पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेचे उद्घाटन


“आज भारताकडे खूप काही आहे. आपल्याला फक्त आपला आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची भावना मजबूत करायची आहे”

"सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनीही उद्योजक व्हावे आणि स्वप्ने बघावीत आणि उद्योजकतेचा अभिमान बाळगावा, असा शासनाचा निरंतर प्रयत्न असतो"

"प्रत्येक लहान-मोठा व्यवसाय राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावत आहे आणि 'सबका प्रयास' ही भावना अमृत काळातील नव्या भारताची ताकद बनत आहे"

गट तयार करून फिनटेक, एनईपी इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांच्या अंमलबजावणीसाठी सूचना आणि मदत करण्याचे पाटीदार समुदायाला आवाहन

Posted On: 29 APR 2022 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सरदारधामद्वारे आयोजित जागतिक पाटीदार व्यवसाय शिखर परिषदेचे (GPBS) उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि केंद्रीय मंत्री आणि नामंकित उद्योजक उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सुरत हे जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या शहरांच्या दर्जाचे एक शहर असल्याचे नमूद केले. सरदार पटेल यांच्या शब्दांचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, आज भारताकडे खूप काही आहे. “आपल्याला फक्त आपला आत्मविश्वास, आत्मनिर्भरतेची भावना मजबूत करायची आहे. विकासात सर्वांचा सहभाग असेल, सर्वांचे प्रयत्न असतील तेव्हाच हा आत्मविश्वास येईल.”

देशातील उद्योजकतेची भावना वाढविण्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, सरकारची धोरणे आणि त्यांच्या कृतीतून देशात असे वातावरण निर्माण व्हावे की सर्वसामान्य कुटुंबातील तरुणही उद्योजक बनतील, स्वप्न पाहतील आणि उद्योजकतेचा अभिमान बाळगतील. पंतप्रधान म्हणाले की मुद्रा योजनेसारख्या योजना अशा लोकांना व्यवसायात येण्याचे बळ देत आहेत ज्यांनी असे करण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते. त्याचप्रमाणे, स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष, प्रतिभा आणि युनिकॉर्नच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मदत करत आहे जे पूर्वी असाध्य वाटले होते. पंतप्रधान म्हणाले की, उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना पारंपरिक क्षेत्रांमध्ये नवीन ऊर्जा देत आहे आणि नवीन क्षेत्रांमध्ये नवीन संधी  निर्माण करत आहे.  महामारीची आव्हाने असूनही देशातील एमएसएमई क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे असे ते म्हणाले. भरघोस  आर्थिक सहाय्यासह या क्षेत्रातील लाखो रोजगारांचे रक्षण झाले आणि आता हे क्षेत्र रोजगाराबाबत  अनेक बातम्या निर्माण करत आहे. पीएम -स्वनिधी योजनेने पदपथावरील विक्रेत्यांना औपचारिक बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात प्रवेश देऊन विकासगाथेशी  जोडले आहे. नुकतीच ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक लहान-मोठा व्यवसाय देशाच्या प्रगतीत योगदान देत आहे आणि सबका प्रयासची ही भावना अमृत काळातील नवीन भारताची ताकद बनत आहे. यंदाच्या शिखर परिषदेत या पैलूवर सविस्तर चर्चा होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

गुजरात बाबत बोलताना पंतप्रधानांनी समुदायाला राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी अनुभवी आणि तरुण सदस्यांचा समावेश असलेले गट तयार करण्यास सांगितले आणि कल्पना, चांगल्या  जागतिक पद्धती आणि सरकारी धोरणे यांची माहिती घेऊन त्यांचे विश्लेषण देखील करू शकता असे सांगितले. फिनटेक, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन इत्यादी विषय सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रम सुचवण्यासाठी घेतले जाऊ शकतात, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे, संपूर्ण अंमलबजावणीचे सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी आणि प्रत्येक स्तरावर उपयुक्त उपक्रम सुचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हाती घेतले जाऊ शकते.

कृषी आधुनिकीकरण आणि कृषी क्षेत्रात गुंतवणूक आणण्याचे मार्ग शोधण्यासही पंतप्रधानांनी शिखर परिषदेला सांगितले. शेतीच्या नव्या पद्धती आणि नवीन पिके सुचवण्यासाठी गुजरातच्या जमिनीचा अभ्यास करण्याकरिता पथके तयार करता येतील, असे त्यांनी सुचवले. त्यांनी काही दशकांपूर्वीच्या  गुजरातमधील दुग्ध व्यवसायाच्या चळवळीचे उदाहरण दिले , ज्याने गुजरातच्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलली. शेतीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी आपल्याला मार्ग शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की अशा प्रयत्नांमुळे खाद्यतेलाची आयात कमी होण्यास मदत होऊ शकते आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील शक्यतांवर त्यांनी भर दिला. त्यांनी उपस्थितांना उदयोन्मुख शेतकरी उत्पादक संस्थांकडे लक्ष देण्यास सांगितले कारण या संस्थांच्या निर्मितीतून अनेक संधी निर्माण होत आहेत. नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात काम करण्यासही पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी सौर पॅनेलसाठी शेतातील मोकळा भाग वापरण्याच्या शक्यतांवर भर दिला. नुकत्याच सुरू झालेल्या अमृत सरोवर अभियानात त्यांनी योगदान देण्यास सांगितले. नुकत्याच झालेल्या आयुर्वेद शिखर परिषदेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, वनौषधी आणि आयुष क्षेत्रात नवीन संधींचा विचार केला जाऊ शकतो.

पंतप्रधानांनी आर्थिक साम्राज्यांकडे नवीन दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले. मोठ्या शहरांऐवजी छोट्या शहरांमध्ये उद्योग उभारता येतील, असा निर्णय घेतला जाऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी ज्योतिर्ग्राम योजनेचे उदाहरण दिले ज्यामुळे खेड्यापाड्यात औद्योगिक उपक्रम सुरू झाले. आता असे काम लहान गावे आणि शहरांसाठी करता येईल, असे ते म्हणाले.

पाटीदार समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरदारधाम ‘मिशन 2026’ अंतर्गत जागतिक पाटीदार व्यावसायिक शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. दर दोन वर्षांनी शिखर परिषद आयोजित केली जाते. पहिल्या दोन शिखर परिषदा 2018 आणि 2020 मध्ये गांधीनगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या आणि सध्याची शिखर परिषद आता सुरत येथे होत आहे. GPBS 2022 ची मुख्य संकल्पना "आत्मनिर्भर समुदाय ते आत्मनिर्भर गुजरात आणि भारत" आहे. समुदायातील लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना एकत्र आणणे; नवीन उद्योजकांना पाठबळ देणे आणि समर्थन करणे आणि शिक्षित तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार सहाय्य प्रदान करणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय शिखर परिषदेत सरकारी औद्योगिक धोरण, एमएसएमई, स्टार्ट अप्स, नवोन्मेष यासह इतर विविध पैलूंचा समावेश आहे.

 

 

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821256) Visitor Counter : 170