पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 04 MAY 2022 11:01AM by PIB Mumbai

महामहिम,

तज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक, धोरणकर्ते आणि जगभरातील माझ्या प्रिय मित्रांनो,

नमस्कार !

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या चौथ्या पर्वात सहभागी होताना मला आनंद होत आहे. सुरुवातीला, आपण स्वतःला हे स्मरण करून द्यायला हवे की, शाश्वत विकास उद्दिष्टांचे वचन कोणालाही मागे न ठेवण्याचे आहे. म्हणूनच आपण  अत्यंत  गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांच्या आकांक्षा पूर्ततेसाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आणि, पायाभूत सुविधा म्हणजे केवळ भांडवली संपत्ती निर्माण करणे आणि गुंतवणुकीवर दीर्घकालीन परतावा निर्माण करणे असे नाही. ही आकडेवारी नाही. हे  पैशासाठी नाही, हे लोकांसाठी  आहे.  त्यांना उच्च दर्जाच्या, विश्वासार्ह आणि शाश्वत सेवा समन्यायी पद्धतीने प्रदान करण्याबद्दल आहे. जनता कोणत्याही पायाभूत सुविधांच्या  विकास गाथेच्या केंद्रस्थानी असली पाहिजे आणि, आम्ही भारतात तेच करत आहोत. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत, वीजेपासून वाहतुकीपर्यंत आणि बहुतांश क्षेत्रांमध्ये, आम्ही भारतातील मूलभूत सेवांची तरतूद वाढवत आहोत. आम्ही अगदी प्रत्यक्ष पद्धतीने हवामान बदलाचा सामना करत आहोत. म्हणूनच, कॉप -26 मध्ये, आम्ही   आमच्या विकासात्मक प्रयत्नांच्या समांतर 2070 पर्यंत उत्सर्जनासंदर्भातील 'निव्वळ शून्य' उद्दिष्ट गाठण्यासाठी वचनबद्ध आहोत.

मित्रांनो,

पायाभूत सुविधांचा विकास उल्लेखनीय मार्गांनी मानवी क्षमता मुक्त  करू शकतो. मात्र, आपण पायाभूत सुविधांना गृहीत धरू नये. या व्यवस्थांमध्ये  हवामान बदलासह ज्ञात आणि अज्ञात आव्हाने आहेत. जेव्हा आपण  2019 मध्ये सीडीआरआय म्हणजेच आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची आघाडी निर्माण केली, तेव्हा ती  आमच्या स्वतःच्या अनुभवावर आणि जाणवलेल्या गरजांवर आधारित होती. जेव्हा एखादा पूल पुरात वाहून जातो, जेव्हा चक्रीवादळात वाऱ्याने वीजवाहिनी तुटते, जेव्हा जंगलात लागलेल्या आगीमुळे संपर्क मनोऱ्याचे नुकसान होते, यामुळे थेट हजारो लोकांचे जीवन आणि उपजीविका विस्कळीत होते. अशा पायाभूत सुविधांच्या हानीचे परिणाम वर्षानुवर्षे टिकू शकतात आणि लाखो लोकांवर परिणाम करतात. त्यामुळे आपल्यासमोरील आव्हान अगदी स्पष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान आपल्या हाती आहे, आपण शाश्वत आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करू शकतो का? या आव्हानाची निश्चिती  सीडीआरआयच्या निर्मितीला पाठबळ देते. या आघाडीचा झालेला  विस्तार  आणि आघाडीला  जगभरातून मिळालेला व्यापक पाठिंबा सूचित करतो  की, ही आपली  सामायिक चिंता आहे.


मित्रांनो,

अडीच वर्षांच्या अल्पावधीत सीडीआरआयने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि बहुमूल्य योगदान दिले आहे. गेल्या वर्षी कॉप -26 मध्ये सुरू करण्यात आलेला 'द्वीपकल्पीय देशांसाठी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा' हा उपक्रम लहान द्वीप  देशांसोबत काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची स्पष्ट अभिव्यक्ती आहे. चक्रीवादळात वीज खंडित होण्याचा कालावधी कमी करून, वीज यंत्रणेची प्रतिरोधकता  बळकट करण्यासाठी सीडीआरआयने केलेल्या कार्यामुळे भारतात किनारपट्टीवरील नागरिकांना यापूर्वीच फायदा झाला आहे. जसजसे हे काम पुढच्या टप्प्यात जाईल तसतसे, दरवर्षी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा सामना करणार्‍या 130 दशलक्षहून अधिक लोकांना फायदा होण्यासाठी ते विस्तारले जाऊ शकते. आपत्ती प्रतिरोधक विमानतळांसंदर्भात जगभरातील 150 विमानतळांचा अभ्यास करण्याचे काम सीडीआयआर करत आहे. त्यात जागतिक कनेक्टिव्हिटीच्या प्रतिरोधकतेसाठी योगदान देण्याची क्षमता आहे. सीडीआरआयच्या नेतृत्वात 'पायाभूत सुविधांच्या आपत्ती प्रतिरोधकतेचे जागतिक मूल्यांकन', हे जागतिक माहिती संग्रह तयार करण्यात मदत करेल जो अत्यंत मौल्यवान असेल. सदस्य देशांमधील सीडीआरआय सहकारी आधीच उपाय तयार करत आहेत जे विस्तारले  जाऊ शकतात. ते वचनबद्ध तज्ज्ञांचे जागतिक नेटवर्क देखील तयार करत आहेत जे आपल्या  पायाभूत सुविधा प्रणालींसाठी एक आपत्ती प्रतिरोधक  भविष्य घडवण्यासाठी मदत करेल.

मित्रांनो,

आपले  भविष्य आपत्ती प्रतिरोधक  बनवण्यासाठी, आपल्याला  'आपत्ती व्यवस्थापन पायाभूत सुविधा संक्रमण 'च्या दिशेने काम करावे लागेल, जे या परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. प्रतिरोधक पायाभूत सुविधा देखील आपल्या  व्यापक समायोजन प्रयत्नांचा केंद्रबिंदू असू शकतात. जर आपण पायाभूत सुविधा प्रतिरोधक बनवल्या तर आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी आपत्ती टाळू शकतो. हे एक सामायिक स्वप्न आहे, एक सामायिक दृष्टीकोन  आहे, जो  आपण पूर्ण करू शकतो, आणि आपण ते प्रत्यक्षात आणले पाहिजे. मी समारोप करण्यापूर्वी, मी या परिषदेचे सह- आयोजन केल्याबद्दल सीडीआरआय आणि युनायटेड स्टेट्स सरकारचे अभिनंदन करतो.

हा कार्यक्रम ज्यांनी सह-निर्मित केला आहे अशा सर्व भागीदारांनाही मी माझ्या शुभेच्छा देतो. मी तुम्हाला सर्व फलदायी चर्चा आणि उत्पादनक्षम चर्चेसाठी शुभेच्छा देतो.


धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

***

ST/SC/CT

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1822552) Visitor Counter : 288