आहेत. स्वाभाविक आहे, कारण वडोदरा मध्ये मला भूतकाळात खूप वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली.  आणि माझ्यासाठी तर अभिमानाची बाब आहे की  वडोदरा आणि काशीने मला एकाचवेळी खासदार बनवले. भारतीय जनता पार्टीने मला खासदार बनण्यासाठी तिकीट दिले मात्र  वडोदरा आणि काशीने पंतप्रधान बनण्यासाठी तिकीट दिले.

तुम्ही कल्पना करू शकता की वडोदराशी माझे कसे नाते आहे.  वडोदराचा विषय निघतो तेव्हा  अनेक दिग्गजांची आठवण येते, आपले  केशुभाई ठक्कर, जमनादास, कृष्णकांत भाई शाह, माझे सहकारी नलीन भाई भट्ट, बाबुभाई ओझा, रमेश भाई गुप्ता असे अनेक चेहरे माझ्यासमोर येतात. त्याचबरोबर  युवा टीम ज्यांच्याबरोबर मला अनेक वर्षे  काम करण्याची संधी मिळाली. ते देखील आज खूप मोठ्या पदांवर आहेत.  गुजरातची सेवा करत आहेत.  आणि नेहमीच वडोदराला संस्कार नगरी म्हणून ओळखले जाते. वडोदराची ओळख ही संस्कार आहे. या  संस्कार नगरीत  संस्कार उत्सव असेल तर स्वाभाविक आहे आणि तुम्हा सर्वांना आठवतच असेल की अनेक वर्षांपूर्वी मी  वडोदरामध्ये  भाषण दिले होते. एका जाहीर सभाच होती. त्यात  मी स्टॅचू ऑफ युनिटीचे वर्णन केले होते. तेव्हा तर स्टॅच्यू ऑफ यूनिटीवर कल्पना विश्वात काम सुरु होते. आणि त्यावेळी मी म्हटले होते की जेव्हा हा स्टॅच्यू ऑफ यूनिटी तयार होईल आणि जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनेल, तेव्हा  वडोदरा त्याची मूळ भूमी बनेल. वडोदरा स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा मूळ आधार बनेल, असे मी अनेक वर्षांपूर्वी म्हटले होते. आज समग्र मध्य गुजरात, पर्यटनाची संपूर्ण व्यवस्था ,वडोदरा याचा केंद्रबिंदू बनत आहे. ज्याप्रमाणे पावागढ़च्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे आणि महाकालीचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. माझीही  इच्छा आहे की आगामी काळात महाकालीच्या चरणांशी माथा टेकवायला नक्की येईन. मात्र  पावागढ़ असो किंवा स्टॅच्यू ऑफ यूनिटी असो, या सर्व गोष्टी या  वडोदराच्या  संस्कार नगरीचा  नवीन विस्तार बनत आहेत. औद्योगिक दृष्ट्या आणि वडोदराची ख्याती देखील पाहा,  वडोदरामध्ये तयार होत असलेले मेट्रोचे डबे जगभरात धावत आहेत. हे  वडोदऱ्याचे सामर्थ्य आहे, हेच भारताचे सामर्थ्य आहे. हे सगळे या दशकातच बनले  आहे. वेगाने आपण नवनवीन क्षेत्रात पुढे जात आहोत. मात्र आज जेव्हा मी  नव युवकांना भेटत  आहे, तेव्हा ,आज आपले  पूज्य  स्वामी जी यांनी जे म्हटले होते ते आठवतंय, ते म्हणाले की कधी-कधी भेटणे शक्य नसेल, तर नका भेटू, मात्र देशसेवेला एका बाजूला ठेवू नका. एका संतांच्या तोंडून निघालेले हे शब्द छोटे नाहीत, मित्रांनो, विसरू नका. याचा अर्थ त्यांनी भेटणे सोडून द्यायला सांगितलेले नाही, तर महात्मा म्हणाले देशासाठी काम केले जायला हवे. अनेकदा असे होते की जेव्हा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे, तेव्हा आपल्याला माहित आहे की आपल्या नशिबात देशासाठी मरण्याचे  सौभाग्य नाही, मात्र देशासाठी जगण्याचे  सौभाग्य तर लाभले आहे. म्हणूनच देशासाठी जगायला हवे. देशासाठी काही ना काही करायला हवे.  देशासाठी काही करणे म्हणजे छोट्या -छोट्या गोष्टींतून हे कार्य आपण करू शकतो. समजा मी तुम्हा सर्वांना विनंती केली आणि सर्व संतगणांनी यासाठी दर आठवड्याला माझ्याकडे चौकशी केली आणि आपल्याकडे जितके हरिभक्त आहेत,  गुजरात मध्ये असतील, देशात असतील, ते किमान गुजरातमध्ये आणि देशात  एक काम करू शकतील का? स्वातंत्र्याच्या या  अमृत महोत्सव दरम्यान 15 ऑगस्ट 2023 पर्यंत,  जास्त नाही , 15 ऑगस्ट 2023 पर्यंत, आणि जे लोक या संस्कार शिबिरात आले आहेत, ते आणि त्यांचा मित्र परिवार यांनी ठरवावे की या एका वर्षात कुठलेही रोख व्यवहार करायचे नाहीत. डिजिटल व्यवहार करायचे.

