युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2021 चे उद्घाटन
थावरचंद गेहलोत, अमित शाह, बसवराज बोम्मई, निर्मला सीतारामन, अनुराग सिंग ठाकूर आणि निशीथ प्रामाणिक हे नेते उद्घाटन समारंभात सहभागी होणार
मल्लखांब आणि योगासने या स्वदेशी खेळांसह एकूण 20 विविध क्रीडाप्रकारांमध्ये देशातील 200 हून अधिक विद्यापीठांमधील सुमारे 3879 स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतील
प्रविष्टि तिथि:
23 APR 2022 3:23PM by PIB Mumbai
देशाचे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू उद्या, रविवारी, बेंगळूरूमधील श्री कांतीराव इनडोअर प्रेक्षागृहामध्ये होणाऱ्या समारंभात, दुसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा 2021चे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय गृह व्यवहार मंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर तसेच केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.क्रीडा क्षेत्रात देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या आजी-माजी खेळाडूंच्या उपस्थितीने हा उद्घाटनपर कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे.
यावेळी, कर्नाटक राज्याचे युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री नारायण गौडा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. कर्नाटक विधिमंडळाचे सदस्य बसवराज होराट्टी, कर्नाटकचे उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि जैव-तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि उद्योजकता तसेच रोजगार मंत्री डॉ.अश्वथनारायण सीएन, शिवाजी नगरचे आमदार रिझवान अर्षद हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मल्लखांब आणि योगासने या स्वदेशी खेळांसह एकूण 20 विविध क्रीडाप्रकारांमध्ये देशातील 200 हून अधिक विद्यापीठांमधील सुमारे 3879 स्पर्धक भाग घेतील. कांतीराव प्रेक्षागृह संकुलामध्ये अॅथलेटिक्स आणि बास्केटबॉल या खेळांच्या स्पर्धा होतील तर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानात नेमबाजीच्या स्पर्धा घेतल्या जातील आणि हॉकीचे सामने करिअप्पा मैदानात खेळले जातील. इतर सर्व क्रीडाप्रकार जैन शैक्षणिक संस्थेच्या मैदानात होतील.
या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धा 2021 मध्ये भाग घेणाऱ्या सुमारे 8000 हून अधिक स्पर्धक, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना स्पर्धांशी संबंधित कोणतीही माहिती कोणत्याही वेळी उपलब्ध व्हावी म्हणून अभिनव प्रकारचे एक नाविन्यपूर्ण मोबाईल अॅप तयार केले आहे. या समावेशक अॅपमध्ये निवास व्यवस्था, जेवणाची सोय, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन मदतीसाठीचे संपर्क क्रमांक, विविध क्रीडास्पर्धांच्या आयोजनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नकाशा आणि खेळांबाबत दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना तसेच इतर आवश्यक माहिती उपलब्ध असेल.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1819396)
आगंतुक पटल : 249