आयुष मंत्रालय
गुजरातमधील गांधीनगर येथे सुरु असलेल्या जागतिक आयुष शिखर परिषदेमध्ये आयुषशेफ स्पर्धा आणि आयुर्वेदिक उत्पादनांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लोकांना करत आहेत आकर्षित
Posted On:
21 APR 2022 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022
गुजरात राज्यात गांधीनगर येथे सुरु असलेल्या तीन दिवसांच्या जागतिक आयुष शिखर परिषदेमधील सभागृहे आणि चर्चासत्रे या कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या उत्साही लोकांनी ओसंडून वाहत आहेत. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, विविध रुचीपूर्ण प्रदर्शने आणि आयुष क्षेत्रातील स्टार्ट अप्स तसेच अभिनव संशोधनांवर आधारित सादरीकरणे येथे भेट देणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आरोग्यदायी अन्न आणि आयुष आधारित आहार यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली आयुषशेफ स्पर्धा लोकांसाठी विशेष ठरली आहे. जगभरातील 200 स्पर्धकांमधून निवडण्यात आलेल्या 30 स्पर्धकांनी यावेळी स्पर्धेत भाग घेतला. ‘पोषणासाठी आहार’ या संकल्पनेवर आधारित या आयुषशेफ स्पर्धेमध्ये पुढील सहा प्रवेश श्रेणी ठेवण्यात आल्या होत्या, धान्यावर आधारित पाककृती, तृणधान्य-आधारित पाककृती, दाणे/डाळी यांच्यावर आधारित पाककृती, फळे/भाज्या यांच्यावर आधारित पाककृती, दुग्धउत्पादनांवर आधारित पाककृती आणि यांतील प्रकारांच्या मिश्र पाककृती. या स्पर्धेतील विजेत्याला रोख 1 लाख रुपये तर पहिल्या आणि दुसऱ्या उपविजेत्याला अनुक्रमे 75,000 रुपये आणि 50,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
या संमेलनातील प्रदर्शन सभागृहे देखील आयुषच्या माध्यमातून सौंदर्य या संकल्पनेला अधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने आणि शृंगार साधनांनी भरून वाहत आहेत. जामनगर येथील आयुर्वेदिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या ग्रीन फॉरेस्ट या स्टार्ट अप कंपनीची निर्मिती असलेल्या काही आकर्षक उत्पादनांमध्ये दूध आणि मधापासून तयार केलेला लहान मुलांसाठीचा नैसर्गिक साबण, आम्लपित्तावर गुणकारी ठरणारे वेदिक जल इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. तसेच त्यांनी “ओजस्मृती” नावाची जगातील पहिली आयुर्वेदिक मिल्कशेक पावडर देखील तयार केली आहे.
अशा अनेक स्टार्ट अप्सपैकी एक आहे एनसायफर. हे उपकरण आयुर्वेदिक डॉक्टर आणि वैद्यांना नाडी परीक्षण करून त्याचे निदान डिजिटल पद्धतीने करण्यात मदत करते. कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाने विकसित केलेले आणखी एक स्टार्ट अप उपकरण म्हणजे आयुपॅथी. हे उपकरण प्रारंभिक टप्प्यातच हृदयाशी संबंधित आजारांचे निदान करू शकते.
या सर्व उपक्रमांसह, परिषदेच्या दुसऱ्या दिवशी समारोप सत्रे, विविध परिसंवाद, गोलमेज बैठका यांचे देखील आयोजन करण्यात आले होते आणि त्यात ख्यातनाम विषय तज्ञ आणि वक्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. आयुष आधारित जैववैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रातील अभिनव संशोधने, जागतिक आयुष संशोधन आणि विकासात्मक उपक्रम या आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत चर्चा झाल्या.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818762)
Visitor Counter : 219