पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गांधीनगरमध्ये “जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष” शिखर परिषदेचे केले उद्‌घाटन


सार्वजनिक आरोग्यामध्ये नाविन्यपूर्ण शक्तीचा उपयोग केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी पंतप्रधान आणि भारत सरकारचे केले कौतुक

"तुमच्या सर्वोत्तम दर्जामुळे पारंपारिक औषधांच्या वापरात लक्षणीय बदल होईल", असे महासंचालकांनी पंतप्रधानांना सांगितले

पंतप्रधानांनी डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांना ‘तुलसीभाई’हे गुजराती नाव दिले

"आयुषच्या क्षेत्रात गुंतवणूक आणि नवोन्मेषाच्या अमर्याद शक्यता"

"आयुष क्षेत्रातील उलाढालीत 2014 मधील 3 अब्ज डॉलर्सवरुन 18 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिकची वाढ"

"भारत हा वनौषधींचा खजिना, ते एक प्रकारे आपले 'हरित सोने'"

“गेल्या काही वर्षांत विविध देशांसोबत 50 हून अधिक सामंजस्य करारांना देण्यात आले औपचारिक रूप. आमचे आयुष तज्ञ भारतीय मानक संस्थेच्या सहकार्याने आयएसओ मानके विकसित करत आहेत. यामुळे 150 हून अधिक देशांमध्ये आयुषसाठी मोठी निर्यात बाजारपेठ होईल खुली"

"एफएसएसएआयचा 'आयुष आहार' वनौषधीयुक्त पोषण पूरक पदार्थांच्या उत्पादकांना मोठ्या प्रमाणात सुविधा देईल"

"विशेष आयुष मानचिन्ह जगभरातील लोकांना दर्जेदार आयुष उत्पादनांचा आत्मविश्वास देईल"

"देशभर आयुष उत्पादनांच्या जाहिरात, संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आयुष उद्यानांचे जाळे विकसित करेल"

“आयुष उपचारासाठी लोकांना भारतात प्रवास करण्याची सुविधा देण्यासाठी भारत एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार”

"मुक्त स्त्रोत मॉडेल हे आयुर्वेदाच्या समृद्धीमागील मुख्य कारण "

“पुढील 25 वर्षांचा अमृत काळ हा पारंपारिक औषधांचा सुवर्णकाळ ठरेल”

Posted On: 20 APR 2022 4:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन केले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, सर्वानंद सोनोवाल, मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते.  तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सुमारे 90 प्रख्यात वक्ते आणि 100 प्रतिनिधींसह 5 पूर्ण सत्रे, 8 गोलमेज, 6 कार्यशाळा आणि 2 परिसंवाद होणार आहेत. ही  परिषद, गुंतवणुकीची क्षमता वृद्धी करण्यात मदत करेल आणि नवकल्पना, संशोधन आणि विकास, स्टार्ट-अप परिसंस्था तसेच आरोग्यदायी  उद्योगाला चालना देईल. उद्योगातील नेतृत्व, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वानांना एकत्र आणण्यास ही परिषद मदत करेल तसेच भविष्यातील सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

‘जगाचा अभिमान’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या राज्यात आणि देशात उपस्थित राहिल्याबद्दल डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी आनंद व्यक्त केला. 'वसुधैव कुटुंबकम' हे भारताचे तत्वज्ञान काल जामनगरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषधी केन्द्राच्या (जीसीटीएम)निर्मिती मागील प्रेरक शक्ती आहे असे ते म्हणाले. या केंद्राची स्थापना ऐतिहासिक असून ती परिवर्तनकारी ठरेल, असे ते म्हणाले.  पुरावे, माहिती आणि शाश्वतता तसेच पारंपारिक औषधांच्या वापराच्या अनुकूलतेचे धोरण राबण्यासाठी हे केंद्र नावीन्यपूर्ण इंजिन म्हणून तयार केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक आरोग्यामध्ये नवोन्मेषी शक्ती वापरल्याबद्दल महासंचालकांनी पंतप्रधान आणि भारत सरकारचे कौतुक केले. त्यांनी भारतीय रुग्णालयांमध्ये माहिती आणि एकात्मिक माहिती सामायिकीकरण प्रणालीच्या वापराचे कौतुक केले.  पारंपारिक वैद्यकातील संशोधनासाठी माहिती गोळा करण्याच्या मानसिकतेला चालना दिल्याबद्दल त्यांनी आयुष मंत्रालयाचे कौतुक केले.

