आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 मुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीचे दावे दाखल करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून कालमर्यादा निश्चित
Posted On:
11 APR 2022 11:26AM by PIB Mumbai
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे कोविड-19 कारणामुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीचे दावे दाखल करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे. 2021 मध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका सी क्रमांक 539 मधील विविध अर्ज क्रमांक 1805 विषयी न्यायालयाने 24 मार्च 2022 रोजी यासंबंधी आदेश दिला आहे.
यासंबंधी न्यायालयाकडून जारी करण्यात आलेले प्रमुख निर्देश पुढीलप्रमाणे आहेत -
कोविड-19 मुळे जर कोणाचा 20 मार्च 2022 पूर्व मृत्यू झाला असेल तर त्यासंबंधी नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दि. 24 मार्च, 2022 पासून पुढे 60 दिवसांची कालमर्यादा लागू असणार आहे.
आगामी काळात कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास त्या तारखेपासून 90 दिवसांच्या कालावधीमध्ये नुकसान भरपाईचा दावा करता येणार आहे.
संबंधितांनी नुकसान भरपाईचा दावा केलेल्या तारखेपासून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य तीस दिवसांच्या कालावधीत होवून प्रत्यक्ष नुकसान भरपाईची रक्कम देण्यासंबंधी, यापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अतिशय अवघड परिस्थितीत, अडचणीच्या काळामुळे जर दावेदार विहीत काळामध्ये नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकला नाही, तर त्या दावेदाराने तक्रार निवारण समितीकडे जावे. दावेदाराला तक्रार निवारण समिती मार्फत दावा दाखल करण्याचा मार्ग खुला आहे. या समितीमार्फत प्रत्येक प्रकरणाच्या कारणांचा विचार केला जाईल. आणि तक्रार निवारण समितीला लक्षात आले की, दावेदाराला निर्धारित वेळेत दावा दाखल करणे शक्य नव्हते, सर्व परिस्थिती दावेदाराच्या नियंत्रणाबाहेरची होती. अशावेळी त्या प्रकरणानुसार त्या दाव्याचा विचार केला जावू शकतो.
याशिवाय, बनावट दाव्यांची जोखीम कमी करण्यासाठी दाव्यांपैकी पाच टक्के अर्जांची आगंतुक छाननी पहिल्याच टप्प्यात करण्यात यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर जर कोणी खोटा दावा सादर केल्याचे आढळून आले तर डीएम कायदा, 2005 कलम 52 अन्वये त्याचा विचार केला जाणार असून, संबंधित शिक्षेच्या कारवाईस पात्र ठरणार आहेत.
***
ST/SB/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815572)
Visitor Counter : 864