माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिवांनी  2022 मध्ये होणाऱ्या अमरनाथजी यात्रेच्या प्रसिद्धीविषयी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली


केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या विकासात्मक कामगिरीवर भर देणे आवश्यक; यात्रेतील उपक्रमांना संपूर्ण भारतभर प्रसिद्धी देण्यात येईल: अपूर्व चंद्रा

यावर्षी विक्रमी संख्येने भाविक येतील अशी अपेक्षा आहे, त्यानुसार सर्व प्रकारच्या तयारीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे: अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष

यात्रेकरूंच्या हालचालींची नोंद ठेवण्यासाठी त्यांना आरएफआयडी टॅग दिले जाणार; यावर्षी 6 ते 8 लाख भाविक अमरनाथला भेट देतील असा अंदाज

Posted On: 11 APR 2022 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 11 एप्रिल 2022

येत्या 30 जून 2022 पासून सुरु होत असलेल्या अमरनाथ यात्रेची आगामी 43 दिवसात प्रसिद्धी करण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज श्रीनगर येथे बैठक घेतली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांसह, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता, अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष नितीश्वर कुमार, जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल, तसेच केंद्र सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय, आकाशवाणीच्या वृत्त विभागाचे मुख्य महासंचालक एन.व्ही.रेड्डी, दूरदर्शनचे महासंचालक मयंक अग्रवाल, श्रीनगरच्या पत्र सूचना कार्यालयातील अतिरिक्त महासंचालक राजिंदर चौधरी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने यात्रेच्या संपूर्ण कालावधीत प्रसिद्धीविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत अशी माहिती अपूर्व चंद्रा यांनी या बैठकीत दिली. अमरनाथ यात्रेसंदर्भातील विविध कार्यक्रमांची माहिती संपूर्ण देशभरात प्रसिध्द केली जाईल. त्याचबरोबर या भागातील पर्यटनाशी संबंधित उपक्रमांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या विकासविषयक कामांच्या संदर्भात केंद्र सरकार तसेच जम्मू काश्मीर प्रशासनाने मिळविलेल्या यशांच्या माहितीवर भर देण्याची गरज आहे. या प्रदेशाविषयीच्या अशा सकारात्मक गाथांची माहिती संपूर्ण देशात पोहोचायला हवी, चंद्रा म्हणाले. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी सहा ते आठ लाख यात्रेकरू येतील अशी अपेक्षा आहे असे ते पुढे म्हणाले.

या वर्षीची अमरनाथ यात्रा अधिक उत्तम सुविधांसह आणि सुरळीत प्रवासाच्या अनुभवासह सर्वाधिक विक्रमी संख्येतील भाविकांच्या सहभागाने संपन्न होईल असे मत मुख्य सचिव अरुण कुमार यांनी या बैठकीत मांडले.

अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी, यात्रेची सुरुवात आणि समारोप अशा संपूर्ण प्रक्रियेच्या तपशीलवार पद्धतीला देशभरात प्रसिद्धी देण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दिल्या.

या वर्षी यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंना उपयुक्त ठरेल अशी यात्रेबाबतची संपूर्ण माहिती अधिक मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात  आकाशवाणीच्या वृत्त विभागाचे मुख्य महासंचालक एन.व्ही.रेड्डी तसेच दूरदर्शनचे महासंचालक मयंक अग्रवाल यांनी उपस्थितांशी सखोल चर्चा केली.

अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष नितीश्वर कुमार यांनी यात्रेच्या तयारीबद्दल समग्र आढावा सर्वांसाठी सामायिक केला. अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्याची विनंती प्रसारमाध्यम प्रतिनिधींना करून ते म्हणाले की या वर्षीच्या यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या हालचालींची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक यात्रेकरूसाठी आरएफआयडी अर्थात रेडीओ लहरींवर आधारित ओळखनिश्चिती टॅगचा वापर करण्यात येणार आहे.

काश्मीरचे विभागीय आयुक्त, जम्मूचे विभागीय आयुक्त, गंदरबालचे उपायुक्त तसेच अनंतनागचे उपायुक्त यांच्यासह सुरक्षा आणि प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815742) अभ्यागत कक्ष : 257