आयुष उत्पादनांची वाढती जागतिक मागणी आणि गुंतवणूक लक्षात घेऊन महासंचालक म्हणाले की संपूर्ण जग भारतात येत आहे आणि भारत संपूर्ण जगाकडे जात आहे. आरोग्य आणि विशेषतः पारंपारिक औषधांमध्ये नावीन्यपूर्ण परिसंस्थेत दीर्घकालीन गुंतवणूकीवर त्यांनी भर दिलानवोन्मेषक, उद्योग आणि सरकार द्वारे पारंपारिक औषधे पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि न्याय्य पद्धतीने विकसित करणे आणि या परंपरा विकसित करणाऱ्या समुदायांच्या हिताचे रक्षण करणे हे लाभान्वित व्हायला हवे. ही औषधे जेव्हा बाजारात आणली जातात तेव्हा बौद्धिक संपदेची फळे सामायिक करून त्यांचाही फायदा झाला पाहिजे असे सांगत   महासंचालकांनी पंतप्रधानांचे आभार मानून आपल्या भाषणाचा  समारोप केला.

या महत्त्वाच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला विश्वास आहे की केवळ केंद्रच नाही तर तुमचे अव्वल प्रयत्न पारंपारिक औषधांच्या वापरामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.

त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांचे पारंपारिक औषधांबद्दलच्या वचनबद्धतेबद्दल कौतुक केले. आझादी का अमृत महोत्सवाच्या वर्षात जागतिक आरोग्य संघटना ही 75 वर्षांची झाल्याचा आनंददायी योगायोगही त्यांनी नोंदवला.

प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात भारत आणि गुजरात यांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. आपल्या देशातही आरोग्य क्षेत्रात भारताने दिलेला पाठिंब्याची नोंद त्यांनी यावेळी घेतली. मॉरिशस आणि भारतातील लोकांचे वंशज समान होते, हे लक्षात घेऊन मॉरिशसच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशात आयुर्वेदाला असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मॉरिशसमध्ये स्थापन झालेल्या आयुर्वेदिक रुग्णालयाबाबत माहिती दिली आणि पहिल्या लॉकडाऊन दरम्यान भारताने केलेल्या पारंपारिक औषधांच्या सहकार्याबद्दल भारताचे आभार मानले.हा एकजुटीच्या अनेक संकेतांपैकी एक आहे, ज्यासाठी आम्ही भारत सरकारचे आणि विशेषतः पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांचे सदैव ऋणी आहोत, असे प्रविंद कुमार जगन्नाथ आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवनिर्माण परिषदेची कल्पना त्यांना महामारीच्या काळात सुचली जेव्हा आयुषने लोकांची प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सबल योगदान दिले आणि आयुष उत्पादनांची आवड आणि मागणी यात वृध्दी झाली.  महामारीचा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत पंतप्रधानांनी आधुनिक औषध कंपन्या आणि लस उत्पादकांनी योग्य वेळी गुंतवणूक करुन त्यांनी दाखविलेल्या आश्वासकतेची नोंद घेतली.आपण इतक्या लवकर कोरोनाची लस विकसित करू शकू याची कल्पना कोणी केली असेल?, असा सवाल त्यांनी केला.

आयुष क्षेत्राने केलेल्या प्रगतीचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले, आम्ही याआधीच आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व वृद्धी झालेली पाहिली आहे. 2014 मध्ये, जिथे आयुष क्षेत्र 3 बिलियन डाॅलर्सपेक्षा कमी होते, आज ते 18 बिलियन अमेरिकन डाॅलर्सपेक्षा अधिक झाले आहे. "ते म्हणाले, की पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. अलिकडेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने विकसित केलेल्या उष्मायन केंद्राचे (इनक्यूबेटर सेंटर) उदघाटन करण्यात आले आहे, अशी माहिती मोदींनी दिली. सध्याचे युग, युनिकॉर्नचे युग आहे, असे सार्थ वर्णन करत, पंतप्रधानांनी सांगितले की 2022 मध्ये, आतापर्यंत भारतातील 14 स्टार्ट-अप युनिकॉर्न समूह सामील झाले आहेत. मला खात्री आहे की, आमच्या आयुष स्टार्टअप्समधून अधिकाधिक युनिकॉर्न लवकरच उदयास येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय औषधी वनस्पतींचे उत्पादन हे शेतकर्‍यांचे उत्पन्न आणि उपजीविका वाढवण्याचे आणि त्यातून रोजगार निर्मिती करण्याचे एक उत्तम साधन ठरू शकते, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी शेतकर्‍यांनी औषधी वनस्पती उत्पादन बाजारपेठेशी सहज संपर्क साधण्याच्या सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले. यासाठी सरकार आयुष ई-मार्केट प्लेसच्या आधुनिकीकरण आणि विस्तारावरही काम करत आहे, असे ते पुढे म्हणाले. भारत हा वनौषधींचा खजिना आहे, एक प्रकारे ते आपले ‘हिरवे सोने’ आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.

