भारतीय निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद केली आयोजित


मुख्य निवडणूक आयुक्तपदाचे उमेदवार राजीव कुमार यांनी सीईओंना निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीत करण्याचे केले आवाहन

Posted On: 12 MAY 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 12 मे 2022

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्ली येथे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची दोन दिवसीय  परिषद आयोजित केली आहे. निवडणूक नियोजन, खर्चावर देखरेख, मतदार यादी, माहिती तंत्रज्ञान वापर, डेटा व्यवस्थापन , ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी, तक्रारींचे वेळेवर निराकरण, एसव्हीईईपी धोरण आणि मतदार संपर्क , माध्यम आणि संवाद या विषयांवरील  चर्चा तसेच  पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील अनुभव आणि निष्कर्ष यांचे आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या भाषणादरम्यान , मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि एकमेकांकडून शिकण्यासाठी अशा परिषदा  हा एक उत्कृष्ट मंच आहे. मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले की, महामारीच्या काळात झालेल्या या पाच राज्यांच्या निवडणुका अनुकरणीय होत्या आणि त्यांना पूर्वीचे कोणतेही उदाहरण किंवा संदर्भ नव्हते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष  रॅलींवर बंदी घालणे, डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देणे आणि महत्वपूर्ण हितधारकांसह परिस्थितीचा साप्ताहिक आढावा घेणे यासारख्या महत्वपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या.मुख्य निवडणूक आयुक्तांनी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त  केलेले राजीव कुमार यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग नवी उंची गाठेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचे उमेदवार  राजीव कुमार यांनी सीईओंना निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीत  करण्याचे आवाहन केले.

परिषदे दरम्यान आयोगाने आज निवडणूक आयोगाचे मासिक ‘माय व्होट मॅटर्स’ची नवी आवृत्ती प्रकाशित केली.

त्रैमासिक मासिकाच्या या आवृत्तीमध्ये 2022 मध्ये मतदान झालेल्या पाच राज्यांनी हाती घेतलेले विविध उपक्रम आणि उपाययोजना तसेच तिथल्या निवडणुकी संबंधी गोष्टींचा समावेश आहे. ई लिंक: https://eci.gov.in/files/file/14171-my-vote-matters-vol-iii-issue-2/

आयोगाने निवडणूक आकडेवारीचे पॉकेट बुकही प्रकाशित केले. या पुस्तिकेत सादर केलेला डेटा 2017 ते 2021 या कालावधीत देशातील निवडणूक प्रवासाचे  एक मनोरंजक चित्र उभे  करतो. त्यात या कालावधीत झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यसभा आणि विधानपरिषदांच्या निवडणुकांची  ठळक वैशिष्ट्ये देखील आहेत. निवडणूक आकडेवारी पॉकेट बुक हे 2014 पासून भारतातील निवडणुकांची आकडेवारी सोप्या स्वरूपात उपलब्ध करून देणारे भारतीय निवडणूक आयोगाचे नियमित प्रकाशन आहे.

'माय व्होट मॅटर्स' आणि निवडणूक आकडेवारी  पॉकेट बुक सोबत, आयोगाने 1957 ते 1977 दरम्यान झालेल्या दुस-या ते सातव्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कथनात्मक अहवालांचे पुनर्मुद्रण देखील प्रकाशित  केले. हा अहवाल हा एक सर्वसमावेशक दस्तावेज आहे ज्यात भारतीय निवडणुका मुक्त, निष्पक्ष, सहभागी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आयोगाने केलेल्या प्रयत्नांची इत्यंभूत  माहिती दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमधील अनुभव, नव्या गोष्टी आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब याबद्दल पाच राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी संक्षिप्त सादरीकरण केले.

परिषदेला सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी, वरिष्ठ डीईसी , डीईसी , महासंचालक  आणि आयोगातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी बख्तावरपूरमध्ये नव्याने उभारलेल्या एकात्मिक निवडणूक संकुलाला भेट देण्याबरोबरच पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) धोरणावर  स्वतंत्र चर्चाही होणार आहे.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824861) Visitor Counter : 173