आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केले संबोधित
“बळकट परिचर्या क्षेत्र हे भक्कम आरोग्य सेवा क्षेत्राचा एक अत्यावश्यक भाग आहे. परिचारिका म्हणजे रुग्णाची काळजी घेणारे मन आणि आत्मा आहेत " : डॉ. भारती प्रवीण पवार
Posted On:
12 MAY 2022 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2022
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज संबोधित केले. भारतीय परिचर्या परिषदेने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. परिचारिकांचे परिश्रम आणि समाजाच्या सेवेसाठी देत असलेल्या योगदानासाठी ,आरोग्य सेवेतील परिचारिकांचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने, आधुनिक परिचर्या क्षेत्राच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.
देशासाठी समर्पित सेवा देत असल्याबद्दल संपूर्ण परिचारिका समुदायाचे अभिनंदन करून डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, “आरोग्य सेवा क्षेत्रात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतात.दिवस असो वा रात्र, चेहऱ्यावर कोणतीही नाराजी न दर्शवता रुग्णांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या परिचारिका या नायक आहेत. अथकपणे रुग्णांच्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या परिचारिका आरोग्य क्षेत्राचा आधारस्तंभ आहेत.”
कोविड महामारीच्या काळात परिचारिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत असे सांगत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कोविड महामारीमध्ये परिचर्या क्षेत्राच्या उल्लेखनीय योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. या महान पेशाबद्दल कृतज्ञता आणि आदराची भावना त्यांनी व्यक्त केली. परिचर्या हा सध्या आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा व्यावसायिक गट आहे, यामध्ये अंदाजे 59% आरोग्य व्यावसायिक आहेत आणि संपर्काचा पहिला बिंदू म्हणून ते कार्यरत असल्यामुळे आरोग्य सेवा वितरण प्रणालीमध्ये त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनते.असे त्या म्हणाल्या. “एक बळकट परिचर्या क्षेत्र हा भक्कम आरोग्य सेवा क्षेत्राचा एक अत्यावश्यक भाग आहे. परिचारिका हा रुग्णालयांचा पाया आहे. परिचारिका म्हणजे रुग्णाची काळजी घेणारे मन आणि आत्मा आहेत. वैयक्तिक आणि समुदायाच्या आरोग्यामध्ये परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात.परिचर्या क्षेत्रात गुंतवणूक केल्याने सुधारित आरोग्य सेवा आणि रोग प्रतिबंधाच्या माध्यमातून वैश्विक आरोग्य व्याप्तीची आमची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल”,असे त्यांनी सांगितले.
परिचारिका क्षेत्रासाठीचे सरकारचे उपक्रम अधोरेखित करताना, परिचारिकांच्या थेट नोंदणीसाठी भारतीय परिचर्या परिषद आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या 'परिचारिका नोंदणी आणि मार्गनिरीक्षण प्रणाली’ या तंत्रज्ञान मंचाबद्दल केंद्रीय राज्यमंत्र्यांनी माहिती दिली. भारतीय परिचारिका थेट नोंदणी ही एक ऑनलाइन नोंदणी प्रणाली आहे जी सध्या रुग्णसेवा देत असलेल्या परिचारिकांची नवीनतम माहिती प्रदान करते,यामुळे भारतातील परिचर्या व्यावसायिकांसाठी उत्तम मनुष्यबळ नियोजन आणि धोरण तयार करण्यात सरकारला मदत होणार आहे. या व्यतिरिक्त, भारतीय परिचर्या परिषदेने (आयएनसी ) परिचर्या अध्यापकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी दिल्ली एनसीआरमध्ये कौशल्य सिम्युलेशन प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. भारतीय परिचर्या परिषदेने क्रिटिकल केअर रेसिडेन्सी प्रोग्राममधील परिचारिका व्यवसायी विकसित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जेरियाट्रिक आणि मानसोपचार परिचर्येमधील विशेष अभ्यासक्रम सुरु होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824746)
Visitor Counter : 207