पंतप्रधान कार्यालय

उष्णतेच्या लाटेबाबत व्यवस्थापनाचा आणि पावसाळ्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक


उष्णतेची लाट किंवा आगीच्या घटनांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना करा: पंतप्रधान

देशातील जंगलांची असुरक्षितता कमी करण्यासाठी आगीच्या धोक्यांविरोधात सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज :पंतप्रधान

राज्यांना ‘पूर सज्जता योजना’ तयार करण्याचा सल्ला

पूरप्रवण राज्यांमध्ये एनडीआरएफ तैनाती योजना विकसित करेल

किनारपट्टीलगतच्या भागात हवामानाच्या इशाऱ्याची माहिती वेळेत प्रसारित करण्यासह खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

समाजाला जागरुक करण्यासाठी समाजमाध्यमांचा सक्रियपणे वापर करा: पंतप्रधान

Posted On: 05 MAY 2022 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उष्णतेच्या लाटा व्यवस्थापन संबंधित परिस्थितीचा आणि पावसाळ्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेतला.

देशभरात मार्च-मे 2022 मध्ये उच्च तापमान सातत्याने राहिल्यासंदर्भात,  भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या बैठकीत माहिती दिली. राज्य, जिल्हा आणि शहर स्तरावर प्रमाणित  प्रतिसाद म्हणून उष्णता कृती योजना तयार करण्याचा सल्ला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  देण्यात आला आहे.नैऋत्य मोसमी पावसाच्या  तयारीसंदर्भात, सर्व राज्यांना 'पूर सज्जता योजना ' तयार करण्याचा आणि योग्य त्या तयारीसाठी  उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एनडीआरएफला पूरग्रस्त राज्यांमध्ये त्यांची तैनाती योजना विकसित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा  सक्रिय वापर व्यापकपणे अवलंबावा  लागेल., असे पंतप्रधानांनी सांगितले.

उष्णतेची लाट किंवा आगीच्या घटनांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आपण सर्वप्रकारच्या  उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अशा कोणत्याही घटनांना आपण कमीत कमी वेळेत प्रतिसाद द्यायला हवा असे त्यांनी सांगितले.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयाचे नियमित अग्नी सुरक्षा परीक्षण  होणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला.आगीचा धोका असलेल्या, देशातील विविध वन परिसंस्थांमधील जंगलांची असुरक्षितता लक्षणीय कमी करण्यासाठी, संभाव्य आग वेळेवर शोधण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी आणि आगीच्या घटनेनंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी वन कर्मचारी आणि संस्थांची  क्षमता वाढवण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य रोगांचा प्रसार टाळण्याच्या दृष्टीने, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी व्यवस्था असल्याची खात्री करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

उष्णतेची लाट आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही घटनांसाठी सर्व यंत्रणा सज्ज राहण्याच्या अनुषंगाने , केंद्र आणि राज्यांच्या संस्थांमधील प्रभावी समन्वयाच्या  गरजेवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.  किनारी भागात हवामानाच्या इशाऱ्याची माहिती वेळेत प्रसारित  करण्यासह खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, पंतप्रधानांचे सल्लागार, कॅबिनेट सचिव, गृह, आरोग्य, जलशक्ती या मंत्रालयाचे सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य, एनडीएमए, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि एनडीआरएफचे महासंचालक  उपस्थित होते. 

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823087) Visitor Counter : 283