डिजिटल चलनाचाच वापर करायचा,  मोबाईल फोन द्वारे पैशांचे व्यवहार करायचे. तुम्ही विचार करा किती मोठी क्रांती यातून घडून येईल. जेव्हा तुम्ही भाजीवाल्याकडे जाल आणि त्याला सांगाल की मी तर डिजिटल पेमेन्ट करेन तेव्हा भाजीवाला देखील शिकेल डिजिटल पेमेन्ट कसे घेतात ते, तो देखील बँकेत खाते उघडेल, त्याचे पैसेही चांगल्या कामासाठी खर्च होऊ लागतील.  एक छोटा प्रयत्न कितीतरी लोकांच्या जीवनात व्यापक परिवर्तन घडवू शकते. कराल ना मित्रांनो? जरा हात वर केला तर मला इथून दिसेल, असे नाही, जरा ताकदीने, जय स्वामिनारायण म्हटल्यानंतर असे चालणार नाही.

आता एक दुसरे काम. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षातून किमान 75 तासमी फार म्हणत नाही, 75 तास मातृभूमीच्या सेवेसाठी हाती काहीतरी कार्य घ्याहवे असेल तर स्वच्छतेचे कार्य हाती घ्याबालकांच्या कुपोषणमुक्तीचे काम हाती घ्या,प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तीलोकांनी प्लास्टिक वापरू नयेलोकांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नयेयासाठी मोहीम चालवा,  असे कोणतेही कार्य करा आणि या वर्षी त्यासाठी 75 तास देऊ शकता काआणि जेव्हा मी स्वच्छतेबद्दल बोलत आहे तेव्हा मी वडोदरामध्ये बोलत आहे आणि   वडोदरा आणि काशी सोबत माझे नाते एकच राहिले आहे. साहजिकच आता काशीची गोष्टही लक्षात येईल. जेव्हा मी स्वच्छता मोहीम राबवत होतोतेव्हा काशीमध्येनागालँडमधील तिमसुतुला ईमसोंग नावाच्या एका मुलीवर आमच्या इथे चित्रलेखाने एक सुंदर लेख लिहिला होता. ही मुलगी काही काळापूर्वी काशी येथे शिक्षणासाठी आली होती. काशीमध्ये वास्तव्याला असताना तिला मजा येऊ लागली. ती बराच काळ काशीमध्ये  राहिली. नागालँडच्या ख्रिस्ती संप्रदायाच्या उपासनेवर विश्वास ठेवणारी ती मुलगी होती. पण जेव्हा स्वच्छता मोहीम आली तेव्हा तिने एकटीने काशीच्या घाटांची स्वच्छता सुरू केली. हळूहळू  अनेक नव तरुण वर्ग या कार्यात तिच्यासोबत सहभागी होऊ लागला. जीन्स पँट घातलेली सुशिक्षित मुले -मुली इतकी मेहनत करत आहेतहे बघायला लोक यायचे आणि मग संपूर्ण काशी त्यांच्यासोबत सहभागी होऊ लागली. जरा विचार करा कीजेव्हा आपल्या इथे नागालँडमधील एक मुलगी काशीचा घाट साफ करते तेव्हा कल्पना करा की अंतर्मनावर किती मोठा परिणाम झाला असेल. पू. ज्ञानजीवन स्वामी यांनी आताच सांगितले कीस्वच्छतेसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजेजबाबदारी आपल्या हाती  घेतली पाहिजे. ही सर्व देशासाठीची कार्ये आहेत. मी पाण्याची बचत केली  तर त्यातही देशभक्ती आहेविजेची बचत केली तर त्यातही देशभक्ती आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या भक्तांचे असे एकही घर असू नये  की, ज्यामध्ये एलईडी बल्बचा वापर होत नसेल. एलईडी बल्ब वापरल्यास प्रकाश चांगला मिळतोखर्चही कमी होतो आणि विजेचीही बचत होते. जनऔषधी केंद्रगुजरातमध्ये अनेक ठिकाणी जन औषधी केंद्रे असल्याचे तुम्ही पाहिले असेल.  