आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत अंतर्गत 21 एप्रिलला घेतलेल्या तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्यांमध्ये 4 लाख 82 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग
चौथ्या दिवशी देशभरातील 587 तालुक्यांमध्ये आरोग्य मेळावे आयोजित
Posted On:
22 APR 2022 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2022
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवान्तर्गत 16 ते 22 एप्रिल दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने, 'आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या' कार्यक्रमाचा चौथा वर्धापनदिन साजरा करत आहे. देशभरात यासाठी मोठाच जोष आणि उत्साह दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव (आरोग्य), राज्य/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यसचिव, राज्य आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी आणि स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठित व्यक्तीही आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रांना (AB-HWC) भेट देऊन, या केंद्रांच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करत आहेत. परवडण्याजोग्या आरोग्यसुविधा सर्वांच्या आवाक्यात असाव्यात या दृष्टीने सदर केंद्रांचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे.
18 ते 22 एप्रिल या काळात तालुकास्तरीय आरोग्य मेळावे भरवण्यात येत आहेत. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एका तालुक्यात एक अशा प्रकारे देशभरात 1 लाखाहून अधिक केंद्रांमध्ये असे आरोग्य मेळावे भरवण्यात येत आहेत. तालुकास्तरावरील प्रत्येक मेळावा एक दिवसाचा असून, राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक तालुका यामध्ये अंतर्भूत केला जाईल.
आरोग्य मेळाव्यांच्या चौथ्या दिवशी देशभरात 587 तालुक्यात आरोग्य मेळावे घेतले जाऊन त्यामध्ये 4 लाख 82 हजारांपेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाल्या. शिवाय, 66,000 हून अधिक आभा आरोग्य ओळखपत्रे बनवली गेली तसेच 18,000 प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्डे वितरित करण्यात आली. हायपरटेन्शन, मधुमेह इत्यादी विकारांसाठी सहस्रावधी लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या.
या केंद्रांत 16 एप्रिलला, इ-संजीवनी मंचामार्फत विक्रमी 3 लाख टेलिकन्सल्टेशन म्हणजे दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ले देण्यात आले. यापूर्वी एका दिवसात अशा 1.8 लाख इतक्या सर्वाधिक दूरसल्ल्यांची नोंद झाली होती. 21 एप्रिलला देशभरात 33 हजारांहून अधिक दूरसल्ले देण्यात आले.
S.Kulkarni/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819016)
Visitor Counter : 216