आयुष उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांत केलेल्या अभूतपूर्व प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वर्णन केले. इतर देशांत आयुष औषधांना परस्पर मान्यता मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी गेल्या काही वर्षांत विविध देशांसोबत 50 हून अधिक सामंजस्य करार झाले आहेत. आमचे आयुष तज्ञ भारतीय मानक ब्युरोच्या सहकार्याने आयएसओ (ISO) मानके विकसित करत आहेत. यामुळे 150 हून अधिक देशांमध्ये आयुषला मोठी निर्यात बाजारपेठ मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

मोदींनी असेही सांगितले, की भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानदंड प्राधिकरण (FSSAI) ने गेल्या आठवड्यात त्यांच्या नियमांमध्ये 'आयुष आहार' नामक नवीन श्रेणी जाहीर केली आहे. यामुळे वनस्पतीजन्य पोषण पूरक आहार उत्पादकांना मोठ्या प्रमाणात संधी लाभेल. त्याचप्रमाणे भारत एक खास आयुष चिन्ह देखील बनवणार आहे. ही खूण भारतात बनवलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केली जाईल. हे आयुष चिन्ह आधुनिक तंत्रज्ञानाच्या तरतुदींनी सुसज्ज असेल. यामुळे जगभरातील लोकांचा दर्जेदार आयुष उत्पादनांचा विश्वास मिळवता येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

देशभरात आयुष उत्पादनांचा प्रचार, संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देशभरात आयुष पार्कचे जाळे विकसित करेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. या आयुष पार्क्समुळे  देशातील आयुष उत्पादनाला नवी दिशा मिळेल, असे मोदी म्हणाले.

पारंपरीक औषधांच्या क्षमतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी केरळातील पर्यटन व्यवसायवाढीत  पारंपरिक उपचारांची भूमिका असल्याचे नमूद केले.  ही क्षमता भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. या दशकात ‘हील इन इंडिया’ हा एक मोठा ब्रँड बनेल असेही ते म्हणाले. आयुर्वेद, युनानी, सिद्ध या उपचारपद्धतीची केंद्रे लोकप्रिय होतील. याला अजून चालना देण्यासाठी सरकार आयुष उपचार घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी काही पावले उचलेल असे पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले. ''लवकरच, भारत एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे. आयुष उपचारासाठी भारतात येणाऱ्या लोकांना याचा उपयोग होईल'' असे पंतप्रधानांनी जाहीर केले.

आयुर्वेदाची यशोगाथा वर्णन करताना पंतप्रधानांनी केनियाचे माजी पंतप्रधान राईला  ओडिंगा यांची कन्या रोजमेरी ओडिंगा हिला आयुष उपचारांनी दृष्टी लाभल्याबाबत सांगितले.  यावेळी श्रोत्यामध्ये उपस्थित असलेल्या रोजमेरी ओडिंगा यांची  ओळख पंतप्रधानांनी करुन दिली.उपस्थितांनी  टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले. एकविसाव्या शतकातील भारत  अनुभवांची देवाणघेवाण आणि ज्ञान यांचे जगाबरोबर आदानप्रदान  करून  पुढे जाऊ इच्छितो असेही ते पुढे म्हणाले.  ''आमचा वारसा संपूर्ण मानव मानवजातीसाठी एक वारसा असल्यासारखे आहे.'' असे ते म्हणाले. आयुर्वेद समृद्ध होण्यातले प्रमुख कारण त्याच्या मुक्त स्रोत प्रारूपात आहे,यावर पंतप्रधानांनी भर दिला.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स चळवळीशी याची तुलना करत पंतप्रधानांनी ज्ञानाच्या देवाणघेवाणीतून आयुर्वेदाची परंपरा जास्तीत जास्त बळकट होईल यावर भर दिला. आपल्या पूर्वजांकडून प्रेरणा घेत बदल करण्यासाठी तयार असण्याची क्षमता येण्यावर काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील 25 वर्षांचा अमृतकाळ  हा पारंपारिक ओषधांचा सुवर्णकाळ ठरेल,अशी आशा  त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधानांनी एका वैयक्तिक आणि रोचक उल्लेखाने आपले भाषण संपवले. भारताबद्दल डॉक्टर टेड्रोस घेब्रेयेसस यांना असलेले प्रेम, त्यांच्या भारतीय शिक्षकांबद्दलचा आदर आणि गुजरातबद्दलची त्यांची ओढ हे सांगताना मोदी यांनी तुलसी भाई असे गुजराती नाव त्यांना दिले. भारतीय परंपरेत तुळशीला असलेले अध्यात्मिक आणि सर्वोच्च स्थान याचे वर्णन केले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांचे आभार मानले.

 

 

 

 

JPS/ST/SK/VG/SP/VS/PM

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818390) Visitor Counter : 239