संरक्षण मंत्रालय

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या जहाजरोधी क्षेपणास्त्राची घेतली पहिली यशस्वी उड्डाण चाचणी

Posted On: 18 MAY 2022 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय नौदलाने 18 मे 2022 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी तळावरून (ITR), चांदीपूर इथे नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून प्रक्षेपित केलेल्या स्वदेशी नौदल जहाजरोधी क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेतली. मोहिमेने त्याची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली.  भारतीय नौदलासाठी हवेतून मारा करणारी ही पहिली स्वदेशी जहाजरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

क्षेपणास्त्राने रडारच्या कक्षेत न येता (सी स्किमिंग) सागरी पृष्ठभागाच्या काही फुटांवरून मार्गक्रमण करत नियंत्रण, मार्गदर्शन आणि मोहीमेच्या मापदंडांचे तंतोतंत पालन करुन अचूक लक्ष्यभेद केला. सर्व उपप्रणालींनी समाधानकारक कामगिरी केली.  चाचणी तळ आणि लक्ष्यभेद स्थळाजवळ तैनात सेन्सर्सने क्षेपणास्त्राच्या मार्गाचा मागोवा घेतला आणि सर्व घटनांची नोंद केली.

क्षेपणास्त्रात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला आहे. यात हेलिकॉप्टरसाठी स्वदेशी विकसित लाँचरचाही समावेश आहे. क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालीमध्ये अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली (नेव्हिगेशन सिस्टीम) आणि एकात्मिक एव्हीओनिक्सचा समावेश आहे. उड्डाण चाचणीवेळी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या विकासात्मक उड्डाण चाचणीसाठी DRDO,भारतीय नौदल आणि संबंधित संघांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केले.  क्षेपणास्त्र प्रणालीच्या स्वदेशी रचना आणि विकासामध्ये भारताने उच्च पातळी गाठली आहे असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी मोहीमेची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रकल्प पथकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी या प्रकल्पाला केलेल्या मदतीबद्दल भारतीय नौदल आणि नौदल फ्लाइट टेस्ट स्क्वाड्रनचे कौतुक केले तसेच ही प्रणाली भारतीय नौदलाची आक्रमक क्षमता अधिक मजबूत करेल असेही ते म्हणाले.

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1826337) Visitor Counter : 350