कोणत्याही कुटुंबात एक मधुमेहाचा रुग्ण नक्कीच असेल आणि त्या रुग्णासाठी दर महिन्याला औषधांसाठी त्या कुटुंबाला 1000, 1200, 1500 रुपये खर्च येतो. दर महिन्याला इतकी रक्कम ते कसे खर्च करू शकताततीच औषधे जनऔषधी केंद्रात 100-150 रुपयांमध्ये  उपलब्ध आहेत. तर माझ्या तरुण मित्रांनोमोदींनी तर हे काम केले आहेसरकारने हे काम केले आहेमध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील अनेकांना माहित नाही की अशी काही जनऔषधी केंद्रे सुरू आहेतत्यांना तिथे घेऊन जास्वस्त दरात औषधे मिळवून द्या, ते तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि यापेक्षा मोठा संस्कार काय असू शकतोही अशी कार्य आहेत जी आपण सहज करू शकतो. त्यात देशभक्ती भरलेली आहे, बंधूंनो. देशभक्तीसाठी काहीतरी वेगळे केले तरच ती देशभक्ती आहे असे होत नाही. आपल्या साध्या सरळ जीवनात समाजाचे भले व्हावेदेशाचे भले व्हावेआजूबाजूच्यांचे भले व्हावे, आता तुम्ही विचार करा की आपली गरीब मुले कुपोषणमुक्त झाली तर काय होईल?आपले मूल निरोगी असेल तर आपले राज्यआपला देश निरोगी राहील. हा विचार आपण केला पाहिजे. सध्या गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीची मोहीम सुरू आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. धरणी माताभारत माता की जय आपण बोलतोनाही काही भारत माता ही आपली धरणीमाता आहे. तिची काळजी घेतो का आपणरसायनेखतेयुरिया टाकून आपण धरणी मातेचे नुकसान करत आहोत. या धरणीमातेला आपण किती औषधे देत आहोत आणि त्यावर उपाय म्हणजे नैसर्गिक शेती. गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीची मोहीम सुरू आहेतुम्ही सर्व तरुणांनोज्यांचे जीवन शेतीशी निगडीत आहे. गावांशी जोडलेले आहेआपण सर्वांनी संकल्प करूया की,  आपण हरिभक्त आहोतस्वामीनारायण भगवंताच्या सेवेत आहोतत्यामुळे किमान आपल्या कुटुंबातील कोणीही शेतात कुठलेही रसायन वापरणार नाही. केवळ नैसर्गिक शेतीच करणार. ही देखील धरणी मातेची सेवा आहेहीच तर आहे भारतमातेची सेवा.


मित्रांनो,

 

संस्कार हे आपल्या जीवन व्यवहाराशी जोडले जावेत हीच माझी अपेक्षा आहेफक्त वाणी-शब्दातील  संस्कार पुरेसे नाहीत. संस्कार हा संकल्प झाला पाहिजे. संस्कार हे सिद्धीचे माध्यम बनले पाहिजे. माझा विश्वास आहे कीआजच्या या शिबिरातून असे अनेक उत्तम विचार घेऊन तुम्ही जिथे जाणार तिथे तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या भारतमातेच्याकोट्यवधी देशवासीयांच्या शुभेच्छा घेऊन जाणार आहात.


तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळालीतुम्हा सर्वांना शुभेच्छा.

पूज्य संतांना माझे वंदनजय स्वामीनारायण.

***

SRT/S.Kane/S.Chavan/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1826875) Visitor Counter : 240